प्रियां(का?) त्याची आली साथ द्याया...
   दिनांक :23-Feb-2019
काळ बदलतो...आता हे काय खूप तत्ववेत्त्याचे िंचतनपर वाक्य नाही. तुम्ही िंचतन नाही केले तरीही काळ आपला बदलतोच. काळ बदलतो, हे सामान्य आहे, मात्र त्यासोबत अनेक गोष्टी बदलतात. माणसांचे जगणे, संस्कृती, शिक्षण... सगळेच कसे बदलत जात असते. आता बघा अगदी तिसेक वर्षांपूर्वी शाळेचा काही खर्च नव्हता अन्‌ तेव्हाच्या सरकारला लोकांनी शिकावे अशी कळकळही नव्हती. त्यामुळे स्कूल चले हम, अशा जाहिराती केल्या जात नव्हत्या. मुलांना घरीच खायला मिळत होतं नि शाळेत शिकायला. आता मुलांना शाळेत खायला मिळतं आणि घरी ती ‘होमवर्क’ करत स्वत:सोबत पालकांनाही शिकवित असतात... तर असे सारखे सुरू असते. त्या काळात विवाह केल्यावरही सोबत राहता येत नव्हते आणि आता सर्वार्थाने सोबत करण्यासाठी विवाहाची अजिबात गरज राहिलेली नाही. तसाच बदल आपल्या लोककथांमध्येही झाला आहे. त्या काळांत एकलव्य नावाच्या एका स्वयंविद्येने धनुर्धर झालेल्या योद्ध्यास त्याच्या मानस गुरुने प्रत्यक्षात त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला होता. आता ती गोष्ट तशी राहिलेली नाही. आता असाच एकलव्य निष्णात धनुर्धर झाल्यावर त्याच्या मानस गुरुने त्याला उजव्या हाताचा अंगठा मागितला तर त्याने तो आताही दिला... मात्र, कागदावर! ही चलाखी आहे म्हटल्यावर तो म्हणाला, तुम्हाला उजव्या हाताचा अंगठा कापूनही देईल मात्र त्याने तुमचा उद्देश काही सफल होणार नाही. कारण मला माहिती होते, तुम्ही भेटल्यावर उजव्या हाताचा अंगठा मागणार आहात म्हणून मी प्रॅक्टिसच डाव्या हाताने केली आहे... तर हे असे बदल होत जातात. तसाच एका कहाणीत बदल झालेला आहे. आताच्या ऋतुत ती कहाणी सांगणे अगत्याचे आहे. कारण आपल्या या कहाण्या सण-वारांच्याच असतात. चातुर्मासाच्या असतात. सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे ही कहाणी निवडणुकीचीच कहाणी आहे... 
 

 
 
आटपाट नगर होतं. ते प्रत्येकच कहाणीत तसंच असतं. ते काही बदललं नाही. तर या कहाणीत त्या नगराचे नाव आट-पाट यासाठी की त्या नगराच्या युवराजाला त्याच्या आईने अत्यंत आट काढून वाढविले होते. खूप आटाआटी करूनही त्याचा पाट (लग्न) काही लागत नव्हते. त्यामुळे हे नगर मग आटपाट नगर झाले होते. आता कसे असते की कुठल्याही युवराजाचे लग्न झाले असले की ते सोयीचे असते. अडचणीच्या वेळी धर्मपत्नीच कामी येत असते. कठीण समय येता पत्नी कामास येते, अशी म्हणच त्या आटपाट नगरात होती. म्हणजे कारकुनापासूच पंतसचिवांपर्यंत सार्‍यांचाच हा अनुभव होता. महिन्याच्या अखेरीस आर्थिक गणितं ढासळली असताना महत्त्वाच्या खर्चाला बायकोच मोहरीच्या डब्यातून जेव्हा पैसे काढून देते तेव्हा मन मोहरून येत असते. मन मोहरणे, असे का म्हणतात, याचा खुलासा तेव्हा होत असतो...
 
तर विषयांतर टाळून आपण मूळ कथेकडे वळूया पुन्हा... तर या युवराजाला ती सोय नव्हती. नाहीतर या आटपाट नगर राज्याच्या उपनगरांत अनेकांनी या सोयीचा लाभ घेतला होता. कचर्‍यासारखे घोटाळे केल्यावर (म्हणजे खूप घोटाळे केलेत, असे) राज्य करण्यास अडचण आल्यावर एका उपआटपाट नगरातील प्रमुखाने आपल्या पत्नीलाच राज्य प्रमुख केले होते... तशी सोय या युवाराजाकडे नव्हती. मातोश्री मात्र थकत चालल्या होत्या. त्या आपल्या मुलाशी (म्हणजे युवराजाशीच) बोलभाषेत संवाद साधायच्या. त्यामुळे त्या एकदिवस त्याला म्हणाल्या, ‘‘तुह लगन होत नाही म्हून मी आता इटली!’’ त्यावर युवराज काहीच बोलला नाही. केवळ त्याची काही प्रमाणात पिकत चाललेली दाढी डाव्या हाताने खाजवीत तो केवळ हसला. तो हसताना हसतोय की रडतोय्‌ तेच कळत नव्हते. त्याच्या राज्यातल्या लोकांनाही ते कळायचे नाही. नंतर त्यांचे राज्य खालसा झाले. मातोश्री म्हणाल्या, माझ्या भरोशावर राहिलास म्हणूनच असे झाले. मी किती दिवस पुरणार तुला?
 
राज्य गेल्याने ज्या राजसभेत युवराज तोर्‍यात वावरत होता तिथे त्याला तोतर्‍यात बोलण्याची वेळ आली. एकदम लाजीरवाणी अवस्था झाली. त्याचे मनसबदार कमी झाले. ज्या राजसभेत त्याची तीन-चारशे माणसे असायची तिथे आता चाळीसही उरली नाही. वय वाढतेय अन्‌ माणसे घटत चालली, अशी दारुण अवस्था. मद्य न घेताही पुत्राची अशी दारुण अवस्था झाल्याचे पाहून त्याची आई अधिकच खंगली. अशात हा पोर मात्र काहीच करायला तयार नव्हता. तो आपला अचानक धनलाभ झाल्यागत गायब झाला. सगळ्यांनाच िंचता लागून राहिली. नंतर कळले की तो कुठलीतरी मन:साधना करायला गेला होता. साधना नावाची कुणी स्त्री बघण्याच्या वयांत आपलं पोर साधना करतो हे पाहून मातोश्री खंगल्याच. त्या पत्रास म्हणाल्या, कर साधना; पण अशाने काही साधना बाबा...
 
काळ सारखा समोर सरकत असतो. त्यामुळे या आपल्या कहाणीतही सरकला. पाच वर्षे सरली. आटपाट नगरात पुन्हा नवा राजा निवडण्याची वेळ आली. हे पोर मात्र गेल्यावेळी कसे गेले राज्य, यावरच िंचतन करत राहिले. मातोश्रीची िंचता आणखीच वाढली. डोळे मिटण्यापूर्वी आपल्या मुलाला राजा झालेला पाहण्याची त्या मातेची खूपच इच्छा होती. हा मात्र असा (ना)लायक. मातोश्री जुन्या सरदारांना म्हणायच्या, माझा लेक राजा बनण्यास लायक आहे ना... तर ते म्हणायचे, होना- लायक आहे! मात्र, पोर काही आशादायी वागत नव्हते.
 
ऐटीत असणार्‍या युवराजाची अत्यंत लाजीरवाणी अवस्था झाली होती. राजसभेत त्याला पकडून आणावे लागायचे. घोटाळ्यांचे शंभर कौरव राजसभेत असायचे. चौकशांचे तांडव सुरू असायचे. अनेक घोटाळे. कौरवांची तर युवराजाला नावेही आठवत नव्हती. तरीही त्यांची चौकशी सुरू होती. त्याच्याच पक्षातले पितामह, गुरू नुसते बघत राहायचे. आता नवा राजा निवडण्याची वेळ आली तेव्हा राजसभेत युवराजाची वस्त्रे चौकशीच्या नावाने उतरविली जात होती. न्यायासन म्हणाले, याला माझ्या मांडीवर बसवा नि मग मी याची वस्त्रे फेडतो. राजवस्त्रे अंगावर असताना याची नीट चौकशीच करता आलेली नव्हती. आता अशावेळी लाज झाकायला कोण वस्त्रे पुरविणार? मग त्याच्या मातोश्रीला आठवले, आपली एक कन्या आहे. म्हणजे याची बहीण आहे. पाठची आहे त्यामुळे आपण तिला कायमच पाठबळ दिले आहे. युवराजाने सत्तेत असताना बहिणीची करंगळी तिच्या पतीच्या घोटाळ्याने कापल्यावर त्यावर राजवस्त्राची िंचधी बांधली होती. आता ते उपकार फेडण्याची वेळ आलेली आहे, असे मातेनेच आपल्या मुलीला बंधूकर्तव्याची आठवण करून दिली. मग राजशकट हाकण्यात आपण येणार नाही, असे म्हणणारी बहीण बंधूप्रेमापोटी समोर आली. आपल्या भावाची लाज आपण राखू शकतो, हे तिला माहिती होते. चौकशीचे कौरव वस्त्रे फेडत असताना पुन्हा सत्ता आणण्यासाठी बहीण वस्त्रे पुरवू लागली आहे. तरी लाज उघडी पडायची ती पडून झालेली आहे. कधीकाळी पुराणात एका हरीने आपल्या भगिनीची लाज वाचविली होती. आता हरुन गेलेल्या भावास बहीण वस्त्रे पुरवित आहे. काळ बदलला की गोष्टीतले संदर्भही कसे बदलतात, हे बघा. प्रियां(का?) त्याची आली साथ द्याया... या प्रश्नाचे नेमके उत्तर हेच आहे, काळ बदलला आहे.