पत्र लिहिण्यास कारण की-
   दिनांक :22-Feb-2019
सोशल मीडियाच्या या युगात एका सेकंदात मेसेज फॉरवर्ड होत असला, तरी मनातील नेमक्या भावना पुढच्या चेहर्‍यापर्यंत पोहोचतातच, असे नाही. व्हॉट्‌ॲप किंवा फेसबुकवरील मेसेज बॉक्समध्ये काही वाक्यांचे एका पाठोपाठ तुटके असे मेसेज पाठवले जातात. आणि हॅलो, हाऊ आर यू, येस, नो, थॅक्यू अशाच वाक्यांनी सुरुवात-शेवट होते. आणि मध्ये मूळ विषयावर काहीसं अधुरं बोलल्या जातं.
 
माणसं आणि नाती ही आपल्या खिशात आहेत. वाट्‌टेल तेव्हा मोबाईल काढला जातो आणि पुढच्याला हाय, हॅलो करता येतं. असं असलं तरी, एकमेकांच्या अगदी जवळ असलो, तरी दोन व्यक्तीत युगाचं अंतर वाढलंय्‌, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. घरून निघताना, ऑफिसात, सिनेमा हॉलमध्ये, रेल्वेत, बस स्टेशनवर, काम करताना, चहा पिताना, जेवतांना मोबाईल क्रिनवर बोटं फिरवता येतात. संवाद साधल्या जाऊ शकतो. हा तुटक संवादच असतो की- ज्यामुळे कधी कुणाला जाऊन भेटावसं वाटत नाही. वर्षे वर्षे आता आपण कुणालाही भेटत नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सारं व्हॉट्‌ॲपवर किंवा फेसबुकवर अपडेट आपल्याला माहिती होतं. त्यामुळे आता कुणाला गावी जाऊन भेटण्याची, त्याला किंवा तिला गळ्याशी लावण्याची इच्छा मरून गेली आहे जणू. पूर्वीच्या काळी असं नव्हतंच. तेव्हा पाठवण्यात येणारी सविस्तर पत्र प्रेमानं, वात्सल्यानं, ओतप्रोत राहायची. पुढच्याच्या मनात आपल्याविषयीची तन्मयता लिहिणार्‍याच्या शब्दाशब्दातून जाणवायची. युग सोशल मीडियाचं आलं आणि तो जिव्हाळा जणू संपूनच गेला. आपला कोण, परका कोण, याचा उलगडा व्हायच्यापूर्वीच आज दुपारी भेटलेल्या चेहर्‍याचा मेसेस आपल्या व्हॉट्‌ॲपवर तयार असतो, आणि त्याच्यासोबत बोलण्यात आपली रात्रीची झोप उगीच खर्च होते. त्याचा फायदा त्यानं काढून घेतल्यावर त्याचा आपल्याला परिचय होतो, आपला उताविळपणा आपल्यालाच मनस्ताप देतो. पण इतक्यात दुसर्‍या कुणाचे जे आजच आपल्याला भेटले, त्यांचे नवीन मेसेस आपल्या व्हॉट्‌ॲपवर येऊन तयार असतात.
 
 
तेव्हाच्या त्या पत्रातून अशी फसगत व्हायची काय, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींच्या पत्राची आपल्याला आतुरतेनं वाट राहायची. येणार्‍या पत्रातून आपल्याला त्याचं मन कळायचं. त्याच्या मनातील आपल्याविषयीची आपुलकी कळायची.
ज्याही घरात साठच्या घरात जीही वृद्ध मंडळी आहे, त्यांना आता या सोशल मीडियाच्या काळात जीव मेटाकुटीस आला आहे. घरात ज्याही अनेक कारणांमुळे त्यांची जी कोंडी होते, त्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सांगायचं झाल्यास, अशी वृद्ध मंडळी आता पूर्णपणे एकटी पडली आहे, जी घरात आहे, त्यांच्या डोळ्यासमोर मुलं आहेत, नातवाडं आहेत. पण सारे मोबाईलमध्ये गुंग आहेत. कुणाला मेसेज येतोय्‌, कुणाला कॉल येतोय्‌ तर कुणी मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त आहेत. पण त्यांच्यापुढे आता पर्याय नाही. काही घरात अशी वृद्ध मंडळी आपल्या मुलाला म्हणतातही, काही सांगतातही तर ‘‘आता अपडेट राहायचं असल्यास मोबाईलशिवाय पर्याय नाही. त्यावर ऑफिसचे मेल येतात. माझा व्यवसाय चालतो.’’ अशी उत्तर ऐकायला मिळातात आणि ते खरंही असतं.
 
जग खरंच बदललं म्हणा की, आणखी काही- पण प्रत्येक चेहरा आपल्या दुनियेत आता व्यस्त झालाय्‌. आता एखाद्याच्या हातात मोबाईल द्या आणि त्याला एकटं सोडून द्या. तो आपल्या जगात खूष राहील त्याला तुमची आठवण येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीची ही एक हकीकत आहे, की- घरात राहणारी एक वृद्धा एकटेपणाला कंटाळली होती. घरात मुलगा, सून, दोन नातवंडे इतके सारे सदस्य होते पण तिच्याची बोलायला कुणाजवळ वेळ नव्हता. तसं तिला काही कमी नव्हतं. पण संवाद कुणाशी होत नव्हता. काही दिवसांनी ती आजारी पडली, तेव्हा हॉस्पिटलला जाताना ती गाडीत होती आणि तिचा मुलगा फोनवर बोलत होता. दोन दिवस ॲडमिटही होती, पण भेटायला येणारी सून अर्धा दिवस जरी आली तरी ती फोनवरवरच व्यस्त राहायची. महिला मंडळाच्या मिटिंग, मैत्रिणींशी गप्पा, शेजार्‍यांशी बातचित तिचं सारं तिथंच व्हायचं. ती म्हातारी बरी झाली आणि घरी गेली आणि तिला उलगडा झाला की इथे जो कोंडमारा होतोय्‌, की कुणाशी बोलायला मिळत नाही आणि मन हलकं होतं नाही, हेच कारण आहे की मी आजारी पडलीय्‌. शेवटी तिनं निर्णय घेतला की- आपल्या गावी आता परत जायचं. गावातलं घर निट करून जी शेती आहे, त्यात मन रमवायचं. तिने मुलाला सांगीतलं. मुलानं मान्य केलं. गावात राहा, जेव्हा वाटलं तेव्हा परत ये. शेती करायची काय गरज मी पाठवतो पैसे, असंही त्यानं तिला समजावलं. आणि एक गोष्ट त्यानंही मान्य केली की- खरंच इथं सारं काही असलं तरी आपल्याजवळ तुझ्यासाठी वेळ नाही.
 
ती गावात राहायला आली आणि आपल्या जुन्या बायकांसोबत गप्पा गोष्टीत रंगून गेली. पण मोबाईल आता तिच्या गावापर्यंत पोहोचला होता पण तेवढ्या प्रमाणात नाही, याची तिला अस्वस्थता वाटत होती. राहून तिला शहरातील आपला मुलगा, सून आणि नातवंडं डोळ्यासमोर येत होती. त्यांना काहीतरी तिला सांगावंसं वाटत होतं. बोलावंसं वाटत होतं. या बदलेल्या काळात काही गोष्टींच्या मर्यादा पाळा, असं सूचवायचं होतं. पण इतक्या तोटक शब्दात फोनवरून बोलून तिला सांगता आलं नसतं. मनाच्या कप्प्यातील त्या भावना तिला सुनेला मुलाला संागता आल्या नसत्या. म्हातारी चार वर्ग शिकली होती. काही वर्षांपूर्वीपासून आता तिनं काही लिहिलं नव्हतं. पण आज पुन्हा हाती पेन्सील धरून मनातल्या भावना तिने लिहायच्या ठरवल्या. एक आई म्हणून आपलं जे कर्तव्य आहे, ते पार पाडलंच पाहिजे, म्हणून तिनं हा निश्चय केला कारण या माध्यमातून तिच्यासाठी ते शक्य होतं.
त्या दिवशी तिने एक लांबलचक पत्र मुलाला लिहिलं. आणि ते सुनेनंही वाचावं अशी सूचना केली. तिच्या मुलानं तिचं पत्र वाचलं का, सुनेनं वाचलं का, हा भाग वेगळा!
 
पण आज अशीच काही परिस्थिती आपल्या अवतीभवती निर्माण झाली आहे. मानसं एकमेकांपासून दूर जाताहेत. मुलं मोठी झाली की आई-वडिलांच्या जरी ते डोळ्यासमोर राहतात तरी त्यांच्यात दुरावा निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणारा माणूस काही दिवसांच्या सुट्टीवर घरी येतो तरी तो सर्वात राहूनही एकटाच असतो. मनात जेही काही होतं ते मनात राहून गेलं, याची त्याला जाणीव होते. आणि अशी जाणीव आज प्रत्येकाला होते. तासन्‌तास मोबाईल चाळल्या गेल्यानंतरही दहा मेसेज पाठवल्यानंतर मन हलकं होत नाही, याचं कारण काय असावं?
लग्नानंतर पती-पती वेगवेगळ्या शहरात जॉबला होते. पण पतीला कधीच वाटलं नाही की- मी तिला थोडाही ओळखतो. तिलाही कधी तेवढा वेळच नव्हता. त्यानं बर्‍याचदा ठरवलंही मनातलं बोलायचं. पण ते शक्य होत नव्हतं. शेवटी पत्र हाच त्याला शेवटचा पर्याय वाटला त्यानं सुरुवातच केली.....
 
‘कितीतरी वर्षांपासून आपण मेसेस पाठवतोय्‌... फेसबुकवर तुझे रोजचे अपडेट मी जवळून पाहतोय्‌. पण खरं सागू- मी मनातलं तुझ्याशी कधी बोललोच नाही. तो संवाद मला साधताच आला नाही, जो मला साधायचा होता, म्हणून हे पत्र......हे तुला कंटाळवाणं वाटेलही, कारण तुला असं काही वाचायची सवय नाही. पण वेळ काढ आणि वाच....मला आज तुझ्यासमोर व्यक्त व्हायचं्‌, पहिल्यांदा आणि शेवटांदा......’
 
आपले संस्कार आपली मूल्य यांच्या जोरावर आपली नाती, टिकून आहेत. ही बाब आपल्या समजतंही पण उमजत नाही. आणि त्यासाठी आता आपल्याला सतर्क होणं गरजेचे आहे. धावपळीच्या या युगात आठवड्यातील एक दिवस तरी मोबाईल सारख्या गॅजेटला आता पूर्णपणे सुट्‌टी देणे गरजेचे आहे, आपल्या मुलांचे प्रश्न, त्यांच्या समस्या घरातील प्रमुखांकडून ऐकल्या गेल्या पाहिजे. मुलांनाही पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. आपल्या अडचणी सांगीतल्या पाहिजे. असं जर झालं नाही तर सारं जगणं एक दिवस निरर्थक होऊन जाईल. ज्या सोशल मीडियाचे आपल्या येणारे मेसेज, व्हिडीओ हे आपलं जग नाही. त्यात हरवून आपला तेवढा फायदा नाही. संकटाच्यावेळी ते आपल्याला सावरणार नाहीत. आपली नाती, आपले जवळचे मित्र हेच आपल्याला कामी येणार नाही. त्यांच्याशी मनमोकळेपणाचा संवाद व्हायला हवा. त्यासाठी कधी मग लांबलचक पत्र लिहावी लागली, तरी हरकत नाही.
 
-दीपक वानखेडे