भ्रष्टाचाराची स्पर्धा संपली, विकासाचे युग आले; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
   दिनांक :23-Feb-2019
जनतेच्या सहकार्याने अशक्य गोष्टी शक्य झाल्या
 
नवी दिल्ली, 
पूर्वीच्या काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारमध्ये फक्त भ्रष्टचाराची स्पर्धा सुरू होती. सर्वाधिक भ्रस्टाचार कोण करतो, यावर भर दिला जात होता, पण आमच्या सरकारने ही स्पर्धा बंद केली आणि विकासाच्या नव्या युगाला प्रारंभ केला. विकासाचा सर्वोच्च दर गाठतानाच, महागाईचा दर विक्रमी नीचांकापर्यंत आणला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले.
एका इंग्रजी दैनिकातर्फे आयोजित जागतिक व्यावसायिक परिषदेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला 10 ट्रिलियन डॉलर्सच्या घरात नेतानाच, जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या धोरणांची माहिती दिली.
 
 
 
 
संपुआ सरकारने आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात विकासाच्या मंत्राचा कधीच स्वीकार केला नाही. केवळ भ्रष्टाचार आणि विकासात्मक प्रकल्पांना जास्तीत जास्त विलंब कसा होईल, यावरच भर दिला होता. या सरकारमधील प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक व्यक्ती भ्रष्ट होता. सर्वांत मोठा भ्रष्टाचार कोण करतो, यासाठी जणू स्पर्धाच सुरू होती.  भ्रष्टाचाराचे नवनवे प्रकार शोधले जात होते, सर्वांत जास्त काळा पैसा कोण जमा करतो, याची पैज होती. जमीन, पाताळ आणि आकाश यापैकी एकही क्षेत्र संपुआच्या मंत्र्यांनी सोडले नव्हते. या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठमोठे  भ्रष्टाचार केले, असा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.
 
आम्ही हा सर्व प्रकार बघत होतो आणि  भ्रष्टाचाराच्या या स्पर्धेत कोण कोण सहभागी होते, ही माहिती देखील आमच्याकडे आहे. 2014 मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आले आणि  भ्रष्टाचाराची स्पर्धा बंद पाडली आणि विकासावर भर दिला. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात माझ्या सरकारने केलेला विकास लपून राहिलेला नाही. आपण सर्वच त्याचे साक्षीदार आहात. आज प्रत्येक घरात स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन पोहोचले आहे, प्रत्येक घरात वीज आहे. आमच्या सरकारमधील मंत्र्यांमध्येही मोठी स्पर्धा सुरू आहे, पण ती स्पर्धा सर्वाधिक विकास कोण करतो, यावर आहे.
 
जे अशक्य होते ते शक्य झाले
 
आपल्या देशात काही गोष्ट होणे शक्यच नाही, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे; मात्र देशातील जनतेचा पािंठबा व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचा चेहरा बदलला आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. 
 
आमच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेने मोठी भरारी घेतली आहे. यापूर्वी विकासाचा दर 5 टक्के तर महागाईचा दर 10 टक्के असायचा, मात्र गेल्या साडेचार वर्षांच्या काळात महागाईचा दर चार टक्क्यांच्या खाली, तर विकासाचा दर 7 टक्क्यांच्या वर गेला आहे. जीएसटीने जीडीपीच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली आहे. जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या पातळीवर प्रथमच इतके आश्वासक चित्र निर्माण झाले आहे, असे मोदी म्हणाले.