पुलवामा घटनेनंतर जग भारताच्या पाठीशी!
   दिनांक :21-Feb-2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आमचे ४० जवान शहीद झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी चोहोबाजूने होत असतानाच, इराणमध्येही पाकिस्तानला धडा शिकविण्याची एकमुखी मागणी सुरू झाली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे १३ फेब्रुवारीला इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात पुलवामासारख्याच एका आत्मघाती हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे 27 जवान मारले गेले. हा हल्लाही पुलवामासारखाच होता. इराणी लष्करी जवान एका बसमधून जात असताना, स्फोटकांनी भरलेली कार बसजवळ आली आणि आत्मघाती व्यक्तीने बटण दाबून बस उडवून दिली. जैश-अल-अद्ल या संघटनेचा यात हात असल्याचे बोलले जात आहे. या संघटनेचे अल्‌ कायदासोबत संबंध आहेत. मग यात पाकिस्तानचा संबंध कसा? पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय या दहशतवादी संघटनेला पैसे आणि शस्त्रे पुरवीत असतात आणि इराणमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी जैशचा वापर करीत असतात.
 
याचा अर्थ पाकिस्तान हा केवळ भारतातच दहशतवादी हल्ले घडवून आणतो असे नाही, तर तो इराणमध्येही तीच नीच चाल खेळत आहे. यामुळे इराणमधील जनता पाकिस्ताविरोधात खवळली आहे. पाकिस्तानला याची जबर किंमत मोजावी लागेल आणि ती खूप मोठी असेल, असा इशारा रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी दिला आहे. भारतासारखीच इराणनेही आपल्या लष्कराला कारवाई करण्याची पूर्ण सूट दिली आहे. या २७ जवानांचे मृतदेह जेव्हा दफनविधीसाठी नेताना बुजुर्गमेहर चौकात आणले गेले तेव्हा तेथे हजारो नागरिक उपस्थित होते. त्यांनी एकसुरात नारा दिला- बदला, बदला... या हजारो लोकांना संबोधित करताना, कमांडर जाफरी म्हणाले की, इराण आता मूक दर्शक बनून कदापि स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडेल, असाच बदला आम्ही घेऊ. ज्यांनी या भ्याड हल्ल्यासाठी मदत केली, त्यांनाही आम्ही सोडणार नाही.
 

 
 
भारतात पुलवामा हल्ल्याबाबत जसा नागरिकांमध्ये आक्रोश आहे, तसाच आक्रोश इराणमध्येही उफाळून आला आहे. इराण हा शिया देश आहे. इराकही शिया आहे. पाकिस्तान हा सुन्नी देश आहे. तेथे फक्त सहा टक्केच शिया उरले आहेत. जेवढ्या अतिरेकी संघटना आहेत, त्यात सर्वाधिक सुन्नी आहेत. पाकिस्तान हा सुन्नी देश असल्यामुळे अल्‌ कायदा, इसिसपासून तर जगभरातील सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानची मदत घेत असतात. शिया-सुन्नी हा वादही या दहशतवादी कारवायांसाठी कारणीभूत आहे. सौदी अरेबिया हासुद्धा सुन्नी देश आहे आणि त्याचे इराणसोबत शत्रुत्वाचे संबंध आहेत.
 
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात जगभरातील प्रमुख देशांच्या प्रमुखांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या पाहता, भारत जागतिक मुत्सद्देगिरीत वरचष्मा बाळगून असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज पाकिस्तान एकाकी पडला आहे, तो यामुळेच. आज अनेक देशांनी पुलवामा हल्ल्याचा केवळ निषेधच केलेला नाही, तर सक्रिय लष्करी मदत देण्याचीही इच्छा दाखविली आहे. इस्रायलने आपले दहशतवादविरोधी पथक पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. इस्रायलच्या लष्करी कमांडोजच्या कहाण्या सर्वज्ञात आहेत. शत्रूविरुद्ध कारवाई कशी करावी, यात ते निष्णात आहेत. येणार्‍या काळात पुलवामा हल्ल्याचा बदला भारत कोणत्या पद्धतीने घेतो, हे दिसेलच. तिकडे फ्रान्सने पाकिस्तानपोषित अझहर मसूद याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या ठरावाला अमेरिका, ब्रिटन, युरोपीय युनियनचीही साथ आहे. केवळ चीन नकार देत आहे.
 
काळ कसा सूड उगवतो, पाहा. पं. जवाहरलाल नेहरू यांनीच चीनला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व द्यावे, यासाठी मोहीम आखली होती. हे माहीत असूनही की, चीन हा विस्तारवादी देश आहे आणि तिबेट गिळंकृत करण्याची त्याची योजना आहे. वास्तविक पाहता त्यावेळी भारताला सदस्यत्व मिळावे अशी गळ अमेरिका, रशियासह अनेक देशांनी घातली होती. तरीही नेहरूंनी चीनचाच आग्रह धरला. तोच चीन आज पाकिस्तानला मदत करीत आहे. नेहरूंच्या चीनधार्जिण्या धोरणाचा चीनने लाभ उठविला नसता तरच नवल. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आपला सुमारे एक लाख चौरस मैल भूभाग बळकावला होता; तर १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक शरण आले असताना, पाकिस्तानने पकडलेले दीड हजार भारतीय सैनिक आधी परत न आणता, पाकच्या ९३ हजार सैनिकांना इंदिरा गांधींनी सोडून दिले होते. त्या दीड हजारांपैकी आता किती जण पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, याची माहिती कुणालाच नाही. कॉंग्रेसने या देशाचे एवढे प्रचंड नुकसान करून ठेवले आहे की, त्याचा सामना आता मोदी सरकारला ठामपणे करावा लागत आहे. अझहर मसूदचा ठराव जेव्हा चर्चेला येईल, तेव्हा चीनची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. इकडे इराण कोणती कारवाई करतो, याकडेही लक्ष लागून राहणार आहे. मागे इराणच्या पाच सैनिकांना पाकिस्तानने मारले असता, इराणने पाकिस्तानी हद्दीवर क्षेपणास्त्रांनी मारा केला होता. पाकिस्तान हा असा देश आहे, ज्याने संपूर्ण जगात आपले शत्रू निर्माण केले आहेत. आधी पाकिस्तानला मदत करणारी अमेरिका आज भारतासोबत आहे. हे मोदी सरकारचे मोठे यशच म्हणावे लागेल. ओसामा बिन लादेनला लपविण्याची घटना आणि त्यानंतर अमेरिकन कमांडोजनी त्याचा केलेला खात्मा, यानंतर अमेरिकन जनमानस पाकिस्तानविरुद्ध खवळले होते. त्याचीच परिणती अमेरिका भारतासोबत येण्यात झाली आहे.
 
ताजी घटना म्हणजे सौदी अरेबियाचा सुलतान मोहम्मद बिन सलमान याने नुकतीच पाकिस्तानला भेट दिली व मोठी मदत घोषित केली. नंतर हाच सुलतान भारतातही आला. संयुक्त निवेदनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी पुलवामाचा उल्लेख करून व पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून भारताच्या तीव्र भावना सुलतानाच्या कानी घातल्या. हे आवश्यकच होते. या सुलतानवर पत्रकार खशोगी याच्या हत्येचा आरोप आहे. तसेच त्याने आपल्या देशातील सर्व प्रमुख नेत्यांना, आपल्या नातेवाईकांनासुद्धा तुरुंगात डांबले आहे. सौदीत एकप्रकारे अस्थिरता आहे. हा सुलतान दहशतवादी मोहिमेत काहीही मदत करणार नाही, हे उघडच आहे. तथापि, भारताचे ताज्या घडामोडींवर लक्ष आहे. सुलतानाने पाकिस्तानला जी मदत दिली आहे, ती भारत आणि इराणविरुद्ध वापरण्यासाठी किती दिली आणि पाकिस्तानच्या गरजा भागविण्यासाठी किती, यावर चर्चा सुरूच आहेत.
 
भारतात सौदी अरेबियाने तेल शुद्धीकरण प्रकल्पात मोठा पैसा गुंतविला आहे. तसेच आपल्याला सौदीकडून तेल आयात करावे लागते. एवढाच काय तो भारताचा संबंध. सौदीचा सुलतान अमेरिकेच्या विरोधात पाकिस्तानात बोलला. त्याची दखल अमेरिका कशी घेते, हेही दिसेल. इराणमधील लष्करी जवानांना ठार मारण्याची घटना ताजी आहे. पुलवामा हल्ल्याच्या दोनच दिवसांनंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मायदेशी परतताना इराणच्या मंत्र्यांशी बोलणीही केली आहे. एकूणच, पुलवामाच्या घटनेनंतर संपूर्ण प्रमुख देशांनी पाकिस्तानविरोधात एकत्र येणे याला एक आगळे महत्त्व आहे. प्रतीक्षा आहे ती बदल्याची...