युती झाल्याने आघाडीची बिघाडी!
   दिनांक :24-Feb-2019
भाजपा-शिवसेना युती झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची गोची झाली आहे. युती होणार नाही अशी हवा असताना व होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्या आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागली असणार. त्यांच्या प्रतिक्रियांवरून तसे दिसत आहे.
 
तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू एकत्रित मतांच्या माळा, याला पर्याय नसल्याने शिवसेना आणि भाजपा या दोघांनीही गेली चार वर्षे घटस्फोटासाठी आवश्यक असलेली-नसलेली कारणे शोधत जबरदस्त हाणामारी केली. दोन्ही पक्षांना विशेषतः केंद्रात भाजपाला जास्त गरज असल्याने दोन्ही पक्ष आपले अहंकार सोडत चार पावले मागे घेत अखेर (होणारच होती ती) युती झाली. या निमित्ताने शिवसेना व युतीचा गतइतिहास थोडक्यात पाहणे उद्बोधक ठरेल.
 
19 जून 1966 ला, राजकीय व्यंग्यचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला मुंबईत त्याचा मानसन्मान मिळालाच पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेची स्थापना केली व पुढे प्रखर िंहदुत्वाची भर घालत िंहदुहृदयसम्राट ही पदवी संपादन केली. आयुष्यभर त्यांचे वर्तनही तसेच प्रखर राहिले. शिवसेनेने सुरुवातीपासूनच मुंबई महापालिका निवडणुकीत भाग घेत मुंबईत आपले स्थान पक्के करीत आजही टिकवून ठेवले आहे. शिवसेनेने नारायण राणे व मनोहर जोशी असे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले. मनोहर जोशी वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते व त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही काम केले. आजही आंनदराव अडसूळ व अनंत गीते हे केंद्रात मंत्री आहेत. 1970 पासून शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही निवडणुका लढवण्यास सुरुवात केली, पण यश कुठेही मिळाले नाही. 1989 पासून शिवसेना भाजपाशी युती करून निवडणुका लढवीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकावगळता ही युती अभेद्य राहिली. विशेष म्हणजे वेगवेगळे लढून दोघांच्याही जागा वाढल्या व सत्ता मिळाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. पण, तेव्हापासूनच महाराष्ट्रातील शिवसेनेची मो
ठ्या भावाची भूमिका भाजपाच्या दुप्पट यशामुळे धाकट्या भावाची झाली. विधानसभेत भाजपाला 123, तर सेनेला 63 जागा मिळाल्या. केंद्रात आणि राज्यात मिळालेली दुय्यम खाती, निर्णयप्रक्रियेत मिळणारे दुय्यम स्थान यामुळे शिवसेनेची कोंडी होत होती. नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे असे दिग्गज नेते सोडून गेल्याने मोठे धक्के बसले. 2012 मध्ये बाळासाहेब स्वर्गवासी झाल्यावर शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला झाला होता. भाजपाही पूर्वीसारखी िंकमत देत नव्हती. पण, फारशी पडझड न होता उद्धव ठाकरेंनी सेना सांभाळली खरी, पण सामनामध्ये सतत येणारी टीका, संजय राऊत व उद्धव ठाकरेंच्या पोकळ धमक्यांमुळे आणि सत्तेला चिकटून राहिल्यामुळे जनमानसात शिवसेनेचे हसे होत गेेले. शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या, आम्ही सत्तेतून बाहेर पडून पूर्ण सत्ता तुमच्या हाती सोपवतो, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले. आता कर्जमाफी दिल्याने सत्तेतून बाहेर कधी पडणार, असा प्रश्न विचारल्यावर रामदास कदम यांनी चिडून, आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यास शेतकरी आत्महत्या थांबणार का? असा उलटा पश्न पत्रकाराला विचारला होता. काही वेळा पािंठबा काढून घेण्याची अशीच पोकळ धमकी उद्धव ठाकरेंनी दिली होती, जी कधी प्रत्यक्षात आलीच नाही! भूकंप येणार या विधानावरून राहुल गांधींची झालेली त्रेधातिरपीट माहिती असूनही, संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार, असे धाडसी विधान केले आहे. मुंबईवगळता उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा मुसंडी मारत असताना, शिवसेनेची मात्र घसरगुंडी चालू राहिली. एवढेच नव्हे, तर मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेलमध्ये भाजपाला दणदणीत बहुमत आणि सेनेला एकही जागा नाही, हा सेनेला धोक्याचा इशारा होता. शेतकर्‍यांचा संप मिटला, पण फडणवीसांनी तो असा मिटवला की, जास्तीत जास्त श्रेय भाजपालाच मिळेल. ना धड सरकारमध्ये, ना विरोधात, अशी विदूषकी भूमिका घेणार्‍या शिवसेनेला मिळण्याची शक्यता नव्हतीच. शिवसेनेच्या सततच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी भाजपाने एक वर्षापूर्वी विधानसभा बरखास्त करून निवडणुका जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली होती.
 
 
आता परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. लोकसभेसाठी शिवसेनेला गेल्या वेळेपेक्षा एक जागा जास्त म्हणजे 23 आणि भाजपाला 25, तर विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाली आहे. युतीसाठी भाजपाने थोडीशी माघार घेतली असली, तरी शिवसेनेला अपेक्षित मोठ्या भावाचा मान मात्र दिलेला नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर काहीही भाष्य करण्यात आले नाही.
 
काही कारणांनी उभयतांमधील संबंध ताणले गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतीलच अस्थिरता पाहता कटुता संपवत पुन्हा एकत्र आले. महाराष्ट्रातील 48 पैकी लोकसभेच्या 45 जागा िंजकू , असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. युती करीत असलो तरी भाजपा नेतृत्वाकडून मान राखला जावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केल्यानंतर आणि अगदी केंद्र आणि राज्य सरकारवर वाट्‌टेेल तशी टीका करून स्वबळाचा नारा देत राहिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीला संमती द्यावी लागली. िंहदुत्व, राममंदिर आणि अविचारी लोकांच्या आघाडीला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी व 50 वर्षे ज्यांच्या विरोधात लढलो अशांच्या हातात सत्ता जाऊ नये यासाठी युती करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधानसभेत भाजपाचे बळ शिवसेनेच्या दुप्पट असून, नवीन विधानसभेतही यात फरक होण्याची शक्यता नाही. असे असताना राज्यातील सत्तापदांमध्येही समानतेचा निकष लावण्यात येईल, या सूत्रावर युती झाली आहे याचा अर्थ काय लावणार, हे लक्षात येत नाही.
 
स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव जानेवारी 2018 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केल्याचा दाखल देत, वर्षभरापासून शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपावर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर सातत्याने शेलक्या भाषेतही टीका करत होते. मात्र, हे सर्व विसरून अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी मातोश्रीवर जाऊन पूर्वीप्रमाणे शिवसेनेच्या सन्मानाला गोंजारत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व नंतरच वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली.
उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा नसली, तरी शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा युतीसाठी दबाव होता. युतीशिवाय िंजकणे अशक्य असल्याने त्यांच्या मताची दखल घेत 15 वर्षांनी मिळालेली व पुन्हा येऊ घातलेली सत्ता मानापमानाच्या नावाखाली घालवण्याऐवजी उद्धव यांनी युती करत समंजसपणा दाखवला.
 
23 वी जागा कोणती? किरीट सोमय्यांच्या बाबतीत निर्माण झालेली कटुता कशी कमी करणार? पुण्यातील आठही आमदार आता भाजपाचे आहेत. त्यातील कुणाला त्याग करायला लावणार? भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्याच वक्तृत्वाने तयार झालेली कटुता कशी कमी करणार?... असे अनेक प्रश्न हाताळताना दोन्ही नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. आघाडीत मात्र बिघाडी झाली आहे, हे नक्की.
विलास पंढरी