पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य- अजय देवगण
   दिनांक :23-Feb-2019
पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय व्यक्तीने संताप व्यक्त केला असून या हल्ल्याचे चोख उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे. बॉलिवूडमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने (आयएफटीडीए) पाकिस्तानी कालाकारांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आयएफटीडीएच्या या निर्णयाला अजयने पाठिंबा दिला असून हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
 

 
 
 काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना अजयने पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य असल्याचे म्हटले आहे, त्यासोबतच आम्ही लष्कर आणि सरकारच्या सोबत आहोत, असे त्याने सांगितले.
“पुलवामा हल्ल्यात आपल्या जवानांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. त्यांच बलिदान असे व्यर्थ जाणार नाही. आपले सरकार आणि भारतीय लष्कर या हल्ल्याचे नक्कीच चोख प्रत्यत्तर देतील. मला सरकार किंवा लष्कराला कोणतेही सल्ले द्यायचे नाहीत. त्यांना त्यांचे काम माहित आहे. ते आपल्या शहीद जवानांना नक्कीच न्याय मिळवून देतील आणि त्यांच्या या कार्यात माझा कायम त्यांना पाठिंबा असेल”, असे अजय म्हणाला.
पुढे तो असंही म्हणाला, “आयएफटीडीए घेतलेला निर्णय योग्य आहे. पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी योग्य असून माझा याला पाठिंबा आहे”.