प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक गॉड गिफ्ट असते???
   दिनांक :24-Feb-2019
शिवबांचे संगोपन करताना जिजाऊसाहेब किती दक्ष व चौकस होत्या, हे आपण मागील लेखात पाहिले. शिवबांना ‘घडविले’ जात होते. हुशार, जाणत्या कारभार्‍यांना त्यांच्या सोबतीला देण्यात आले होते. न्याय, शास्त्र, व्यवस्था, सेना, प्रशासन आदी विषयांत शिवबा तरबेज होत होते. आईच्या धार्मिक वृत्तीमुळे त्यांच्यातही संयम, अध्यात्मप्रणवता, समंजसपणा, व्यक्तिगत धवल चारित्र्य, तेजस्वी राष्ट्रीय चारित्र्य आदी गुणांचा समुच्चय होत होता. भविष्यातल्या पराक्रमी आणि दिग्विजयी राजाला एक अधिष्ठान प्राप्त होत होते. नेतृत्व विकसित होत होते.
 
आपल्याकडे एक म्हण आहे- ‘प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्री असते.’ पण, आज आम्ही त्याचा विपर्यास तर करत नाही आहोत ना? कारण आज आपण अनेकदा ऐकतो की, ‘प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे, एक गॉड गिफ्ट असते(?) आपण बघतो की, कुणी कुणाच्या यशाबद्दल बोलू लागला की, लगेच एखादा म्हणतो की त्याला ‘गॉड गिफ्ट’ (दैवीशक्ती) होती म्हणून तो यशस्वी झाला. आम्हाला ते मिळाले असते तर आम्हीही यशस्वी झालो असतो. सचिनची फलंदाजी, धोनीचे नेतृत्व, गीता फोगाटची कुस्ती, मिल्खािंसगचे धावणे, अब्दुल कलामांचे क्षेपणास्त्र, अमिताभचा अभिनय, नारायण मूर्तींचे व्यवस्थापन, आंबेडकरांचा संघर्ष, सावरकरांचे धाडस, शिवरायांचा पराक्रम... या सर्व गोष्टींना आम्ही भारतीय ‘दैवीशक्तीचे वरदान’ असे लेबल लावून चुकलो आहोत. रामचंद्रसुद्धा स्वत:ला देव म्हणवून घेत नाहीत. वाल्मिकी रामायणात अयोध्याकांडापासून
युद्धकांडापर्यंत ‘मला देव म्हणा,’ असे रामचंद्र एकदाही म्हणत नाहीत. उलट ते स्वत: म्हणतात,
‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशस्थात्मज:’ देवावर श्रद्धा असणे वेगळे. त्यात काहीही वाद नाही. आपण देव मानत नसू तर कुठल्याशा एका तत्त्वावर, ज्ञात- अज्ञात शक्तीवर तरी श्रद्धा असावी.

 
संपूर्ण विश्वाचे निर्दोष संचालन करणार्‍या त्या शक्तीला आपल्या परंपरेत निर्गुण-निराकार ब्रह्म तत्त्व मानले गेले आहे. पण, सामान्य माणसाला त्याची आराधना झेपेलच असे नाही. म्हणून त्याला सगुण, साकार रूपात भगवंताची प्रतिमा िंकवा मूर्तीची आवश्यकता असते. अगदी सुरुवातीच्या काळात निर्गुणाचे प्रखर समर्थक असलेले विवेकानंदसुद्धा परमहंसांकडून प्राप्त ज्ञानाने ‘सगुण साकाराच्या पूजेद्वारे निर्गुण निराकाराची आराधना’ हे तत्त्व मांडू शकले. अशा एखाद्या सगुण अथवा निर्गुण शक्तीवर श्रद्धा असावी. नाहीतर व्यक्तीच्या पराक्रमाचे रावणात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. सगळे श्रेय दैवालाच द्यायचे असेल, तर प्रयत्नवादाला कायम मूठमाती द्यावी लागेल. श्रद्धा असणे वेगळे. पण, दैवीशक्तीमुळेच यश मिळाले,
असे म्हणणे हे पूर्णपणे वेगळे.
कविराज भूषण शिवरायांबद्दल म्हणतो,
दसरथ राजा राम भौं वसुदेव के गुपाल।
सोई प्रगट्यों साहि के श्री शिवराज भुआल।।
ज्याप्रमाणे दशरथाचा राम व वासुदेवाचा गोपाळ त्याप्रमाणे शहाजींना शिवाजी हा पुत्र झाला.
रामचंद्रांना वडील होते, मुले होती. शिवरायांना वडील होते, मुले होती. तरीही रामचंद्र व शिवाजींनाच लोकांनी देवत्व का बहाल केले? याचे कारण
एकच आहे की, ज्याने देवांना कैद करून ठेवले होते अशा रावणशक्तीपासून देवांची मुक्तता करणारा मनुष्य हा राम होता अन्‌ ज्यांनी सामान्य जनतेस वेठीस धरून शेकडो वर्षे अनन्वित अत्याचार केले त्या सुल्तानी शक्तींपासून (जनतेची) मुक्तता करणारा शिवाजीराजा होता. रावणाचे व सुल्तानांचे अत्याचार भयावह होते. आपली यातून कधी मुक्तता होईल, हा विश्वासच लोक गमावून बसले होते. राम व शिवाजी यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने दृष्टप्रवृत्तींचा नाश करून व सर्व परिस्थिती पालटवून लावली. त्यामुळे समकालीन लोकांनी त्यांना देवत्व बहाल केले. इथे आपल्या लक्षात येते की, हे देवत्व जन्मप्रदत्त नाही, तर कर्मप्रदत्त आहे. स्वत: विवेकानंद चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील कार्यालयात आपल्या शिष्यांना सांगतात की, राम आणि कृष्ण या दोन्ही महान नायकांच्या गुणांचा समुच्चय शिवाजीराजांमध्ये झाला होता. विवेकानंदांसारख्या द्रष्ट्या
कर्मयोग्याने हे म्हणणे सामान्य नाही. आणि आपण मात्र सातत्याने कर्तृत्ववान माणसांना ‘गॉड गिफ्ट’चे शिक्के मारत राहतो. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा सामान्य मुलगा पेटून उठतो. आयुष्यभर प्रचंड कष्ट उपसतो आणि रिलायन्स नावाची अवाढव्य कंपनी उघडून धिरूभाई अंबानी होऊन दाखवतो. मुंबईतील सामान्य घरातील मुलगा बाराव्या वर्षी ठरवतो की, भारताकडून क्रिकेट खेळेन. त्यानंतर शाळा सांभाळून रोज नऊ तास सराव करतो, साडेतीन वर्षे अथक प्रयत्न करतो. सोळावे वर्ष पूर्ण करताना भारतीय संघात समाविष्ट होतो. आपल्या बावीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये दुयिनेतल्या तमाम दिग्गज गोलंदाजांच्या िंचधड्या उडवितो व विक्रमादित्य सचिन तेंडुलकर म्हणून निवृत्त होतो. केरळच्या एका
सामान्य गावातून आलेला एक सामान्य अभियंता, गुजरातच्या आणंदला पोचतो. संपूर्ण भारत पादाक्रांत केलेली ब्रिटिश कंपनी ‘पोल्सन’ अवघ्या काही वर्षांत नेस्तनाबून करतो आणि एका भव्य भारतीय कंपनीचा शिलान्यास कतो. युवकाचे नाव वर्गीस कुरीयन आणि कंपनीचे नाव होते अमूल. रामेश्वरम्‌च्या सामान्य घरात जन्माला आलेला मुलगा आपल्या शिक्षकांकडून पंखांना बळ प्राप्त करतो. नव्हे, नव्हे, ‘अग्निपंख’ प्राप्त कतो आणि असा झेपावतो की, विश्व त्याला ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणून ओळखू लागतं. पैशांची चणचण असल्याने आय.आय.टी.मध्ये जाऊ न शकलेला बंगळुरूचा युवक साध्या कॉलेजमधून अभियंता बनतो, पुण्याच्या एका खोलीमध्ये एका कंपनीची सुरुवात करतो. आज भारताची पहिल्या तीन
आय. टी. कंपनीमध्ये गणली जाणारी ही कंपनी म्हणजे ‘इन्फोसिस’ व तो युवक म्हणजे एन. आर. एन. नारायणमूर्ती.
हे सर्व दैवीशक्ती प्राप्त लोकं आहेत का? अपयशी, आळशी, कर्मदरिद्री लोकांनी मेहनती, निष्ठावान, शिस्तबद्ध व यशस्वी लोकांचे यश न पचल्याने मारलेला शिक्का म्हणजे ‘गॉड गिफ्ट.’ जो स्वत:च्या आळसापायी रणजी क्रिकेटपर्यंतसुद्धा मजल मारू शकला नाही त्याने सचिनला मारलेला शिक्का म्हणजे ‘गॉड गिफ्ट.’ ज्याला एक साधं दुकान चालवता येत नाही अशा अपयशी व्यावसायिकाने नारायणमूर्तींना मारलेला शिक्का म्हणजे ‘गॉड गिफ्ट.’ आपणा सर्वांमध्ये मेहनतीची आणि पराक्रमाची सुप्त शक्ती असते. जोवर त्याची परीक्षा होत नाही तोवर ते आपल्या लक्षात येत
नाही. स्वत:ला अबला म्हणवून घेणार्‍या महिला, हरयाणामध्ये दोन युवकांनी त्यांची छेड काढली म्हणून त्यांना (युवकांना) पट्ट्याने झोडपून काढतात. रोज गुडघे, पाय दुखतात असे म्हणणारे वृद्धही दुर्घट अशा तीर्थयात्रा पूर्ण करतात. पाच तास काही खाल्ले नाही तर डोके दुखते, असे म्हणणारे नवरात्रीचे नऊ दिवस सहज उपवास करतात. हे आपणा सर्वांमध्ये असलेल्या सुप्त शक्तीचेच निदर्शक आहे. फरक केवळ एवढाच आहे की, सामान्य माणूस जी मेहनत यदाकदाचित घेतो, यशस्वी माणूस तीच मेहनत रोज घेत असतो. पण, दुर्दैवाने आपल्याला त्याचे यश दिसते. (यश खुपतेसुद्धा!)
पण, त्यामागे असलेले त्याचे रक्त आटवणारे कष्ट मात्र आपण नजरेआड करतो.
गालिब एके ठिकाणी म्हणतो की,
उसके मकाम को देखकर, तू रंज मत कर ऐ गालिब
तुने उसे नंगे पॉंव धूप में चलते हुए नही देखा...
म्हणजे आज त्याच्या यशाकडे पाहून तू जळतो आहेस, पण ते यश मिळविण्यापूर्वी त्याला उन्हात अनवाणी भटकताना तू पाहिलेले नाहीस. हे जर आपण लक्षात घेतले, तर आपल्याला कळेल की, प्रयत्न हेच पुरुषार्थाचे सगळ्यात मोठे आभूषण आहे. समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे-
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे।’ पण, समर्थांसारखा थोर विचारवंतसुद्धा गॉड गिफ्टला मूठमाती देतो व म्हणतो- ‘परी त्यासि अधिष्ठान भगवंताचे।’ श्रद्धा देवावर असावी पण प्रयत्न माणसाचेच असतात. आपणही ध्येयाने झपाटलेले व नित्य मेहनतीचा ध्यास घेतलेले
पराक्रमी व्यक्तीच घडवून आयुष्यात पुढे जाऊ या. लोक गॉड गिफ्ट म्हणत असतील, त्यांना म्हणू द्या. आपण मात्र शिवदीपस्तंभाकडून मिळालेला
मंत्र लक्षात ठेवू या की,
‘प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे तिची मेहनत असते.’
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
.............