क्रिकेटमध्येही पाकविरोधी सूर!
   दिनांक :22-Feb-2019
पुलवामा घटनेचे पडसाद देशपातळीवर तर उमटलेच, शिवाय या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील निंदा झाली. सर्वत्र एकच सूर होता आणि सर्वांच्या टीकेचा केंद्रिंबदू पाकिस्तानच होता. जैश-ए-मोहम्मदने पुलवामाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि या घटनेचे सारे तार कुठवर जुळले आहेत, हे ओळखायला गुप्तचर संस्था आणि जाणकारांना वेळ लागला नाही. असे कदाचितच एखादे क्षेत्र अथवा देशाचा भूभाग अस्पर्शित राहिला असावा, ज्या ठिकाणाहून या भ्याड हल्ल्याचा निषेध झाला नसावा. भारतातील क्रीडाजगतही या हल्ल्यामुळे चिंताग्रस्त झाले आणि या सार्‍यांनी पाकिस्तानविरोधी राग आळवला. सारा देश एकसुरात बोलत असताना क्रिकेटपटू त्यापासून दूर कसे राहावेत? भारत-पाकिस्तान क्रिकेट, उभयतांमधील शत्रुत्वामुळेच जास्त चर्चिले जाते. भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी पुलवामा घटनेचा निषेध करून, या निंदनीय घटनेतील दोषींना कठोर शिक्षा ठोठावली जावी, अशी इच्छा प्रकट केली. या क्रिकेटपटूंनी सामाजिक भान जपत सर्व शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची मनीषादेखील व्यक्त केली.
 
रणजी चषकावर नाव कोरलेला विदर्भ संघही शहीद जवानांच्या पाठीशी उभा झाला. या संघाने त्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतील २५ टक्के वाटा शहीदांच्या परिवाराला देण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने कठोर भूमिका घेतली असून, सरकारने होकार भरला तरच विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत पाऊल पुढे टाकले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सामने खेळू नये, अशी भूमिका काही क्रीडा संघटनांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर २७ फेब्रुवारीला मँचेस्टर येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या बैठकीत भारत-पाक सामन्याबाबत अंतिम निर्णय व्हावा. वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामन्यांवरही संकटाचे काळे ढग घोंगावत आहेत. मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये इम्रान खानच्या छायाचित्रावर पडदा झाकण्याचा घेण्यात आलेला निर्णय, क्रीडापटूंचा संताप किती तीव्र आहे, हे सांगणाराच म्हणावा लागेल.
 
मुंबईसारखाच निर्णय चंदीगड, दिल्ली आणि बंगलोरमध्येही घेतला गेला. या सर्व ठिकाणी पाकिस्तानी खेळाडूंची छायाचित्रे काढून टाकण्यात आली.  अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग यांनीही पाकिस्तानविरुद्धच्या त्यांच्या भावनांना मोेकळी वाट करून दिली आहे. युजवेंद्र चहल याला पाकिस्तानविरुद्ध युद्धच छेडायचे आहे. तो म्हणतो, आता आपण गप्प बसून चालणार नाही. आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे. दर दोन-चार महिन्यांनी भारताचे जवान शहीद होत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध हा एकमेव पर्याय असल्याचे त्याचे मत आहे. या सार्‍या भावनांची दखल भारत सरकार घेणारच आहे. पण, या सार्‍या प्रतिक्रिया ऐकल्या तर भारतीय क्रीडाजगत किती क्षुब्ध झाले आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहात नाही. एकीकडे भारतीय नागरिकांकडून सरकारवर, पाकिस्ताविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, यासाठी दबाव वाढत आहे आणि दुसरीकडे लोकांच्या अपेक्षांची पूर्ती होत असल्याचे प्रत्यक्ष मैदानावरही दिसत आहे. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढला जाणे, हा निर्णय भारताच्या दृष्टीने पाकने सारी सहानुभूती गमावल्याचेच सांगणारा आहे. पाकिस्तानी वस्तूंवरील आयात करात २०० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही या देशातील व्यापारावर परिणाम करणारा ठरणार आहे. या देशातील कलाकारांवरही बंदी घालण्याचा निर्णय अनेक सांस्कृतिक संघटनांनी घेतलेला आहे. 
 
 
 
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी या देशाचे पंतप्रधान इम्रान खान मात्र बिथरले आहेत. त्यांनी मंगळवारी एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध छेडल्यास प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. पण, पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांच्या चलनाचे इतके अवमूल्यन झाले आहे की, एका रुपयात पाकिस्तानची दोन चलने प्राप्त होतात. म्हशी, गाढवे आणि सरकारी गाड्या विकून आला दिवस ढकलण्याची वेळ या देशावर आली असताना, या देशाच्या पंतप्रधानाने अशी धमकी देणे म्हणजे रस्त्यावरील कुत्र्याने हत्ती पाहून भुंकण्यासारखेच आहे!
खरेतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आयएसआय आणि लष्कराच्या हातातील कठपुतळी झालेले आहेत. कुठे काय बोलायचे आणि कुठे नाही, हे सारे त्यांना या संघटनांच्या प्रमुखांना विचारल्याशिवाय बोलता येत नाही.
 
युद्ध पुकारल्यास भारताविरुद्ध आम्ही कठोर भूमिका घेऊ, हे सांगण्यास त्यांना सात दिवस लागले. भारताला इशारा देताना आम्हीसुद्धा दहशतवादाशी लढा देत आहोत, हे सांगताना त्यांनी त्यांच्या देशात दहशतवाद का फोफावला, हे सांगितले असते तर बरे झाले असते. भारत वारंवार घसा कोरडा करून पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन झाल्याचे पुरावे देत आहे. अतिरेक्यांची प्रशिक्षण केंद्रे कुठे सुरू आहेत, पाकिस्तानात कुठल्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे, याची यादी तर भारताने अनेकवार पाकिस्तानला दिलेली आहे. पण, पाकिस्तानी सत्ताधारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. या देशात दहशतवाद फोफावत असताना या देशाची अर्थव्यवस्थादेखील ढासळत आहे. हा देश आर्थिक संकटात गाडला जात आहे.
 
भारताने सर्वोच्च प्राधान्यदेश म्हणून दर्जा काढल्याने या देशाच्या व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे. कारण कुणीही व्यापारी २०० टक्के कर भरून माल पाठविणार नाही. तशीही भारत-पाकिस्तान यांच्यातील व्यापाराची टक्केवारीच अत्यल्प आहे. पण, त्यामुळे काहीच होणार नाही असेही नाही. पाकिस्तानला एकटे पाडण्याच्या भारताच्या जबरदस्त हालचाली सुरू आहेत. पाकिस्तावर दुसरा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करायचा का, याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. पंतप्रधान मोदींनी तर भारतीय लष्कराला कोणतीही कारवाई करण्याचे सर्वाधिकार देऊन टाकले आहेत. एकीकडे सैनिकी कारवाई आणि दुसरीकडे या देशाची कोंडी करणे, त्याला एकटे पाडणे, असेही निर्णय घेतले जात आहेत.
 
भारताने फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) या आंतरराष्ट्रीय गटाकडे तक्रार करून, पाकिस्तान दहाशतवादाला खतपाणी घालत असल्याचे सबळ पुराव्यांनिशी म्हटले आहे. या गटाने जर भारताच्या पुराव्यांच्या आधारावर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले, तर हा देश मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यावाचून राहणार नाही. भारताचा अहवाल ॲक्शन टास्क फोर्सने मान्य करून, तो अहवाल सर्व जागतिक वित्तसंस्थांकडे सोपवला तर या सार्‍या संस्थांना, दहशतवादी राष्ट्र म्हणून पाकिस्तानला चालू असणारी सारी आर्थिक मदत बंद करावी लागेल. पॅरिसमध्ये सध्या या गटाची परिषद सुरू आहे. या बैठकीपुढे भारताने सादर केलेले पुरावे विचारार्थ येणार आहेत. हा समूह दहशतवादाला आश्रय देणार्‍या अनेक सत्ताधीशांना व देशांना नामोहरम करण्यासाठी आर्थिक उपाय सुचवितो. शस्त्रास्त्रांंच्या बेकायदा जागतिक व्यापाराची दखल घेऊन या व्यवहारांची आर्थिक नाकेबंदी करण्याचाही प्रयत्न या समूहातर्फे होतो. क्रीडाक्षेत्रच नव्हे, तर सर्वच आघाड्यांवर पाकविरुद्ध उठणारे सूर या देशाला  चिंतेत पाडणारे आहेत.