अभाविपची शहीद सन्मान यात्राअमरावतीत देशभक्तीचा जागर
   दिनांक :23-Feb-2019
अमरावती,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शनिवार 23 फेब्रुवारीला शहीद सन्मान यात्रा अमरावती महानगरातून काढण्यात आली. या यात्रेतून देशभक्तीचा जागर झाला. नागरिकांनी ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करून 500 फुट तिरंग्यावर पुष्पवर्षाव केला.
 

 
 
पुलवामा येथे एसआरपीएफच्या जवानांवर आंतकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. संपूर्ण देशातले वातावरण या दुर्देवी घटनेमुळे ढवळून निघाले. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ शहीद सन्मान म्हणून शनिवारी सकाळी 10 शहीद सन्मान व 500 फुट तिरंगा यात्रा दसरा मैदान येथून सुरू झाली. यात्रेच्या सुरूवातीला असलेल्या चारचाकी वाहनावर अमर जवान ज्योतीची प्रतिकृती व शहीद जवनांच्या छायाचित्रांसह भारतमातेचे तैलचित्र होते. समर्थ शाळा, राजापेठ चौक, राजकमल चौका पर्यंत या यात्रेचा प्रवास झाला. या यात्रेत 500 फुटाचा अखंड तिरंगा विद्यार्थी सन्मानाने घेऊन चालत होते. देशभक्तीपर गाणेही वाजविले जात होते. त्यातून देशभक्तीचा जागर झाला. यात्रेचे ठिकठिकाणी जोशपुर्ण स्वागत झाले. पुष्पवर्षाव करण्यात आला. या शहीद सन्मान यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. सोबतच रस्त्याच्या दुतर्फा नागरिक शहीद जवानांच्या सन्मानार्थ उभे होते.
 
 
यात्रा राजकमल चौकात पोहचल्यानंतर भारतमातेचा जयघोष झाला. शहीद जवानांना सामुहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंरत अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य स्वप्नील पोतदार व माजी सैनिक रमेश तराळ यांनी पुलवामा घटनेसंदर्भात भावना व्यक्त करून देशविघातक शक्तींना व आंतकवाद्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी ठोस निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक अजय सारसकर, प्रणित सोनी, चंद्रशेखर कुळकर्णी यांची उपस्थिती होती. राष्ट्रगिताने या यात्रेचा समारोप झाला. महानगर अध्यक्ष प्रा. अनिकेत आंबेकर, प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे, यात्रा संयोजक मंदार नानोटी, यात्रा सहसंयोजक शंतनु आष्टीकर यांच्या नेतृत्वात दुर्गेश साठवने, प्रतिक जोशी, अक्षय फुलारी, शिवानी मोरे, प्रशांत राठोड, जयंत इंगळे, लोकेश मालानी, ऋषभ भुतडा, राम वैद्य यांच्यासह अभाविपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.