मिळालेली रोजगाराची संधी टिकवणे आवश्यक : डॉ. चांदेकर
   दिनांक :22-Feb-2019
-अमरावती विद्यापीठात विभागीय रोजगार मेळावा
-चार हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग
 
अमरावती,
रोजगार मेळाव्यांतुन दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाते. परंतु, रोजगाराची संधी प्राप्त झाल्यावर ती टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या भविष्यासाठी आजच्या युवा पिढीने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.
 

 
 
विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन विद्यार्थी भवनात करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून कुलगुरू बोलत होते. यावेळी मंचावर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपसंचालक एस.आर. काळबांडे, सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर, डॉ. गजानन गुल्हाने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे, एल.एल.ई.चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगार देण्यासाठी आमंत्रित केले आहे, पण नोकरीसाठी उमेदवारांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, रोजगार मिळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच समयसुचकता आणि चाणाक्ष बुद्धीमत्ता सुद्धा आवश्यक आहे. 
 
यावेळी नामांकित कंपन्यांचे उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी यांचा संत गाडगे बाबांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रांजली बारस्कर यांनी केले. या महामेळाव्यात चार हजारांच्यावर उमेदवारांनी नोंदणी केली.