कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला
   दिनांक :22-Feb-2019
मुंबई:
 
मराठीतून बोलण्यास सांगितले म्हणून एका कुरियर बॉयने दोन तरुणींवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिवाजी पार्क परिसरात घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

 
शिवाजी पार्क पोलिस ठाणे आणि शिवसेना भवनपासून काहीच अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीत ही घटना घडली. या इमारतीमध्ये सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर या दोघी राहतात. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरियर घेऊन आलेल्या तरुणाला या युवतींनी मराठीत संवाद साधण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने शिवीगाळ करत एका युवतीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केला तर, दुसरीच्या डोक्यात ठोसा लगावला.
या तरुणींनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी तरुणाला पकडून शिवाजी पार्क पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून आरोपी युवक हा बांगलादेशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.