बांग्लादेशमध्ये गोदामाला भीषण आग; ६९ जणांचा मृत्यू
   दिनांक :21-Feb-2019
ढाका;
 
बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका रसायनाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (20 फेब्रुवारी) लागलेल्या या आगीत 69 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गोदामाला लागलेली आग रहिवाशी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. ढाका येथील ज्या परिसरात आग लागली तेथे इमारती आणि हॉटेल्स आहेत. इमारतीतून बाहेर पडता न आल्याने अनेकांना मृत्यू झाला आहे तर अनेक जण भाजले आहेत. केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकची काही दुकानं या परिसरात असल्याने ही आग वाढली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
 
 
 
 
अग्निशमन दलाचे प्रमुख अली अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीषण आगीमधून आतापर्यंत 56 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली असावी असे अली अहमद यांनी सांगितले . सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.