राज्य राखीव पोलिस दलाची नागपूर ते मुंबई जनजागृतीपर सायकल रॅली - १३ दिवसात १५० जवान गाठणार ९३८ किलोमीटरचा पल्ला
   दिनांक :23-Feb-2019
कारंजा घाडगे,
राज्य राखीव पोलिस दलाच्या नागपूर ते मुंबई सायकल जनजागृती मिरवणूकीचे २२ फेब्रुवारीला कारंजा घाडगे येथे आगमन झाले असता उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे कारंजा येथील ठाणेदार व पोलिस कर्मचारी तसाच गुरूकूल काॅन्व्हेंटचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
येथील गुरूकूल इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सादर करून उपस्थितीतांना थक्क करून सोडले.२३ फेब्रुवारी ला तळेगाव येथे माॅडेल हायस्कूल तळेगावचे मुख्याध्यापक विलास वानखेडे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ठाणेदार रवी राठोड व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य राखीव पोलिस दलाच्या ६ मार्चला ७१ व्या वर्धापनदिनाला मुंबई येथे उपस्थितीत राहण्यासाठी १५० जवानांची चमू जनजागृतीपर संदेश देत २२ फेब्रुवारीला नागपूर येथून सायकलने निघाली आहे. लेक वाचवा, पाणी वाचवा, निसर्ग वाचवा, स्वच्छता बाळगा, आईवडीलांची, दिनदुबळ्यांची सेवा करा, देशाचे रक्षण करा असे संदेश देणारी सायकलवरील घोषवाक्याचे बोलके फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
 
 
पुलवामा येथील हल्ल्यातील शाहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ फेब्रुवारीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लीकार्जून व इतर अधिकारीवर्ग उपस्थितीत होते. या रॅलीत ९० जवान जनजागृतीपर संदेश फलक असलेल्या सायकलने निघाले आहेत. त्यांचे सोबत संदेश २ चित्ररथ, बॅडपथक, आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सादर करणारे २२ जवान, ७ अधिकारी असा १५० जवानांचा ताफा राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासाला निघाला आहे. संपूर्ण राज्य राखीव पोलिस दलात एकही महिला जवान नसून सर्व जवान पुरूष असतांना उच्चतम अधिकारी मात्र अर्चना त्यागी या महिला अधिकारी यांची प्रेरणा मिळत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश बेहळे आणि उपनिरीक्षक प्रफुल्ल खडपकर,संतोष भुमकर आणि संजय कुंभार हे तिन उपनिरीक्षकांच्या नेतृत्वात रॅली मार्गक्रमण करीत आहे.
 
 
गणेश बोरोकर, विजय धुर्वे, गुलाब पाटणकर आणि प्रविण गुरव हे जवान सायकलस्वार जवानांना दिशा दाखविण्याचे कार्य करीत आहे. २४ फेब्रुवारीला अमरावती वरून तर्हाळा, २५ ला मेहकर, २६ ला जालना, २७ ला औरंगाबाद, २८ ला घोडेगाव, १ मार्चला धारगाव, २ ला दौंड, ३ ला पुणे, ४ ला खंडाळा, ५ ला बाळेगाव आणि ६ मार्चला मुंबई पोहोचून राज्य राखीव दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सर्वजण सहभागी होणार असल्याचे उपनिरिक्षक कवीमनाचे संतोष भुमकर यांनी तरूणभारतशी माहिती देतांना सांगीतले.