सुब्बईत ३ कॉपीबहाद्दरांवर कारवाई
   दिनांक :21-Feb-2019
-सुब्बईच्या शिवाजी आश्रम शाळेतील प्रकार
-पोंभूर्णा केंद्रावर धडकले भरारी पथक
 
 
चंद्रपूर/सुब्बई,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेतल्या जाणार्‍या बारावीच्या परिक्षेला आजपासून सुरूवात झाली. या परिक्षेदरम्यान होणार्‍या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी द्दकश्राव्य चित्रिकरण केले जात असून, सहा भरारी पथकांची करडी नजर आहे. मात्र, तरीही गुरूवारी पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील शिवाजी आश्रमशाळेच्या परिक्षा केंद्रावर भरारी पथकाने धाड टाकली असता, ३ परिक्षार्थी कॉपी करताना आढळून आले. त्या विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. पोंभूर्णा येथील जनता ज्युनीअर परिक्षा केंद्रावरही धाड टाकल्याने कापीबहाद्दरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
  
सुब्बई येथील श्री शिवाजी आश्रम शाळा येथील परिक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरला 278 परिक्षार्थी नियमित आहेत. त्यापैकी १३ परिक्षार्थी अनुपस्थित होते. तर ४ विद्यार्थी अनियमित होते. कारवाई करण्यात आलेला एक विद्यार्थी विहिरगाव येथील साईबाबा महाविद्यालय, इंदिरा गांधी विद्यालयाचा एक, तर शिवाजी आश्रम शाळेच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. ही कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने केली.
 
निरंतर विभागाचे शिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाने पोंभूर्णा तालुक्यातील परीक्षा केंद्रावर धाडी टाकल्या. पोंभूर्णा येथील जनता ज्युनिअर महाविद्यालयाच्या केंद्रावर धाड टाकली गेली. अशी माहिती भरारी पथकातील अधिकार्‍यांनी दिली. भरारी पथकाने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीमुळे गैरप्रकार चालणार्‍या परिक्षा केंद्रावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.