ग्रॅज्युएट अॅट्रिब्यूटस्‌
   दिनांक :24-Feb-2019
आज अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टीम (ओबीई)’ म्हणजे अर्थातच परिणाम-आधारित शिक्षण पद्धती या संज्ञेस सर्व जण परिचित आहेत. भारतातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘ओबीई मॉडेल’ वेगवान गतीने स्वीकारले गेले आहे. मान्यता करारानुसार भारतीय अभियांत्रिकी संस्थांकरिता ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए)’ची मान्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. 2014 मध्ये भारत वॉिंशग्टन अॅकॉर्डचा चिन्हक सदस्य बनल्यामुळे आणि एनबीएद्वारे भारतीय राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या स्थायी स्वाक्षरीस्थितीसह भारताचा समावेश झाला असल्यामुळे, भारतातील अभियांत्रिकी पदवीधारक, इतर कोणत्याही देशामध्ये ज्यांनी वॉिंशग्टन अॅकॉर्डचे सदस्यत्व प्राप्त केले आहे, अशा ठिकाणी कार्यरत होऊ शकतो, कारण त्यांची पदवी एनबीए अॅक्रेडिटेड संस्थेची असल्यामुळे त्याला ‘ग्लोबल रेलेव्हन्स आणि ग्लोबल रिकग्निशन’ प्राप्त झाले आहे, असा वॉिंशग्टन कराराचा अर्थ आहे.
‘एनबीए’ने म्हणजेच ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन’ने विद्यार्थ्यांसाठी 12 ‘ग्रॅज्युएट अॅट्रिब्यूटस्‌’ डिफाइन केलेले आहेत. आज अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढण्यासाठी त्यांच्या इंजिनीअरिंग स्किल्स, प्रोफेशनल स्किल्स आणि पर्यायाने ग्लोबल स्किल्स डेव्हलप करण्यासाठी त्यांचे खालील अॅट्रिब्यूटस्‌वर लक्ष केंद्रित करायला हवं आणि त्यांचे मूल्यमापन/मूल्यांकन करून ओबीईसाठी आवश्यक असं अटेन्मेन्ट काढायला हवं.
1. अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राप्त केलेले अद्ययावत ज्ञान हे विद्वत्तापूर्ण, व्यापक आणि सखोल असायला हवे. जागतिक पातळीवर हे ज्ञान गणल्या जावे, अशी प्राथमिक अपेक्षा असल्यामुळे त्याचा ‘स्टेम-बेस’ (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथेमॅटिक्स) याचा सुयोग्य समतोल साधणारा हवा. या ज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी होणे अपेक्षित आहे.
 
2. ‘प्रॉब्लेम अॅनालिसिस’ हे ‘एनबीए’ने डिफाइन केलेले दुसरे अॅट्रिब्यूट आहे. चार वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रात प्राप्त केलेले ज्ञान त्यांना ‘इंजिनीअरिंग सोल्युशन्स’ देण्यासाठी वापरता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना योग्य पद्धतीने ‘लिटरेचर रिव्ह्यू’द्वारे योग्य ‘फॉर्म्युलेशन’ करता येणं आवश्यक आहे.
3. ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ सोल्युशन्स’ हे एक महत्त्वपूर्ण अॅट्रिब्यूट आहे. सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी, तसेच सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अथवा ‘इंजिनीअरिंग सोल्युशन्स’ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे हे अॅट्रिब्यूट कामी येतं.
अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापनात ‘ब्लूम्स टॅक्सॉनॉमी’च्या सहा लेव्हल्स (रिमेम्बर, अंडरस्टँड, अप्लाय, अनलाईझ, इव्हॅल्युएट आणि क्रिएट) अवलंबल्यास विद्यार्थ्यांमध्ये वरील तीनही अॅट्रिब्यूट डेव्हलप होणे सहजशक्य आहे.

 
 
4. ‘कंडक्ट इन्वेस्टिगेशन्स ऑफ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स’ हेदेखील वरील अॅट्रिब्यूटससोबत बांधून बनलेलं सखोल पातळीवरचं अॅट्रिब्यूट आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर प्रामुख्याने इंडस्ट्रीमध्ये ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’मध्ये काम करणार्‍या प्रत्येक अभियंत्याला हे जमायलाच हवे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, आयटी आणि वायल्स कम्युनिकेशन्सच्या टेक्निकल जनरेशन्स झपाट्याने बदलत आहेत. हाय स्पीड इंटरनेट अॅक्सेस आणि मल्टिमीडिया सर्व्हिसेस यातील आवाहनं पेलण्यासाठी आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस देण्यासाठी हे अॅट्रिब्यूट आवश्यक ठरतं.
5. ‘मॉडर्न टूल युसेज’ हेदेखील अत्यंत महत्त्वाचं असं अॅट्रिब्यूट आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अवतीभोवती उपलब्ध असणार्‍या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचा आपलं ज्ञानसंवर्धनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.
सामान्यतः ‘आपल्याकडे पुरेशा रिसर्च फॅसिलिटीज नाही’ अशी ओरड असते. मात्र, ज्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, त्याचा आढावा घेतल्यास असं लक्षात येतं, की आपल्या भोवती आणि आवाक्यात प्रचंड प्रमाणावर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आहे, त्यांचा पुरेपूर उपयोग करून मॉडेल्स बनवण्याची सवय लावून घेता यायला हवी.
(महाविद्यालयांत लॅबमध्ये मॉडर्न टूल्स कपाटात बंद असतात. योग्य प्रमाणावर ते वापरात येत नाही. वर्कशॉप सीरिजच्या माध्यमातून वा त्यावर आधारित प्रोजेक्टस्‌ विद्यार्थ्यांकडून करवून घेतल्यास त्यावरची धूळ नक्कीच झटकली जाऊ शकते.)
6. ‘द इंजिनीअर अँड सोसायटी’ हे अॅट्रिब्यूट डेव्हलप करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांनी डोळस आणि समाजाप्रती सजग असणं आवश्यक आहे. सामाजिक गरजा, आरोग्य, सुरक्षितता, कायदेशीर आणि सांस्कृतिक समस्यांचे आणि व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासाशी संबंधित ज्ञानाचे ‘मॅिंपग’ झाले, की समस्यांचं निराकरण करताना ‘इंजिनीअरिंग सोल्युशन्स’ सहज रीत्या निघू शकतील.
7. ‘पर्यावरण आणि शाश्वत विकास’ यावर या लेखमालेत पुरेसं भाष्य करण्यात आलेलं आहे. एका समृद्ध, आनंदी आणि बलवान राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षणप्रणाली सर्जनशील आणि रचनात्मक बनणं आवश्यक आहे. शाश्वत विकासाची पर्यावरणाला गृहीत धरून पावलं पडली, तर हे अॅट्रिब्यूट सहजसाध्य असेल.
8. ‘प्रोफेशनल एथिक्स’ आणि ‘मॉरल व्हॅल्यू’ या फार महत्त्वाच्या बाबी! नैतिकता, संस्करण, शुचिता, मांगल्य, प्रामाणिकता या सर्व गोष्टी अंगीकारल्यास शाश्वत विकासाचा मार्ग सोपा बनतो. तुमची ओव्हरऑल पर्सनालिटी या दोन गोष्टींनी निखरते. तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात कसं वावरता, कसं प्रभावी बोलता, यातून तुमचे एथिक्स रिफ्लेक्ट होतात. विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्यांचा विकास करण्याचं आणि चांगला क्रियाशील, कृतिशील आणि जागरूक नागरिक बनवण्याचं काम शिक्षकांचं, पालकांचं आणि समाजाचंदेखील!
9. ‘इंडीव्हिजुअल अँड टीम वर्क’: आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी स्वतंत्र रीत्या तसेच ग्रुपमध्ये काम करता आले पाहिजे. स्वतंत्र रीत्या एखादी जबाबदारी पार पाडताना निर्णयक्षमता, ज्ञान, अनुभव आणि संशोधन या सर्वच बाबींचा कस लागतो. टीमसोबत काम करत असताना आपण इतरांसोबत आपले विचार कसे जुळवून योग्य निर्णयाप्रत पोहचतो, याचा कस लागतो. ग्रुपमध्ये काम करण्यासाठी एक प्रकारचं मल्टिडिसिप्लिनरी माईंड सेटअपची आवश्यकता असते.
10. ‘कम्युनिकेशन स्किल’ हेदेखील अत्यंत महत्त्वाचे अॅट्रिब्यूट. हे माध्यम प्रभावी रीत्या वापरल्यास तुम्ही कार्यक्षेत्रात मोठ्या पदावर कार्य करण्यास योग्य बनू शकता. तुमच्या सबऑर्डिनेट्सना योग्य शब्दात सूचना दिल्यास त्यांना दिल्या गेलेले काम योग्य प्रकारे पार पडू शकतं. योग्य ड्राफिंटग, डोकमेंट्स, रिपोर्ट रायिंटग, इफेक्टिव्ह प्रेझेनटेशन्स या सर्व गोष्टींचा यात समावेश होतो.
11. ‘मॅनेजेरियल स्किल्स’ डेव्हलप करण्यासाठी ‘लीडरशिप क्वालिटीज’ डेव्हलप करणं गरजेचं आहे. वरील अॅट्रिब्यूटसोबतच फायनान्स हाताळणं, विविध प्रकारच्या लोकांकडून वेगवेगळी कामं करवून घेता येणं आदी.
12. ‘लाईफ लॉंग लर्निंग’ यात आत्मसात केलेला अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर पुढील अनेक वर्षांसाठी, नवनवीन टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटसाठी तुम्ही कसा करू शकता याचा समावेश आहे.
एनबीएने शिक्षकांसाठी ‘टीचर्स अॅट्रिब्यूटस’ डिफाइन केलेले आहेत का?
विद्यार्थ्यांच्या ‘अॅट्रिब्यूट बिल्डिंग’मध्ये म्हणजेच अर्थात ‘टेक्निकल जडणघडणीत’ स्वाभाविकतेने शिक्षकांचा िंसहाचा वाटा आहेच. सुदैवाने ‘ओबीई मॉडेल’ सर्व संस्थांनी अंगीकारल्यामुळे रुब्रिक्स बेस्ड इव्हॅल्युएशन आणि अटेन्मेन्ट सोपे झाले आहे.
 
सामान्यतः प्रत्येक शिक्षक अनेक भूमिका बजावत असतो. प्राथमिक रीत्या विद्यार्थ्यांना निर्धारित अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिकवणे हे त्याचं आद्य कर्तव्य असलं, तरी एक मेंटॉर, एक मार्गदर्शक बनून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाचा महत्त्वपूर्ण हिस्सा असावा!
‘कॅटलिस्ट’ एखाद्या प्रोसेसमध्ये ट्रिगरचे काम करतात. तसे प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न ‘ट्रिगर’ केले, की थोडं बाजूला होऊन ते योग्य दिशेने जात आहेत ना, हे तपासून बघितलं, तर त्याचा इम्पॅक्ट दीर्घकालीन ठरू शकतो. हे ‘बाजूला होणं’ केवळ मुलांना स्वयंसिद्ध बनवण्यासाठी, आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी! मात्र अडीअडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या दृष्टिपथात राहून ‘मी तुमच्या बाजूला तुमच्या मदतीसाठी उभा आहे, आवश्यकता असल्यास फक्त साद घाला,’ या भावनेचा आधार देता आला पाहिजे!
 
स्वप्नं माणसाला कृतिशील बनवतात. जगण्याचं प्रयोजन प्राप्त करून देतात. महत्त्वाकांक्षांचा प्रवास घडवतात. डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, मोठी स्वप्नं बघा आणि ती गाठण्यासाठी गरुडझेपेचं बळ प्राप्त करा. मात्र, स्वप्नं बघताना आवाक्याचा अंदाज घ्यायला हवा. आवाक्याबाहेरची स्वप्नं युवा पिढीला दिशाहीन भरकटवत तर नाही ना, हे शिक्षक तपासून बघू शकतात. विद्यार्थ्यांनी अयोग्य मार्गावर चालण्यापासून परावृत्त करण्याचं कामदेखील शिक्षक करू शकतात. प्रत्येक शिक्षकाची विद्यार्थ्यांच्या मनातील प्रतिमा आदरयुक्त बनण्यासाठी शिक्षकांनी काही विशिष्ट बाबी अंगीकारायला हव्या. असं असेल तर त्या शिक्षकाचे प्रत्येक वाक्य एक ‘प्रमाणवाक्य’ मानून विद्यार्थी त्याचं मनोभावे पालन करतात.
‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन’कडून मान्यता मिळवणं, इतकंच आपलं उद्दिष्ट मर्यादित आहे का?
एका स्वायत्त संस्थेत आम्ही जी शिक्षणप्रणाली अवलंबली आहे, त्या चौकटीत राहून सातत्याने ‘टीिंचग-लर्निंग’मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणात्मक बाबींचा अंतर्भाव केला जाऊ शकतो. ‘कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट’ हा शब्द आपल्या डिक्शनरीत आला, तर पडणारी पावलं शाश्वत विकासाची असणार, हे सुनिश्चित!
डॉ. शुभांगी रथकंठीवार
.......................