क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांनी पाकशी नाते तोडावे : राय
   दिनांक :24-Feb-2019
नवी दिल्ली, 
दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानला एकटे पाडायला पाहिजे. त्याकरिता क्रिकेट खेळणार्‍या सर्व देशांनी पाकिस्तानशी नाते तोडायला हवे. जशी दक्षिण आफ्रीकेवर वर्णभेदी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती, असे आवाहन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे संचालन करणार्‍या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी केले आहे.
 
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ओल्ड ट्रॅफोर्ड येथे भारताच्या १६ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गट साखळी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर पकडत आहे. बीसीसीआयने आधीच पत्र लिहून आयसीसीला आग्रह केला आहे की, सर्व राष्ट्रांनी दहशतवाद पसरविणार्‍या पाकिस्तानशी नाते तोडायला हवे.
 
हा केवळ १६ जूनच्या सामन्याचा प्रश्न नाही, तर याकडे मोठ्या दृष्टीकोनातून बघायला पाहिजे, कारण विश्वचषकात उपांत्य किंवा अंतिम सामन्यातही भारताला पुन्हा झुंजावे लागण्याची शक्यता बनू शकते, असेही ते म्हणाले.
 
जर आम्ही विश्वचषकात पाकिस्तानशी खेळलो नाही, तर आम्ही स्वतःच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे होईल. पाकिस्तानवर क्रिकेट खेळणारा देश म्हणून बंदी घातली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले. याकरिता राय यांनी दक्षिण आफ्रिकेचे उदाहरण दिले. १९७० ते १९९१ सालादरम्यान वर्णभेदी धोरणामुळे दक्षिण आफ्रिकेवर बंदी घालण्यात आली होती. अगदी त्याचप्रमाणे पाकिस्तानसोबतही असेच काही करायला पाहिजे. पाकिस्तानवर सर्व क्रीडा उपक्रमातून बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले.