अग्निशमन अधीक्षकाला लाच घेतांना पकडले
   दिनांक :21-Feb-2019
- एसीबीची अग्निशमन कार्यालयात कारवाई
 
अमरावती, 
अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजाराची लाच घेणार्‍या मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधीक्षकाला गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 
 
भरतसिंह मनोहरसिंह चव्हाण (५३) रा. क्रांती कॉलनी असे लाच घेणार्‍या अग्निशमन अधीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणातल्या तक्रारदाराने २० फेब्रुवारीला आपल्या फायर सर्विस फर्मच्या माध्यमातून अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावावर सही करण्यासाठी चव्हाण यांनी ५ हजाराची मागणी केली होती, अशी तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
 
आलेल्या तक्रारीची एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. या पडताळणीत चव्हाण यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी प्रथम ५ हजार मागितल्याचे व पंचासमक्ष ४ हजार लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३ हजार स्वीकारण्याचे मान्य केले. ठरल्यानुसार गुरुवार २१ फेब्रुवारीला एसीबीच्या पथकाने सापळा लावला. सायंकाळच्या सुमारास चव्हाण तक्रारदाराकडून ३ हजाराची लाच घेतांना पंचासमक्ष रंगेहात सापडले. त्यांना लगेच ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक राजवंत आठवले व त्यांचे सहकारी प्रमोद धानोरकर, राजेश कोचे, पंकज बोरसे यांनी पुर्णत्वास आणली.