इथे जीवनाच्या तुलनेत मृत्यू श्रेष्ठ आहे...!
   दिनांक :23-Feb-2019
 चौफेर 
- सुनील कुहीकर 
  ९८८१७१७८३३
 
प्रत्येक समूहाची स्वत:ची एक स्वतंत्र मानसिकता असते. त्याप्रमाणे वागण्याची त्याची तर्‍हा निश्चित होत जात असते. यात ‘समूह’ या शब्दाला वेगळ्याने अर्थ आहे. त्याचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. यात समूहातील कुणीही समूहाच्या मर्जीविरुद्ध वागणे अपेक्षित नसते. तो द्रोह ठरतो. मनाला पटो वा न पटो, त्यानुरूप वागणे, एवढाच पर्याय समूहातील सदस्यांपुढे उपलब्ध असतो. मग ती कुप्रथा असली तरी अन्‌ ती समाजाकरता घातक असली, तरी प्रत्येकाने त्याची री ओढत जायची. बस्स! बरं, समूहाच्या विरोधात काही बोलायचीही सोय नसते. कारण शेवटी गर्दीची ताकद मोठी. त्याविरुद्ध उभे ठाकणारा एखाद्दुसरा असलाच कुणी माईचा लाल, तरी त्याचा टिकाव लागत नाही गर्दीतील उर्वरितांपुढे. उदाहरण दंगलीचे असो की मग एखाद्याच्या मृत्यूचे. खूप भावुक होतात लोक. मृत्यूच्या बाबतीत तर तसाही खूप संवेदशील होतो समाज आपला. बहुधा त्याच्या लेखी मृत्यूची िंकमत फार मोठी असते. दुसर्‍याचा असला तरी मृत्यूसमोर नतमस्तक होतात माणसं. असं म्हणतात की, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याशी असलेलं वैरदेखील संपुष्टात येतं. आधी घडलेलं सारंकाही विसरून लोक भावनावेगात स्वत:ला झोकून देण्यासाठी सज्ज होतात. बहुधा मृत्यूचं श्रेष्ठत्व सिद्ध होत असावं त्यातून. ते श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात जिवंत माणसांच्या अस्तित्वाचाही विसर पडतो कधीकधी, माणसांच्याच या समूहाला...
 
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या यादीतलं अण्णाजी दत्तोंचं नाव फार कुणाच्या लक्षात राहणारं नाव नाही. त्यांचा पराक्रम देदीप्यमान इतिहास निर्माण करणारा असला तरीही. खरंतर तोंडात तलवार धरून, दोर्‍यांवरून किल्ले सरसर करत, हा हा म्हणता चढून जाणारा हा रांगडा गडी. अण्णाजी दत्तो म्हणजे, स्वत:चा प्राण धोक्यात घालून अनेक किल्ले जिंकून परत आलेला माणूस. पण, त्यांच्या पराक्रमावर पोवाडे गायिले गेले नाहीत की कुठे त्यांचं नाव नोंदवलं गेलं नाही. पराक्रम तर तानाजी, येसाजी, बाजीप्रभूंचाही तितकाच मोठा. पण, मृत्यूच्या वाटेनं जी ख्याती, जी स्वीकारार्हता त्यांच्या वाट्याला आली... पराक्रम गाजवून, साठ माणसांच्या फौजेच्या सोबतीनं पन्हाळगड जिंकण्याचं कसब पणाला लावूनही अण्णाजी दत्तो बेदखलच राहिले इतिहासात. बहुधा, विजयाची पताका जिवंतपणी फडकावण्यात यश मिळाल्यामुळे असेल कदाचित...!
 
 
 
मृत्यूला मूल्य आहे, ही गोष्ट खरीच. पण मृत्यू हे मूल्य नाही. मृत्यूला किंमत केवळ त्यासाठीच्या ध्येयाकरता आहे. ज्या ध्येयासाठी मृत्यू येतो, त्या ध्येयाला मूल्य असते. अन्यथा, नुसत्याच मृत्यूला विचारतो कोण? म्हणूनच मृत्यूला न भिता त्याला सामोरे जाण्याचे धाडस जो दाखवतो, त्या पराक्रमाला लोक कुर्निसात करतात, त्रिवार सलाम करतात, हेही तितकेच खरे. कोंढाणा जिंकण्याच्या इराद्याने, नव्हे, निर्धाराने तिथे दाखल होताना तानाजींना तरी कुठे ठाऊक होते, एका क्षणी सूर्यभानाची समशेर आपली छाती भेदून जाणार आहे म्हणून? खरंतर गड जिंकून परतण्याची, मग रायबाचं लग्न लावून देण्याची स्वप्नं होती त्यांची. आलाच मृत्यू समोर तर त्याच्याशीही दोन हात करण्याची तयारी होतीच. पण, लक्ष्य जिंकण्याचे होते. जिद्द, लढून मरण्याची थोडीच होती? ती तर केवळ जिंकण्याचीच होती.
 
महाराज गडावर पोहोचेपर्यंत, अगदी अंतिम श्वासापर्यंत पावनिंखड लढवणार्‍या बाजीप्रभूंनी मृत्यूला थोडीच साकडे घातले होते? वेळ आलीच तर त्यालाही सामोरे जाण्याच्या निर्धारानंच ते मैदानात उतरले होते, हे तर वास्तवच. पण, वाट्याला आलेल्या मृत्यूने ही माणसं अजरामर झालीत, हेही तितकंच खरं. अन्यथा, तसूभरही कमी पडणार नाही इतका पराक्रम गाजवूनही अण्णाजी दत्तो इतिहासात बेदखल राहण्याचे दुसरे कुठलेच कारण गवसत नाही.
 
आपल्या समाजाचा मृत्यूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा हा परिणाम असेल? अन्यथा 26/11 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान, दहशतवाद्यांशी छातीठोकपणे लढून जिवंत राहिलेल्यांच्या तुलनेत त्यांच्याशी लढताना मृत्युमुखी पडलेल्यांचीच नावं तोंडपाठ का असावीत आमच्या? आताही, पुलवामात दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागलेल्या सीआरपीएफ जवानांसाठी हळहळ व्यक्त करणारा, जागोजागी मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सरसावलेला, अगदी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ प्रवाहित करणारा समाज... कालपर्यंत गावातल्या एखाद्या कुटुंबातला कोणी, आपल्याच रक्षणासाठी म्हणून सीमेवर तैनात असल्याची वार्ताही कानी नसलेला, पण तो शहीद झाल्याची बातमी ऐकताच कानात वारे शिरते सर्वांच्याच? लागलीच राष्ट्रभक्तीचे उमाळे फुटू लागतात सर्वदूर? हा मृत्यूकडे बघण्याचा उदात्त, भावनिक दृष्टिकोन आहे, की जगण्याकडे नैराश्याने बघण्याची तर्‍हा? हा जनमानसात मृत्यूविषयी असलेला नितांत आदर आहे, की जगणे मातीमोल ठरविणारी त्याची विचारशैली?
पुलवामा घटनेत शहीद झालेल्या सैनिकांच्या जीवनाचे मोल चुकविण्याच्या पलीकडले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची नव्हे, सार्‍या देशाचीच झालेली हानी पैशात मोजता येणार नाही अशी.
 
समाजाने त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या भूमिकेवर आक्षेप नाहीच कुणाचा. झालेच तर त्याचे कौतुकच आहे. आक्षेप फक्त एवढाच की, माणसं जिवंत असेपर्यंत या समाजाच्या खिजगणतीतही नसतात. सोबतचे छायाचित्र जरा बारकाईने बघा. त्यात थकलेला एक सैनिक गाडीत खाली बसून झोपण्याचा प्रयत्न करीत असलेला दिसतोय्‌. दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करणार्‍या, लष्करातल्या एका जवानाचे हे हाल दुर्दैवी नाहीत? मेट्रो म्हणजे फारच फार, दुरात दूर तासाभराचा प्रवास. तेवढा वेळ उभे राहिल्याने काही कुणी थकून जाणार नाही. पण, गाडीतील एकाही मर्दाने आपल्या जागेवरून उठून उभे राहात त्या सैनिकाला बसण्यासाठी आपली जागा देत ‘आदर’ दर्शविण्याचा प्रयत्न केलेला नाही. विश्वास बसत नाही, पण हे तेच लोक आहेत, जे शहीद जवांनाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याकरिता अलोट गर्दी करतात. पुलवामा घटनेनंतर ‘याच’ लोकांना राग अनावर झाला होता. हे तेच लोक आहेत, जे आता मृत जवानांच्या कुटुंबीयांना मदत देण्याकरिता धडपडत आहेत? हे तेच लोक आहेत जे पाकिस्तानवर थेट हल्ला करून पुलवामा घटनेचा बदला घेण्याची निकराची भाषा बोलताहेत? हे तेच लोक आहेत, जे राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी सरसावले आहेत. हे तेच लोक आहेत, ज्यांच्या नसानसांतून देशप्रेम ओसंडून वाहात आहे.
 
जिवंतपणी सैनिकांना कवडीची किंमत न देण्याची अन्‌ मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या शर्यतीत सहभागी झालेली माणसं काय कामाची? माणसांचे मोल त्यांच्या मरणोपरान्त जपण्याची ही कुठली पद्धत झाली? जीवनापेक्षा मृत्यू अधिक मोठा, अधिक बलशाली, अधिक महत्त्वपूर्ण ठरविण्याची, मृत्यूनंतर माणसाला ‘मोठे’ करत मानाच्या तराजूत त्याला तोलण्याची ही शैली अनाकलनीय म्हणावी अशीच आहे. म्हणजे एखाद्याचे मोठेपण फक्त त्याच्या मृत्यूनंतरच उमजून घेण्याची ही पद्धत समजायची का? जिवंतपणी कुणाचे मोल कळणारच नाही का आम्हाला? जिवंत असेपर्यंत एखाद्यावर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध चकार शब्द काढायचा नाही. त्याची साधी दखलही घ्यायची नाही. पण, त्याच अत्याचाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली की मात्र हळहळत सुटायचे. मृत्यूनंतर त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी करत सुटायचे. मग आरत्या ओवाळायच्या. मोर्चे काढायचे. जाळपोळ करायची...
 
शिवरायांच्या फौजेतील अण्णाजी दत्तो नावाचा मावळा असो, की मग २६/११ च्या हल्ल्यात शत्रूशी लढूनही जिवंत राहिलेले वीर जवान असोत... मृत्यूपुढे जीवन मर्त्य ठरविणार्‍या मानसिकतेच्या गर्दीपुढे किंमत शून्यच राहिली आहे त्यांची. ज्यांना वीरमरण आले, त्यांचा तर जयजयकार आहेच, पण पराक्रमाचा झेंडा अटकेपार रोवताना ज्यांना मृत्यूलाही हुलकावणी देता आली, त्यांचेही मोल जाणायला शिकले पाहिजे ना समाजाने!