रायगडमध्ये बॉम्ब आढळल्याने राज्यात हाय अलर्ट
   दिनांक :21-Feb-2019
- एटीएस सक्रिय
मुंबई,
बुधवारी शहरातल्या काशिमीरा परिसरातील ठाकूर मॉल जवळील रस्त्यावर कमी तीव्रतेच्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील आपटा गावात एसटी महामंडळाच्या बसमध्ये आयईडी बॉम्ब सापडला. हे दोन्ही बॉम्ब पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सापडल्याने सुरक्षा यंत्रणेकडून राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 
 
महाराष्ट्र एटीएस पथकाडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तपसणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या शहरात पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे. दरम्यान, याआधी २२ जानेवारीला इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या १० संशयितांना औरंगाबाद आणि मुंब्रा (ठाणे) परिसरातून अटक केली होती. त्यांच्या या दोन्ही प्रकरणाशी संबंध असल्याचीही शंका मुंबई एटीएसकडून वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे.