पाकला हरवून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या - सचिन तेंडुलकर
   दिनांक :22-Feb-2019
पाकिस्तानला मैदानात हरवून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या - सचिन तेंडुलकर 
 

 
 
३० मे पासून क्रिकेट विश्वचषकाला सुरवात होणार आहे. यात १६ जूनला भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे; परंतु पुलवामा येथे आलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने हा सामना खेळू नये अशी मागणी काही स्तरातून होत आहे. मात्र, हा सामना रद्द करून पाकिस्तानला फुकटचे २ गुण का द्यायचे? असा सवाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उपस्थित केला आहे. भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.
 
विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तान भारताला पराभूत करू शकला नाही. पुलवामा हल्ल्यानंतर सचिनने त्याचा तीव्र निषेध केला होता. या दहशदवादी हल्ल्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो आपल्या स्टेडियम आणि मुख्यालयातुन हटवले होते, परंतु भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळावा की नाही? याबद्दल क्रिकेट प्रेमींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.