अपंग कोल्हा की दयाळू वाघ?
   दिनांक :22-Feb-2019
नमम 
श्रीनिवास वैद्य
९८८१७१७८३८ 
एका धार्मिक माणसाला अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होण्याची इच्छा झाली आणि तो जंगलात जाऊन जप करू लागला. जप करता करता त्याची दृष्टी जवळच एका कोल्ह्याकडे गेली. या कोल्ह्याचे पुढचे दोन पाय तुटले होते. त्याला शिकार करणे शक्य नसतानाही तो कोल्हा इतका धष्टपुष्ट कसा, याचे त्या व्यक्तीला आश्चर्य वाटले. परंतु, तिकडे लक्ष न देता त्याने जप सुरूच ठेवला. अंधार पडला. याचा जप सुरूच होता. तितक्यात त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. एक वाघ येत होता. हा घाबरला. जपवगैरे बाजूला ठेवून जवळच्या एका झाडावर चढून बघतो तर काय? वाघाने तोंडात धरून आणलेला मांसाचा एक तुकडा त्या कोल्ह्यासमोर टाकला आणि निघून गेला. हा चकित झाला. एक क्रूर वाघ, अपंग कोल्ह्यासाठी दररोज मांस आणतो! यात काहीतरी दैवी संदेश असला पाहिजे. काय असेल हा संदेश? तो स्वत:शीच विचार करू लागला. ‘या जंगलात एक क्रूर वाघ अपंग कोल्ह्यासाठी मांसाची व्यवस्था करत आहे. हे जंगल चमत्कारांनी भरलेले दिसते. अरे मूर्खा! तू तर अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर आहे. मग तुला खाण्याची िंचता करण्याची काय गरज आहे? तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपोआप होईलच की...’ स्वत:च शोधून काढलेल्या या दैवी संदेशावर तो खूष झाला आणि दुसर्‍या दिवशीपासून त्याने पुन्हा जप सुरू केला.
 
हळूहळू त्याच्या शरीरातील त्राण संपत गेले. सात-आठ दिवसांनी तर तो बसूही शकत नव्हता. कण्हत पडून राहिला. योगायोगाने त्या जंगलातून एक योगी जात होता. त्याला कण्हण्याचा आवाज आला म्हणून त्याने इकडेतिकडे बघितले, तर त्याला हा माणूस दिसला. त्याला विचारले की, तुझी अशी स्थिती कशी झाली? तो म्हणाला, मला एक दैवी संदेश प्राप्त झाला आणि त्याचे अनुसरण केले तर माझी ही अशी अवस्था झाली. योगी म्हणाला, कुठला दैवी संदेश? त्यावर त्या माणसाने त्याला म्हटले, तो पाहा तिथे अपंग पण धष्टपुष्ट कोल्हा. एक वाघ त्याला रोज मांसाचा तुकडा आणून देतो. यात काही दैवी संदेश आहे असे तुम्हाला वाटत नाही का? योगी हसला आणि म्हणाला, निश्चितच यात दैवी संदेश आहे. परंतु, तू या दयाळू वाघाऐवजी या अपंग कोल्ह्याची नक्कल करणे का निवडले?
 
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या प्रवचनात ही कथा येत असते. आज ती आठवण्याचे कारण म्हणजे, नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. त्या दिवशी एका जाधव नावाच्या व्यक्तीने व्हॉटस्‌ॲपवर संदेश टाकला की, माझ्या घराजवळ शिवाजी जयंतीचा कार्यक्रम आहे आणि तिथे आयोजकांनी सावरकरांची गाणी लावली आहेत. त्यावर दुसर्‍या एका सजातीय व्यक्तीने प्रतिक्रिया दिली की, अरे, आपले मराठे हिंदू धर्माच्या इतके आहारी गेले आहेत की, एखादे दिवशी ते मनुस्मृतीतील श्लोकही लावतील. कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आणि यांचा वाद काय, तर गाणी कुठली लावायची! म्हणजे तेच, नक्कल कुणाची करायची? अपंग कोल्ह्याची की दयाळू वाघाची? हा विवेक गमावून बसलेल्या समाजात आपण राहात आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय घ्यायला हवे, याचा विवेक राहिला नाही की असे वर्तन होते. असे विवेकहीन आचरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. पारतंत्र्याची गोष्ट सोडून देऊ, पण महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावरही हा विवेक राहिला नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेत, त्यांचा अभिमान बाळगत आम्ही राज्य केले, पण कसे केले? शिवाजी महाराजांना अभिप्रेत असल्याप्रमाणे केले काय?
 
 
 
शिवाजी महाराज यांची जन्मतिथी कुठली, याचाच वाद घालत बसतो. एकदा राष्ट्रीय पंचांगाच्या अभिमानी व्यक्तीशी चर्चा झाली. ते म्हणाले, शिवाजी महाराजांनी स्वत:ची मुद्रा काढली. शक सुरू केला. परंतु, आपण मात्र त्यांची जयंती इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरी करतो. ती तिथीप्रमाणे केली पाहिजे. मी म्हटले, ते जाऊ द्या. शिवाजी महाराजांनी िंहदूंचे राज्य यासाठी नाही निर्माण केले. आपली जयंती लोकांनी तिथीप्रमाणे करावी की इंग्रजी तारखेप्रमाणे, यासाठी त्यांनी िंहदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली नाही. एक सांगा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा वयाच्या कितव्या वर्षी घेतली? ते म्हणाले, 16 व्या वर्षी. मी म्हणालो, तुमचा मुलगा १६ व्या वर्षी काय करत होता? जी प्रेरणा जिजामातेने बाल शिवाजीला दिली आणि त्याला शहाजी महाराजांनी संमती दिली, ती प्रेरणा आपण आपल्या मुलांना द्यायचे सोडून, तुम्ही हे भलतेच तारखेचे काय घेऊन बसलात? हे ऐकताच ती व्यक्ती चर्चा गुंडाळून चालती झाली. म्हणजे पुन्हा तेच. दैवी संदेश कुठला घ्यायचा? अपंग कोल्ह्याचा की दयाळू वाघाचा?
 
शिवाजींचे विषाने निधन झाले की व्याधीने? दादोजी कोंडदेव त्यांचे गुरू की नोकर? शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास की संत तुकाराम? अफजलखानाने प्रथम वार केला की शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक की केवळ क्षत्रियकुलावतंस? शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र आम्ही टीव्ही वाहिन्यांवरील सासू-सुनेच्या मालिकेप्रमाणे करून टाकले आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराजांवर एक मालिका सुरू आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व मंत्री संभाजी महाराजांविरुद्ध सतत कटकारस्थाने करीत असल्याचे दाखविले आहे, असे समजते. यातून आम्ही काय संदेश देत आहोत? शिवाजी महाराजांना योग्य मंत्री कसे निवडायचे हेही समजत नव्हते काय? कशाला त्यांनी या असल्या कटकारस्थानी मंत्र्यांच्या हाती सुराज्याच्या कारभाराची किल्ली दिली? हायकमांडचा दबाव होता की राजकीय अपरिहार्यता? ज्यांनी चार-चार सल्तनतींशी लढा देऊन स्वराज्य निर्माण केले ते शिवाजी महाराज इतके दूधखुळे होते की त्यांना आपल्या मंत्र्यांची, स्वपुत्राविरुद्धची कटकारस्थाने समजू नयेत?
 
खरेतर, आम्ही आमच्या समोरील उत्तुंग व महान आदर्शांप्रमाणे होण्याची धडपड करायला हवी होती. आम्ही काय केले? या महान आदर्शांना स्वत:सारखे खुजे करून टाकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र आदर्शांकडून काय घ्यायचे, याचा विवेक सदा जागृत ठेवला आहे. संघाच्या सहा उत्सवांपैकी पाच उत्सव पारंपरिक आहेत. फक्त एक उत्सव वेगळा आहे आणि तो म्हणजे शिवराज्याभिषेकाचा. हा दिवस हिंदुसाम्राज्यदिनोत्सव म्हणून संपूर्ण भारतात साजरा होतो. ज्या सूरत शहराला महाराजांनी दोनदा लुटले तिथेही होतो. आसाम असो की जम्मू, सिमला असो की कोची, सर्व ठिकाणी शिवाजी महाराजांच्या गुणांची उजळणी होते आणि ते आचरणात आणण्याची उपासना होते.
 
आमच्या देशात ‘अकबर द ग्रेट’ म्हटले जाते. ‘अशोका द ग्रेट’ म्हटले जाते. पण, ‘शिवाजी द ग्रेट’ म्हटले जात नाही. कुठल्याही कोनातून बघितले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र या दोघांपेक्षा कितीतरी पटीने, अक्षरश: कितीतरी पटीने इतके भव्य, दिव्य व प्रेरणादायी आहे की, शिवाजी द ग्रेट अशीच मान्यता मिळायला हवी होती. परंतु, काय म्हटले जाते? ‘द ग्रेट मराठा!’ याची आम्हाला खंत नाही.
 
आजकालची आमची मुले ज्या वयात परीक्षा केंद्रावरही एकटी जाऊ शकत नाहीत, त्या वयात शिवाजीने रोहिडेश्वराच्या मंदिरात शिवलिंगावर स्वत:च्या करंगळीच्या रक्ताची धार धरून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि तीही भोसल्यांची इच्छा म्हणून नाही, तर श्रींची इच्छा म्हणून. हे आम्ही कधी समजून घेणार आहोत? केवळ ढोल-ताशा पथक, उंचच उंच भगवे झेंडे, गाड्यांवर व कपड्यांवर शिवाजीचे चित्र, शोभायात्रा... यातच गुरफटून बसणार आहोत का? या समाजाला ‘स्व’ची जाणीव होऊ नये याची काटेकोर काळजी घेण्यासाठी भारताच्या वैचारिक क्षेत्राला मगरमिठी मारून बसलेल्या वामपंथीयांची तर हीच इच्छा आहे. शेवटी पुन्हा तेच... अपंग कोल्हा की दयाळू वाघ? नक्कल करण्याची अक्कलही हवी.