पॉलिॲमोरी आणि विवाहसंस्था
   दिनांक :22-Feb-2019
समाज नदीच्या प्रवाहासारखा वाहता आणि परिवर्तनशील असतो. संस्कृतीही एकसंध शृंखलेप्रमाणे, पण थोडेथोडे बदल आत्मसात करीत पुढे जाणारी, अखंड असते. मानवाने समाजजीवनाला सुरवात केली. समाजनियम आणि परंपरांत बदल होत गेले. कौटुंबीक पद्धतीतही बदल आम्ही स्वीकारले. डींक्सचा जमाना सुरू झाला. लग्नापेक्षा लिव्ह इन रीलेशनशीपचा मार्ग काहींनी स्वीकारला. असे सोईस्कर बदल होत गेले. मग समिंलगी विवाह कायदेशीर झाले आणि असे धक्के पचवत, नवा विचार स्वीकारत भारतीय समाज आता जुन्या विचाराजवळ पोहोचला आहे. तो नवा विचार आहे ‘पॉलिॲमोरी.’ कृती जुनीच, पण तिला दिला गेलाय नवीन साज- तात्त्विक मुलाम्याचा.
 
पॉलिॲमोरी हा शब्द प्रसिद्ध झाला होता १९९० मध्ये ग्रीन एग मॅगझीनमध्ये. त्याचं शीर्षक होतं- ‘A Bouqnet of lovers’ -प्रेमिकांचा गुच्छ-गुलदस्ता. लेखक झेल रॅव्हनहार्टला पॉलिॲमोरीची व्याख्या करायला सांगण्यात आली आणि त्याने ती पुढीलप्रमाणे केली- ''The practice, State or ability of having more than one sexual loving relationship at the same time, with the full knowledge and eonsent... of all partners involved.'' म्हणजेच पॉलिॲमोरी ही संकल्पना लैंगिक संबंधाशी जोडलेली आहे. फक्त त्यात कुठलीही लपवाछपवी नाही आणि इतर सदस्यांच्या संमतीने हे संबंध शक्य आहेत. इतरांच्या पॉलिॲमोरीच्या व्याख्याही रॅव्हनहार्टच्या व्याख्येच्या जवळपास जातात.
 
फक्त फरक कुठे पडतो तर बांधिलकीच्या बाबतीत. उदा. वेश्यागमनात कुठलीच बांधिलकी नसते, तर असतो तो फक्त व्यवहार. पॉलिॲमोरस संबंध उघडउघड असू शकतात. कारण इथे संबंधित व्यक्ती, एकाच्या दुसर्‍याशी असणार्‍या अशा संबंधांना मान्यता देतात किंवा असेही असते की, अशा संबंधात असणार्‍या एका गटातील व्यक्ती गटाबाहेरील व्यक्तींशी संबंध ठेवत नाहीत. पहिल्या प्रकारात एका गटातील व्यक्तीचे बाहेरील व्यक्तींशीसुद्धा लैंगिक संबंध असू शकतात. इतर दुसर्‍या प्रकारात असले संबंध एका ठरावीक ग्रुपपुरतेच मर्यादित असतात. म्हणजे तो ग्रुप एका कुटुंबासारखा असतो.
 
 
पॉलिॲमोरीच्या संदर्भात बोलायचे झाले, तर ज्याच्याबरोबर रोज राहतो तो प्राथमिक जोडीदार (प्रायमरी पार्टनर) आणि ज्या व्यक्तीला तुम्ही आठवड्यातून एकदाच भेटता ती द्वितीय जोडीदार (सेकंडरी पार्टनर), असे संबोधिले जाते. पण, अशा प्रकारची नावं अनेक पदरी नातेसंबंध जपण्यासाठी असतात. काही वेळा नवरा किंवा बायको अशा प्रकारच्या शारीरिक नातेसंबंधात गुंतलेले असतात म्हणजे पॉलिॲमोरस असतात. दुसर्‍याला म्हणजेच उरलेल्याला पॉलिॲमोरस व्हायची मुभा असते, परंतु काही वेळा त्याला त्यात रस नसतो. म्हणजेच या व्यक्तीला एकाच व्यक्तीशी म्हणजेच नवरा किंवा बायकोशी असले संबंध ठेवणे योग्य वाटते. परंतु, ज्यांचा कल पॉलिॲमोरीकडे असतो त्यांना एकापेक्षा जास्त व्यक्तींशी शारीरिक संबंध ठेवायला आवडते आणि मग अशा वेळी त्या व्यक्तींशी त्या व्यक्तीचे पूर्ण लक्ष, पूर्ण व्यवधान एकाच व्यक्तीभोवती केंद्रित राहात नाही आणि ही वस्तुस्थिती पॉलिॲमोरस लोकांना पचनी पाडून घ्यावी लागते, स्वीकारावी लागते आणि त्यांच्या उरलेल्या जोडीदारालासुद्धा.
 
ज्या स्त्रीचा नवरा किंवा ज्या नवर्‍याची बायको पॉलिॲमोरस असेल तर तिथे दु:स्वास, हेवा निर्माण होऊ शकतो; अनेक प्रकारची बंधनं घातली जाऊ शकतात. या उलट पॉलिॲमोरस व्यक्तीला प्रत्येक संबंधित अर्थात इन्टीमेट संबंधांत व्यक्तीच्या मर्यादांचा, भावनांचा आदर करावा लागतो. हे प्रकार आव्हानच असते. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता आणि जिच्याशी तुमचे असले संबंध आहेत त्या व्यक्तीचे ज्या दुसर्‍या कुणावर प्रेम आहे आणि त्यांचेही तसलेच संबंध आहेत, त्या व्यक्तीचा (इथे एकापेक्षा जास्त असू शकतात.) तितकाच आदर करावा लागतो; त्यांचे संबंध समजूतदारीने घ्यावे लागतात. म्हणजेच पॉलिॲमोरस लोकांचा दृष्टिकोन अत्यंत विशाल-व्यापक-सर्वसमावेशक असणे अपेक्षित आहे. शारीर नात्याने एकाशी बांधील असतात त्यातला एक जोडीदार अनेकांशी / अनेकींशी तसले संबंध संबंध ठेवून असतो, त्यांना ही गोष्ट स्वीकारावी लागते की त्यात बाबत त्याचा एकट्याचा मालकीहक्क पार्टनरवर नाही. त्याचे दुसर्‍यावर प्रेम आहे म्हणजे त्याचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले आहे, असेही नाही. थोडक्यात काय, तर अशा पॉलिॲमोरी नातेसंबंधांत विशाल दृष्टिकोनाची गरज आहे. मग समजूतदारपणा, सोशीकपणा दाखवायचाच असेल, तर तो सध्या अस्तित्वात असलेल्या कुटुंबपद्धतीत दाखवायला काय हरकत आहे?
 
भारतात आणि जगात इतरत्र या घटकेला छोटाच असणारा, पण निश्चितपणे वाढत जात असलेला हा पॉलिॲमोरस लोकांचा सुमदाय समाजजीवनाच्या मूलभूत पायालाच आव्हान देणारा आहे. समाजजीवनाच्या स्थैर्याचा आधार असणारी विवाहसंस्था आणि त्यातून एकत्र आलेल्या दोन व्यक्ती यांचे स्थिर आणि एकमेकांशी असलेले प्रामाणिक आणि विश्वासपूर्वक जपलेले रोमॅण्टिक संबंध हेच समाजजीवनाचा भक्कम पाया आहेत. या अनेक काळापासून असणार्‍या समजुतीला पॉलिॲमोरी हे जबरदस्त आव्हान आहे आणि हे आव्हान दिले गेले आहे मुक्त संबंधांवर, स्वैराचारावर विश्वास असणार्‍या लोकांकडून. एकमेकांच्या पूर्ण संमतीने ते स्वैराचार करू पाहात आहेत आणि त्याला एकप्रकारचा तात्त्विक मुलामा देऊ पाहात आहेत. लग्नसंस्थेप्रमाणे रूढ करू पाहात आहेत. त्यातल्या प्रामाणिकपणाला ते जास्त महत्त्व देत आहेत. त्यात गैर आहे असे त्यांना वाटत नाही; फक्त जोडीदाराची फसवणूक केली नाही म्हणजे झाले. त्यांच्या मते संमतीने, लपवाछपवी न करता उपभोगलेले लैंगिक संबंध सशक्त आणि आनंददायी असतात आणि त्यांच्याकडे उथळ, वरवरचे, कोणतीही बांधिलकी नसणारे म्हणून पाहायचे नसते. पण, हे सगळे असले तरी तो एकप्रकारे स्वैराचारच नव्हे काय? एकाशी लग्न झाले म्हणून दसरी कोणी व्यक्ती आवडू शकते हे जरी खरे असले, तरी त्या व्यक्तीला प्राप्त करून घ्यायलाच हवे का? आणि तेही या मार्गाने?
 
अशा पॉलिकम्युनिटीचा सेक्सबद्दलचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्यांच्या मते, सेक्स उघडपणे चर्चिल्यामुळे त्याबद्दलच्या संकल्पना निरोगी व निर्दोष बनतात आणि त्यामुळे सेक्स सुरक्षित, आनंददायी आणि परिपूर्ण बनते. पण, हे सर्व एकाच जोडीदाराबरोबर शक्य नाही का? आणि यासाठी अनेकांशी उघड उघड संबंध असणे जरुरी आहे का?
 
पॉलिकम्युनिटीसाठी एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व हा मुद्दा त्रासाचा किंवा चिंतेचा नाही, तर त्यांच्यासाठी लग्नसंबंधामुळे निर्माण होणारी एकपतीत्व किंवा एकपत्नीत्वाची जबरदस्ती त्रासदाक आहे. त्यांच्या मते, या जबरदस्तीमुळे एकपतीत्व/पत्नीत्व प्रत्येकाने पाळलेच पाहिजे आणि त्यातच खूष राहिले पाहिजे, असा समज होतो आणि त्यामुळेच अनेक समस्या निर्माण होतात आणि भारतात तर त्या जास्तच आहेत, असे त्यांना वाटते. पॉलिॲमोरी, पॉलिगॅमी आणि पॉलिॲण्ड्री या संकल्पनात असलेला फरक ध्यानात घ्यायला हवा. पॉलिगॅमीमध्ये एकाच पुरुषाचे अनेक स्त्रियांशी विवाहसंबंध असतात. उदा. राजाच्या, संस्थानिकांच्या अनेक राण्या, जशा दशरथाच्या तीन, शिवाजी महाराजांच्या सात, पॉलिॲण्ड्रीमध्ये एकाच स्त्रीचे अनेक पुरुषांशी वैवाहिक संबंध असतात. या प्रकारची उदाहरणे जवळपास नाहीतच, एकमेव द्रौपदीचे उदाहरण आपण देऊ शकतो. याउलट, पॉलिॲमोरीमध्ये एकापेक्षा जास्त पुरुष आणि स्त्रियांचा समुदाय अपेक्षित आहे. निसर्गत:च जे पॉलिॲमोरस असतात त्यांना विवाहामुळे येणार्‍या एकपतीत्वाच्या/एकपत्नीत्वाच्या बंधनामुळे अपराधी वाटते. स्वत:मध्ये असणार्‍या प्रेमाच्या आणि इच्छेच्या भावनेची लाज त्यांना वाटू शकते आणि परिणामत: झालेले दमन असुरक्षित वर्तनात परिवर्तित होते आणि यामुळे आपल्या कुटुंबापासून ते दुरावतात.
 
पॉलिॲमोरस लोकांचे म्हणणे असेही आहे की, फारच थोडे लोक नशीबवान असतात. कारण त्यांना एकच जोडीदार असा मिळतो की, जो त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण शकतो. दशरथाचे वडील राजा अज यांच्यासाठी त्यांची पत्नी कशी सर्व अपेक्षा पूर्ण करणारी होती, हे सांगणारे एक प्रसिद्ध वर्णन आहे. कशी होती ती? तर-
 
गृहिणी, सचिव: सखिमिथ: प्रियशिष्या ललितेकलाविधौ। पण, सगळेच काही अज राजासारखे नशीबवान नसतात. जोडीदाराकडून त्यांच्या सगळ्याच गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच बहुधा पॉलिमोरस लोकांचा कल वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे गरजा पूर्ण करून घेण्याकडे असावा आणि म्हणूनच अशा प्रकारच्या संबंधांना ते 'deep soul work' असेही म्हणतात. त्यांच्या मते हे प्रेमच आहे आणि ते आत्म्याशी जोडलेले आहे.
 
पण, या सर्व आचारविचारात मुले आणि त्यांच्या जबाबदार्‍या यांचापण विचार करावा लागेल. मुलांच्या जबाबदारीचा, त्यांच्याप्रती असलेल्या कर्तव्याचा प्रश्न कसा सोडवावा लागेल? आपली आई आणि वडील यांच्यातील बेबनाव, त्याचे घटस्फोटात झालेले रूपांतर, मग आई किंवा वडील यांची दुसर्‍या स्त्री किंवा पुरुषाने घेतलेली जागा मान्य करून घेताना मुलांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते आणि काही वेळा त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. तर अशा समस्या आणि इतरही समस्यांचा विचार या मुक्तलैंगिक कुटुंबाच्या बाबतीत करावा लागणार आहे. अशाप्रकारचे संबंध पूर्वी अप्रगत मानवसमूहांमध्ये होते आणि आता पुन्हा नव्या नावाने तीच संबंधपद्धती येऊ घातली आहे.
 
भारतीय लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या विधीला सामोरे जातात. अगदी कान टोचणे, नामकरण विधी यापासून सुरू होणारे विधी मरणाच्या विधीपर्यंत असतात. या वेगवेगळ्या विधींचे वेगवेगळे परिणाम असतात, हेतू असतात. त्या वेळी काही संकल्प सोडतात, निश्चय करतात आणि त्याचे पालन अपेक्षित असते. स्त्री किंवा पुरुष यांच्या आयुष्यात लग्नविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वेळी धर्म, अर्थ (पैसा)आणि काम (सेक्स) या तिन्ही बाबतीत एक संकल्प सोडून नव्या आयुष्याला विश्वासपूर्वक सुरवात केली जाते. धर्मेचार्येच कामेच नातिचरामि। प्रत्येक कर्तव्यात एकमेकांना साथ देत जीवन जगण्याचे वचन दिले जाते आणि समाज याला साक्षी असतो. कर्तव्य पार पाडताना देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि ब्रह्मदेवाचं ऋण फेडणे अपेक्षित असते. ही सर्वच ऋणं महत्त्वाची. पण, त्यातल्या त्यात आपल्या विषयाशी संबंधित आहे पितृऋण, जे समाजाशी निगडित आहे. यात सुप्रज्ञा निर्माण करणे आणि पुढील पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रयत्न करणे; म्हणजेच एकप्रकारे निर्मिती, जतन, संगोपन व संवर्धन याला महत्त्व आहे.
 
यामुळे आपोआपच सुसमाज निर्माण होण्यास मदत होते. अर्थात, तशी अपेक्षा आहे, मग या सार्‍या विचारांना महत्त्व न देता पॉलिॲमोस केवळ लैंगिक सुखाला महत्त्व देत आहेत, असे वाटत नाही का? का निर्मिती, पुढील पिढी वगैरे नकोच, असेही त्यांना वाटते? विवाहविधी म्हणजेच पती-पत्नीने एकमेकांना आणि समाजाला दिलेली सुप्रजेची, सुव्यवस्थेची हमी असते. यात दोन व्यक्तींसोबत समस्त समाजाचाही विचार केला जातो, जो अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे. याउलट, पॉलिॲमोरस विचार केवळ स्वत:पुरता आणि लैंगिक भावनेशी निगडित असावा, असे सकृद्दर्शनी तरी वाटते. पूर्वी मानव अप्रगत होता. प्राण्यांप्रमाणेच निद्रा, भक्ष्य, मैथुन यापुरतेच त्याचे जीवन मर्यादित होते. त्या वेळी असे मुक्तलैंगिक संबंध होते- असणार. पण, आता फिरून पुन्हा त्याच विचाराशी, जीवनपद्धतीशी नवविचार येऊन ठेपला आहे, असे दिसते. Fashions move in circle हेच खरे! पण, पॉलिॲमोरीला काय नाव द्यायचे? काय म्हणायचे? फॅशन? गरज? की वैविध्याची आवड? की दांभिकता?...
 
डॉ. अपेक्षा तारे