आणिबाणीतील संघर्षनायिका
   दिनांक :22-Feb-2019
४ जुलै १९७५ रोजी मुकुंद प्रभाकरराव बोबडे यांना, बाळापूर तालुका कार्यवाह म्हणून मिसा कायद्याखाली अटक झाली. त्यांना सकाळी ११ वाजता बाळापूर पोलिसांनी पारस पॉवर स्टेशनच्या ऑफिसमधून ताब्यात घेतले. नंतर त्यांना आमच्या कॉलनीतील क्वार्टरमध्ये आणून क्वार्टरची झडती घेण्यात आली. तिथे त्यांना काहीही आढळून आले नाही. परंतु, आमचे ते क्वार्टर सील करण्यात आले व ह्यांना बाळापूर येथील ठाण्यात डिटेन करण्यात आले. तेव्हा मी दुसर्‍या मुलीच्या बाळंतपणासाठी अकोल्याला माहेरी होते. आमच्या दुसर्‍या मुलीचा जन्म २४ मे १९७५ रोजी झाला. त्यामुळे त्या दिवशी मला ह्यांच्या अटकेबद्दल काहीच माहिती नव्हती.
 
नंतर सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास ह्यांचे चुलत काका मधुकर गोिंवद बोबडे यांंना नगर कार्यवाह म्हणून अटक करण्यात आली व त्या दोघांना एका कोठडीत बंद करण्यात आले. रात्री जेवणही दिले नाही. रात्री तीनच्या सुमारास एका जुनाट ट्रकमधून अकोला सेंट्रल जेलमध्ये आणण्यात आले. सकाळी, वाशीमचे बाबासाहेब धनागरे, (प्रांत संघचालक), वि. घ. देशपांडे (हिंदुमहासभा), अर्जुनराव वानखेडे (मलकापूर), ॲड. मनोहरराव भावे (आकोट), ॲड. गणेशराव खोत, बक्षीमामा (मलकापूर) व इतर काही कार्यकर्ते यांच्याबरोबर जेलमध्ये होते. काही दिवसांनंतर मधुकर बोबडे (काका) यांची प्रकृती बिघडली. जेलचे डॉ. मायी यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अकोल्याच्या मेन हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. पण, पुढे त्यांचे निधन झाले. त्यावेळेच्या तरुण भारतमध्ये ‘आणिबाणीतील पहिला बळी’ म्हणून बातमी आली होती.

 
 
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस, त्यांंच्या आजींना भेटावयास बाळापूर येथे आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत आबाजी थत्ते व इतर संघकार्यकर्ते होते. याच वेळेस ह्यांची सुटका झाली. पण, आठ दिवसांतच ह्यांची भुसावळ पॉवर स्टेशनला बदली करण्यात आली. क्वार्टरला सील असल्यामुळे कपडेसुद्धा आणता आले नाहीत. एखाद् दुसर्‍या ड्रेसवर ते भुसावळला गेले. घरात हेच सर्व भावंडांत मोठे व कमावते होते. दोन लहान भावांचे शिक्षण व एका बहिणीचे लग्न व्हावयाचे होते. वडिलांची थोडी कोरडवाहू शेती होती. पण, सततची नापिकी व दुष्काळ त्यामुळे वडील आधीच हैराण होते.
 
ह्यांच्या पारसच्या मित्रांनी भारतीय मजदूर संघाचे बाबा नागपूरकर, एस. एन. पाटील, के. पी. राऊत, भिडे, चव्हाण, राजनकर, विजय पाटील आदींच्या सहकार्याने, क्वार्टरचे सील पोलिसांकडून काढण्यात आले व मला बाळापूरच्या घरी जाण्याची व्यवस्था केली.
 
पुढे आमचा भुसावळला १२ बाय १० च्या एका खोलीत संसार सुरू झाला. पण नोकरी जाते की राहते, हा संभ्रम होताच. कारण आपल्यांनी जरी साथ सोडली, तरी विरोधकांच्या कारवाया चालूच होत्या. म्हणून ह्यांनी मला डी. एड. करावयास लावले. मी स्वतः त्या काळची पदवीधर होती. त्यामुळे यावल व भुसावळ येथे कॉन्व्हेंटमध्ये ७० रुपये पगारावर नोकरी मिळाली. तेवढाच बुडत्याला काठीचा आधार. असो.
 
ह्यांच्या संघकार्यात त्यावेळेसचे जिल्हा प्रचारक राजाभाऊ देशपांडे, विभाग प्रचारक शरदराव चौथाईवाले, विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत, जिल्हा कार्यवाह नानासाहेब घाटे, गणेशराव खोत, भाऊसाहेब नाईकवाडे, बाळापूरचे नगरसंघचालक ॲड. भाऊसाहेब सोमण, वाडेगावचे मधुकरराव म्हैसने व ॲड. मानकर, पातूरचे अनंतराव देशपांडे, चान्नी चतारीचे राजाभाऊ चानकर, आलेगावचे नाना पाटील, लोहार्‍याचे ठाकूर, डोंगरगावचे सावजी (चहावाले), हातरुणचे जोशी व हरिभाऊ सावजी, खंडाळ्याचे वसंतराव (बापू) देशमुख (पुढे जिल्ह्याचे जनसंघाध्यक्ष), पारसचे उत्तमराव लांडे आदींचे बहुमोल सहकार्य लाभले. म्हणूनच यांना प.पू. गुरुजींना चांगला अहवाल देण्याचे भाग्य लाभले. ह्यांना आजही सार्थ अभिमान वाटतो.
हे नेहमी म्हणतात की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनातील तो सर्वात संस्मरणीय आणि प्रेरणादायी असा क्षण आहे आणि आपण स्वीकारलेल्या विचारसरणीबद्दल ह्यांना धन्यता वाटते.
 
- विजया मुकुंद बोबडे