एयर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी; मुंबईत हाय अलर्ट
   दिनांक :24-Feb-2019
पुलवामातील हल्ल्यानंतर भारत-पाकस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सर्व मोठ्या शहरांमध्ये हाय  अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यातच रबाळे येथील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळावरून विमान हायजॅक करण्याची धमकी शुक्रवारी रात्री उशिरा दिली.
 
 
 
एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली असून  एअर इंडियाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री हा कॉल आला होता. फोनवर बोलणारी व्यक्ती इंग्रजीतून बोलत होती. त्याने आपण एअर इंडियाचे विमान हायजॅक करणार असल्याची धमकी देऊन फोन कट केला. यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.