कर्पूरगौर महापुरुष : स्वा. वि. दा. सावरकर
   दिनांक :24-Feb-2019
अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोन जाती
कोणी त्यांची महती गणती। ठेविली असे?
परि जे गजेंद्रशुंडेने उपटिले। श्रीहरीसाठी नेले
कमलपुष्प ते अमर ठेले। मोक्षदाते पावन
अशीच सर्व फुले खुडावी। श्रीरामचरणी अर्पण व्हावी
काही सार्थकता घडावी। या नश्वर देहाची...
मनुष्यदेह हा नश्वर आहे, हे सत्य मान्य असूनही ‘या’ देहाचे जन्माला येण्याचे सार्थक व्हावे म्हणून ‘बुध्याच’ सतीचं वाण स्वीकारणारे क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! स्वदेश स्वातंत्र्यास्तव कापराप्रमाणे स्वत:ला जाळून घेणारे कर्पूरगौर महापुरुष स्वा. विनायक दामोदर सावरकर! त्यांनी जे जे अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि तरीही जे निर्माण केलं, जे कमावलं, जे प्राप्त केलं... ते मिळवणं सोपं नाही. तारुण्याची ऊर्मी कोलू
फिरवता फिरवता खर्ची पडली. दिव्य प्रतिभा रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत गंजून जाण्याची वेळ आली. पन्नाशीनंतर त्यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची पुन:प्राप्ती झाली. स्वतंत्र भारतातही एकदा नाही तर दोनदा कारावास भोगावा लागला. तरीही, आयुष्याचा प्रत्येक क्षण, रक्ताचा प्रत्येक थेंब राष्ट्रोद्धारार्थ वेचला.
 
28 मे 1883 ते 26 फेब्रु. 1966 असा 83 वर्षांचा स्वा. सावरकरांचा जीवनपट न्याहाळला तर लक्षात येतं की, सावरकरांचं जीवन, त्यांची झुंज काही विशिष्ट ध्येयासाठी होती. विशिष्ट निष्ठांना जोपासण्यासाठी होती. त्यांचं संपूर्ण आयुष्य, त्यांचं जीवितकार्य आणि त्यांची साहित्यसंपदा याचा एकत्रित, एकसंध अभ्यास केला म्हणजे लक्षात येतं की, िंहदुत्वनिष्ठा, स्वातंत्र्यनिष्ठा, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिनिष्ठा िंकवा विवेकनिष्ठा या निष्ठा जोपासण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा होम केला. देशभक्ती आणि िंहदुत्वनिष्ठा ही त्यांच्या सर्व जीवनकार्याची प्रेरणा व कारकशक्ती होती. िंहदुत्वनिष्ठा केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी आपले राजकारण, वाङ्मयकारण, समाजकारण, अर्थकारण, पक्षस्वीकार इत्यादी गोष्टी केल्या. स्वातंत्र्यनिष्ठेची बीजं तर लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजलेली होती. बालपणी आपल्या कुलदेवतेसमोर केलेली भीष्मप्रतिज्ञा हेच दर्शवते. ‘‘मातृभूमीच्या रक्षणार्थ मारिता मारिता मरेतो झुंजेन...’’ म्हणजे देशाचे स्वातंत्र्य हेच मूळ ध्येय! मूळ निष्ठा! ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले। वक्तृत्व वाग्‌विभवही तुज अर्पियेले...’ हे शब्द अक्षरश: सत्य आहेत. स्वा. सावरकरांचा प्रत्येक श्र्वास, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय फक्त आणि फक्त देशहितास्तवच होता. त्यांनी मांडलेले स्त्रीविषयक विचार, त्यांनी मांडलेलं िंहदुत्व, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचे द्रष्टेपण... सगळे सगळे केवळ ‘राष्ट्रहित’ या एकाच ध्येयापोटी जन्माला आले.
 
सावरकरांची आयुष्यातली महत्त्वाची 14 वर्षे कारावासात आणि 13 वर्ष स्थानबद्धतेत गेली. शत्रूबरोबरच स्वकीयांचाही विरोध त्यांनी पचवला.
दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ
हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ
ही कृतार्थतेची भावना केवळ परमप्रिय मातृभूमीवरील उत्कट भक्तीमुळेच! तिच्या दास्य विमोचनाचं कार्य म्हणजेच ईश्वरी कार्य ही ठाम धारणा! यातूनच त्यांना प्रचंड मनोबल, श्रद्धाबल, आत्मबलाची प्राप्ती झाली. म्हणूनच, मार्सेलीसच्या उडीनंतर पुन्हा पकडले गेलेले सावरकर स्वत:चे आत्मबल वाढवताना म्हणतात-
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपू जगती असा कवण जन्मला।
अग्नि जाळी मजसी ना खङ्‌ग छेदितो
भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो।।
श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचं तत्त्वज्ञान, ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावक:...’ इतक्या सहजपणे मनात आणि कृतीत उतरवणारा असा हा महापुरुष विरळाच!
 
स्वातंत्र्यवीरांना दोन जन्मठेपांची, 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. अंदमानला नेण्यापूर्वी त्यांना डोंगरीच्या कारागृहात ठेवलं. तिथे त्यांना समजलं की, काही भारतीय राजकारणी मंडळींनी आपली कातडी बचावण्यासाठी सावरकरांच्या कृत्याचा धिक्कार केला. इतकंच नाही, तर एका इंग्लिश वृत्तपत्राने सावरकरांना ‘हरामखोर’ म्हटलं. न्यायसंस्थेनी दिलेल्या निकालावर आनंद व्यक्त करीत त्या वृत्तपत्रानी छापलं की, ‘त्या हरामखोरास त्याचे नशिबी काय आहे, ते आता कळले असेलच...’ सावरकरांच्या जागी क्षणभर स्वत:ला ठेवून पाहा, म्हणजे कळेल काय यातना झाल्या असतील! देशासाठी प्राणार्पण करण्याची तयारी दर्शविणार्‍या थोर देशभक्ताची अवहेलना त्याच्याच देशबांधवांनी करावी? याउलट युरोपातील वृत्तपत्रांनी सावरकरांची प्रशंसा केली होती. पण, सावरकर म्हणजे कोणी सामान्य मनुष्य नव्हते की, िंनदा केल्यावर खचून जावे आणि स्तुतीने हुरळून जावे. ज्या व्यक्तीने या दोन्ही वार्ता त्यांना ऐकवल्या त्याला ते शांतपणे म्हणाले, ‘‘युरोपमधील वृत्तपत्रांनी माझी प्रशंसा ‘हुतात्मा’ म्हणून केली आहे, तर या वृत्तपत्राने मला ‘हरामखोर’ असे संबोधून िंनदा केली. या दोन्ही परस्परविरोधी विधानांनी एकमेकांना खोडून काढले आहे आणि मी खराखुरा जसा होतो तसाच राहिलो आहे.’’ यालाच म्हणायचे ना, ‘सुखदु:खे समेकृत्वा...’ हेच सावरकरांमधील स्थितप्रज्ञाचे दुर्मिळ दर्शन!
 
 
अंदमानचा प्रवास सुरू झाला, त्या बोटीवर तर सावरकरांना अक्षरश: नरकवास भोगावा लागला. बोटीच्या तळमजल्यावरच्या िंपजर्‍यात, जिथे 20-25 माणसे जेमतेम बसू शकतील तिथे 50-60 जन्मठेपीचे कैदी पशूसारखे कोंबलेले. त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी एक िंपप ठेवलेले. िंपपाशेजारचीच जागा सावरकरांना दिलेली. दुर्गंधी असह्य झाल्यावर नकळत हात नाकाकडे गेला. पण त्याचवेळेस सावरकर विचार करू लागले- ‘लोकांच्या विष्ठेपासून तू कितीही दूर पळालास तरी तुझ्या विष्ठेचे पिंप तुला तुझ्या पाठीवरच वाहून न्यावं लागतंय, त्याचं काय? स्वत:च्या मलमूत्राचा उपसर्ग जसा अनिवार्य म्हणून तू सहन करतोस तसाच इतरांचाही का सहन करत नाहीस...?’ अशाप्रकारे इंद्रियांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न आणि तेही इतक्या विपरीत मन:स्थितीत, परिस्थितीत केवळ एखादा योगी पुरुषच हे करू शकतो. हेच सावरकरांमधील योगी पुरुषाचं दर्शन!
स्वा. सावरकर नेहमी म्हणायचे, ‘‘मी जे आज सांगतोय ते दहा वर्षांनंतर लोकांना पटतं. पण, 10 वर्षं थांबण्याची माझी सिद्धता आहे.’’ खिलाफत चळवळ सुरू झाली तेव्हाच सावरकरांनी सांगितलं, ‘‘ही खिलाफत नसून आफत आहे.’’ मुस्लिम लीगच्या वाढत्या मागण्या पाहून सावरकरांनी इशारा दिला की, ‘‘दहा िंसध दिले तरी अकरावा िंसध ते मागतीलच. फाळणीसह स्वातंत्र्याचा स्वीकार करू नका.’ स्वा. सावरकरांनी वेळोवेळी दिलेल्या अशा असंख्य इशार्‍यांकडे आम्ही आणि तत्कालीन राज्यकर्त्यांनीही दुर्लक्ष केले आणि आज...? फाळणी झालीच, पाकिस्तानची निर्मितीही झालीच आणि त्याला आतंकवाद, दहशतवादाची फळे आलीत. आज सावरकरांच्या आत्मार्पणाला 53 वर्षे पूर्ण होत आहेत. सावरकरांनी केलेली भाकिते या 53 वर्षांत सत्यात उतरलेली आपण अनुभवतोय. सावरकरांनी भाकीत केल्याप्रमाणे, पाकिस्तानचा जन्म हा िंहदुस्थानच्या शांततेला आणि अभ्युदयाला बाधक ठरला असल्याचंच आता सिद्ध झालंय.
 
प्रजासत्ताक दिनानिमित्त काढलेल्या पत्रकात सावरकरांनी भूदल, नौदल नि वायुदल या तिन्ही लढाऊ दलात लक्षावधींच्या संख्येने भरती होण्याचे िंहदू तरुणांना आवाहन केले होते. इतकेच नाही, तर ही तीनही दले अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ठेवण्यावरही त्यांनी भर दिला होता. सावरकर म्हणाले होते, ‘‘आपल्या राष्ट्राच्या मोक्याच्या सीमा अजूनही आपल्या शत्रूच्या हातात आहेत. दुसरा ज्या तर्‍हेने आपल्याशी वागतो, त्याच तर्‍हेने त्याच्याशी वर्तन ठेवणे हाच आपले अस्तित्व टिकविण्याचा एकमेव मार्ग आहे. आपले राष्ट्र टिकवायचे असेल नि यशस्वी बनायचे असेल तर ‘जशास तसे’ हेच एकमेव धोरण हवे.’’ आज या तत्त्वाची वारंवार आठवण होतेय.
 
चीनच्या बाबतीतही हेच घडलंय. आम्ही ‘पंचशील’ करारावर आणि ‘िंहदी-चिनी भाई भाई’वर विश्वास ठेवून बसलो आणि चीनने तिबेट घशात घातला. 1962 मध्ये मॅकमोहन सीमेवर नि लद्दाखमध्ये आत धुसून भारतावर आक्रमण केले. आसाम, नागालॅण्ड, काश्मीर, गोमंतक या सगळ्या दीर्घकालीन समस्येची सूचना सावरकरांनी दिली होती, आम्हीच करंटे निघालो. या द्रष्ट्या महापुरुषाच्या कळवळून, पोटतिडकीने केलेल्या सूचनांकडे आम्ही दुर्लक्ष केले.
‘भारताने अधिकाधिक संहारक शस्त्रास्त्रे निर्माण करायला हवीत. प्रबळ सैन्य नसेल तर तुमची लोकशाही ती मग अत्युकृष्ट घटनेची असतानासुद्धा- तुम्हाला पचायची नाही. लोकशाहीच्या मागेसुद्धा शक्ती पाहिजे. शक्ती नाही ते राज्य नाही.’ या सावरकरांच्या विचारांचा आज पुरेपूर प्रत्यय येतोय. अन्यथा, आज आपले अस्तित्वच धोक्यात आले असते. ‘शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालविणे हा युद्ध िंजकण्याचा प्रभावी मार्ग आहे.’ हे सावरकरवचन लक्षात घेऊन जेव्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ घडते, तेव्हा या द्रष्ट्या क्रांतिकारकाचे ऋण मान्य करावेच लागते.
परंतु, केवळ एक साहसी क्रांतिकारक िंकवा द्रष्टा महापुरुष एवढीच त्यांची महती वर्णन करणं अन्यायाचं ठरेल. कारण, त्यांचं व्यक्तिमत्त्व सहस्रपैलू होतं. प्र. के. अत्रेंच्या भाषेत सांगायचे तर, ‘‘गेल्या दहा हजार वर्षांत असा युगपुरुष झाला नाही आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही...’’ तळहातावर शिर घेऊन समरांगणात पराक्रम गाजविण्यासाठी निघालेल्या या योद्ध्याच्या अंतरात कविहृदयाचे स्पंदनही नेहमी चालू असे. ब्रायटनच्या समुद्रकिनार्‍यावर ‘सागरा, प्राण तळमळला’ या अमर काव्याचा जन्म झाला. अंदमानातील कोठडीच्या िंभतीवर घायपात्याच्या काट्याने कोरून लिहिलेले आणि नंतर मुखोद्गत करून ठेवलेले ‘कमला’ हे महाकाव्य त्यांच्या दुर्दम्य कविमनाचाच साक्षात्कार घडविते. त्यांचे काव्य जसे स्फूर्तिदायक, तेजस्वी तसेच त्यांच्या हळुवार भावनांचे आविष्करण करणारेही आहे.
काळ्या पाण्यावरून सुटून येऊन भारतात स्थानबद्ध अवस्थेत काळ कंठीत असता, सावरकरांनी काव्याबरोबरच गद्य लेखनाचाही सपाटा सुरू केला. अस्पृश्यता निवारण चळवळीला त्यांनी वाहून घेतले. रत्नागिरीचे पतितपावन मंदिर हे त्यांच्याच या कामगिरीचे स्मारक आणि प्रतीक आहे. िंहदुसमाज विसकळीत, मागासलेला आणि स्वाभिमानशून्य होण्यास याच गोष्टी कारणीभूत आहेत, असे त्यांचे मत होते. इतर धर्माप्रमाणे आपले दरवाजे सर्व मानवांना खुले न ठेवता िंहदुधर्म बंदिस्तपणातच भूषण मानीत आहे आणि म्हणून हे शुद्धीबंदीचे बंड मोडले पाहिजे व सर्वांना िंहदुधर्मात प्रवेश सुलभ केला पाहिजे, असा विचार आणि त्यानुसार कृती त्यांनी समाजमनात रुजवली. आपल्या विज्ञाननिष्ठ विचारांच्या प्रतिपादनाने विज्ञानधर्म लोकांच्या मनात रुजवला आणि जागृत केला.
 
सावरकरांचे लेखन आणि वक्तृत्वही प्रवाही, आवेशपूर्ण, जाज्वल्य असल्याचा प्रत्यय लोकांना आला. सावरकरांनी लिपीशुद्धी आणि भाषाशुद्धीचीही चळवळ केली. आज प्रचलित असलेले दिग्दर्शक, बोलपट, संकलक, यष्टी, यष्टिरक्षक, महापौर अशासाखे अनेक शब्द ही सावरकरांची मराठी भाषेला देण आहे.
िंहदुसमाजाचे पुनरुत्थान हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले होते. िंहदूंमध्ये लढाऊ वृत्ती बाणवून लष्करीदृष्ट्या ते समर्थ झाले पाहिजेत, हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या लेखातून, कादंबर्‍यांतून आणि नाटकातून हेच सूत्र आढळते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी लेखकांना ‘लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या’ असा आदेश दिला, यावरून त्यांची याबाबतची उत्कटता प्रतीत होते.
आपल्या ध्येय्याप्रती वाटचाल करताना अनेक आपत्तींचे आघात सहन करतच सावरकरांनी महत्कृत्याची अग्निदिव्ये पार पाडली. दुसर्‍या कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वदेशावर अशी नितांत भक्ती असलेला इतका अविश्रांत योद्धा क्वचितच निर्माण झाला असेल. केवळ देशभक्तिप्रीत्यर्थ इतकी कल्पनातीत दु:खे भोगणारा, इतका अभूतपूर्व त्याग करण्यास नि इतक्या भयानक संकटांना तोंड देण्यास सदैव तत्पर असलेला हा कर्पूरगौर महापुरुष! जीवनध्येयाला वाहून घेतलेले कृतिशील महापुरुष!
 
सावरकरांना सत्तेची हौस नव्हती. खुर्चीसाठी, सत्तेसाठी वा नावलौकिकासाठी त्यांनी हे कार्य केलेच नाही. त्यांना हौस होती विशिष्ट काजासाठी, विशिष्ट तत्त्वासाठी जीवन व्यतीत करण्याची. हे जीवन झंझावाती वादळाने भरलेले असो, ज्वालामुखीने वेढलेले असो वा फाशीच्या दोराकडे नेणारे असो, त्याची त्यांना भीती नव्हती. लोकसमूहाची मर्जी संपादन करणे, हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. ‘वरम्‌ जनहितम्‌ ध्येयम्‌ केवला न जनस्तुति:’ हे त्यांचे प्रिय वचन होते.
 
म्हणूनच, जेव्हा सावरकर संपूर्ण बंधमुक्त होऊन िंहदुस्थानच्या राजकारणात पदार्पण करते झाले तेव्हा महाराष्ट्रातच नाही, तर सबंध िंहदुस्थानात- अगदी दिल्लीतही- त्यांचे भव्य स्वागत झाले. ठिकठिकाणी सत्कार समारंभ पार पडले. त्यांची प्रत्येक सभा हजारोंच्या उपस्थितीत गाजली. अनेक ठिकाणी जनतेने त्यांना देवत्व बहाल केले. एक टिळकांचा अपवाद सोडला, तर सावरकरांएवढा सन्मान महाराष्ट्रात कोणालाही मिळाला नव्हता. अगदी सामान्य जनतेनेसुद्धा त्यांच्या देशसेवेचा गौरव केला.
 
अशा या थोर भारतीय नेत्याने 26 फेब्रु. 1966 रोजी आत्मार्पण केलं. 27 फेब्रु. 1966 रोजी अंत्ययात्रा निघाली. सुमारे पन्नास हजार लोक उपस्थित होते. भारताच्या या अग्रेसर स्वातंत्र्ययोद्ध्याची महायात्रा निघाली. रस्त्यात लोकांचे जत्थेच्या जत्थे महायात्रेत सामील होत होते. गर्दी लाखाच्या वर पोहोचली. मात्र, दुर्दैव असे की, सावरकरांना श्रद्धांजली वाहण्यास राज्याचा एकही मंत्री उपस्थित नव्हता.
अखेरपर्यंत सावरकरांच्या मनात एकच शल्य होते, ते म्हणजे- ‘भारताची तीनचतुर्थांश भूमी विमुक्त झाली. परंतु, जिच्या तीरावर पवित्र वेदसूक्ते रचली गेली होती, यज्ञयागातील मंत्रघोष दुमदुमले हाते, त्या िंसधूचे विमोचन अद्याप व्हायचे आहे. ती िंसधू नसती तर िंहदूही नसते! िंसधूविना िंहदू हा शब्द निरर्थक आहे. हे सूर-सरिते िंसधू, इतर सर्वांना तुझा विसर पडला तरी आम्हाला तुझे विस्मरण कसे होईल? कधी तरी मराठी वीर उठाव करतील आणि तुझे विमोचन निश्चितच घडवून आणतील...!’ हीच एक आस अखेरपर्यंत मनात धरली होती.
 
म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, टिळकोत्तर भारताच्या इतिहासात ज्याने कीर्तीची हाव ठेवली नाही, लक्ष्मीची आराधना केली नाही आणि वैयक्तिक मोठेपणाची हाव बाळगली नाही, ज्याने राष्ट्रीय हिताचीच सदैव िंचता वाहिली, राष्ट्रीय एकतेसाठी संपूर्ण जीवन वेचले, मायभूमीचे विच्छेदन टाळण्यासाठी अखंड संघर्ष केला, असा एकमेव कर्पूरगौर महापुरुष... विनायक दामोदर सावरकर!!!
- डॉ. शुभा साठे