नागपूरची मुग्धा आग्रे उपांत्यपूर्व फेरीत
   दिनांक :22-Feb-2019
- बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडिंमटन स्पर्धा
- वर्मा, कश्यप, जयरामचे आव्हान संपुष्टात

 
 
बार्सिलोना,
युवा बॅडिंमटनपटू मुग्धा आग्रेने अमेरिकेच्या नताली ची हिच्यावर तीन गेममध्ये विजय नोंदवून बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुग्धाच्या रूपाने या स्पर्धेत एकमेव भारतीय आव्हान कायम आहे. सौरभ वर्मा, पारूपल्ली कश्यमप व अजय जयराम या तिघांचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
 
नागपूरच्या १९ वर्षीय मुग्धाने विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत नतालीवर २१-१४, १३-२१, २१-१६ असा रोमांचक विजय नोंदविला. आता जागतिक क्रमवारीत ८२ व्या क्रमांकावर असलेली खेळाडू मुग्धा हिचा सामना अव्वल सीड चीनच्या हान यूएशी होणार आहे.
 
पुरुष एकेरीत राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माला चीनच्या रेन पेंग्बोकडून ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात १७-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला, तर कश्यपला सिंगापूरच्या कीन येऊ लोहकडून १२-२१, २१-१८, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अजय जयरामसुद्धा डेन्मार्कच्या अव्वल सीड व्हिक्टर एक्सेलसेनकडून १५-21, १६-२१ असा पराभूत झाला. कृष्ण प्रसाद गारगा व धृव कपिला ही पुरुष दुहेरीसुद्धा पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाली आहे.