मातीच्या ढिगार्‍याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू - मूल तालुक्यातील चिंचाळा परिसरातील घटना - आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे सुरू होते काम
   दिनांक :23-Feb-2019
मूल,
आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम सुरू असून, खोदकाम केलेल्या दरीत जलवाहिनी जोडून वेल्डींग मारत असताना अचानक मातीची दरड कोसळली. मातीच्या ढिगार्‍याखाली दबून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, सकाळी 10 वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील चिंचाळा परिसरात घडली. जखमीला तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
 
 
 
रवी उईके व हरीदास मनोहर दुधबळे अशी मृत कामगारांची नावे आहेत. जखमीमध्ये गजानन मुरलीधर मेश्राम या कामगाराचा समावेश आहे. विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत सावली तालुक्यातील आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कालव्यात भूमिगत जलवाहिनी टाकली जात आहे. हे काम पुणे येथील एन. एन. के. कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या भूमिगत जलवाहिनीमुळे चिंचाळा गावासह परिसरातील सहा गावांतील शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा मिळणार आहे. ही योजना 24 कोटीची असून, कामावर 42 मजूर कार्यरत आहेत. या कामावर चिंचाळ येथील कामगारासंह अन्य भागातील कामगार कार्यरत आहेत. जमिनीत खोदलेल्या दरीत दोन पाईप जोडून वेल्डींग करीत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. तिघांपैकी दोघे जण मातीच्या ढिगार्‍याखाली दबल्याने मृत्यूमुखी पडले. तर एकाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच चिंचाळवासियांनी घटनास्थळावर धाव घेतली. गावातील मजूर दगावल्याने घटनास्थळावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळावर मूल पोलिसांनी धाव घेवून जमावाला शांत केले. हे काम नदीकाठालगत असल्याने माती नरम असते. केवळ पोकलॅण्ड मशीनद्वारे जमिन खोदली. पण, कुठलीही सुरक्षा व्यवस्था केली नाही. त्यामुळे मातीचा ढिगारा कोसळून मजुरांना जीव गमवावा लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
याबाबत कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत राठोड यांना विचारले असता, या दुर्घनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही, शासनाकडून मदत मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया दिली.