ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून हार्दिक पांड्याची माघार
   दिनांक :21-Feb-2019
मुंबई,
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० आणि वन-डे मालिकेतून कर्णधार विराट कोहली भारतीय संघात कमबॅक करणार आहे. त्यामुळे कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी आतुरलेल्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेकडे पाहत आहे. पण, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे.
 
 
दोन टी-२० आणि ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते. मात्र, पाठीच्या दुखण्यामुळे त्याला या मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी त्याबाबतची घोषणा केली. बीसीसीआयने सुरुवातीला जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी प्रकट केली होती, परंतु पांड्याच्या माघारीमुळे जडेजाला संधी मिळाली आहे. पण, जडेजाचा केवळ वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील.तर, पाच सामन्यांची वन डे मालिका २ मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( ५ मार्च), रांची ( ८ मार्च), मोहाली ( १० मार्च ) व दिल्ली ( १३ मार्च ) असे सामने होतील.