जुनागढ
   दिनांक :24-Feb-2019
‘पब्लिक रिलेशन’ म्हणजे जनसंपर्क, हा आज परवलीचा शब्द झाला आहे. समाजात आपली छबी निर्माण करून आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठीचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. सध्या हाताशी सहज उपलब्ध असलेल्या फेसबुक, व्हॉट्स अॅप, टि्‌वटर या समाज माध्यमांतून स्वत:ची छायाचित्रं, गाठलेली यशाची शिखरं आणि इतर लहानसहान घडामोडींचा रतीब घालणार्‍यांची चलती आहे. ज्यांच्याजवळ खर्चायला पैसा आहेत, असे लोक गावात पोस्टर लावत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.
‘पब्लिक रिलेशन्स’ हा स्वतंत्र विषय अभ्यासला जातो, त्यावेळी त्याचा इतिहास सांगताना ग्रीक इजिप्त आणि रोमन संस्कृतीत जनसंपर्क आणि त्याच्या साधनांचा उल्लेख येतो. पण प्राचीन भारतीय संस्कृतीचा कुठेही विचार करण्यात येत नाही. कारण त्या दृष्टीनं आपल्या इतिहासाकडे बघण्याची दृष्टीच विकसित झालेली नाही. प्राचीन भारतीय राजांचं कार्य हे फक्त युद्ध-संधीपर्यंतच मर्यादित करण्यात आलं आहे. पण भारतीय भूमीतील राजकीय जनसंपर्काचा एक प्रचंड मोठा इतिहास आहे.
राजा हा श्रीविष्णूचा अवतार असून त्यानं स्वत:चं हित दूर सारत प्रजेचं हित साधत, प्रजेचा प्रतिपाळ करावा, या राजकीय तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असलेली राज्यप्रणाली प्राचीन भारतात होती. त्याची अनेक उदाहरणं वैदिक साहित्य, वाल्मिकी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक साहित्यात आढळतात. पण त्यांना भाकडकथा मानून त्यांचा उल्लेख जाणूनबुजून टाळण्यात येतो. परंतु जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, त्यांच्या आधारे तरी राजकीय जनसंपर्काचा भारतीय इतिहास मांडणं आवश्यक आहे.

 
चंद्रगुप्त मौर्यानं स्थापन केलेलं मौर्य साम्राज्य त्याचा नातू अशोकानं प्रचंड पराक्रम करून विस्तारलं तो इ.स.पू. 273 ते इ.स.पू. 232 म्हणजे 43 वर्षे मौर्य साम्राज्याचा सम्राट होता. त्यानं आपल्या प्रचंड शक्तिशाली सैन्याचा वापर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था नित्य ठेवण्यासाठी केला. आशिया आणि यरोप खंडातल्या अनेक देशांशी त्याचे अत्यंत चांगले संबंध होते.
भारताच्या राजकीय जनसंपर्क प्रणालीचा मूर्तिमंत वस्तुपाठ म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंडात सापडणारे अशोकाचे शिलालेख. अगदी अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे नेल्लोर जिल्ह्यापर्यंत या शिलालेखांचं अस्तित्व आढळतं. या शिलालेखांत सम्राट अशोकाची धोरणं आणि त्यानं प्रतिवर्षी केलेली वेगवेगळी समाजोपयोगी कामाचा अहवाल दिलेला आहे. मध्य भारतातले शिलालेख बहुतकरून ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत आहेत, अफगाणिस्तानातले प्राकृत भाषा आणि खरोष्टी लिपीत तर दोन शिलालेख ग्रीक भाषा आणि ग्रीक लिपीमध्ये तर एक ग्रीक व एक अॅरेमाइक भाषा आणि लिपीत कोरण्यात आला आहे. त्यात सम्राट अशोकाने भूमध्य समुद्राकडील ज्या ग्रीक राजांकडे आपले राजदूत पाठवले होते, त्या राजांची नावं अंतियोको (अँटियोकस), तुलामाया (टॉलेमी), अंतिकिनी (अँटिगोनस), मक (मॅगस), व अलिकासुन्दरो (अलेक्झांडर) देखील कोरण्यात आली आहेत. तसंच भारत आणि ग्रीसमधले अंतरही शिलालेखांवर अचूक म्हणजेच ‘600 योजने दूर’ (एक योजन म्हणजे सात मैल) असे लिहिले आहे (अंदाजे 4,000 मैल).
सम्राट अशोकाचे 14 शिलालेख ज्या ज्या ठिकाणी सापडले, त्यापैकी एक स्थान आहे-‘जुनागढ!’ (गुजरात). या लेखाला गिरनारचा शिलालेख म्हणतात. सम्राट अशोकाचे लेख कोरलेल्या दगडावरच आणखी दोन महत्त्वाचे शिलालेख आहेत. पहिला पश्चिमी क्षत्रप रुद्रदामन प्रथमचा आणि दुसरा स्कंधगुप्ताचा. पश्चिमी क्षत्रप रुद्रदामन प्रथमचा आजोबा होते. चष्टन आणि वडील होते जयदामन्‌. तर स्कंधगुप्त, चंद्रगुप्त द्वितीयचा नातू आणि कुमारगुप्त प्रथमचा मुलगा आणि गुप्त साम्रज्याचा शेवटचा महापराक्रमी राजा होता. या दोन्ही शिलालेखांचा उल्लेख फारसा केल्या जात नसला, तरी प्रत्येक स्वाभिमानी भारतीयानं त्यांची दखल घेतलीच पाहिजे.
इसवीसन 150 मध्ये कोरलेल्या रुद्रदाम्याच्या शिलालेखात एका अत्यंत अभिमानास्पद इतिहासाची नोंद मिळते. लेखाची लिपी ब्राह्मी आहे आणि अतिशय उत्कृष्ट गद्य संस्कृतातली रचना आहे. सुबंधू, दंडी आणि बाण या संस्कृतातील गद्य लेखकांच्या लेखनशैलीच्या आधीची गद्यशैली या मजकुरात बघायला मिळते. या लेखाची भाषा सरळ आणि प्रवाही आहे. सोबतच यात दीर्घसामासिक शब्द वापरले आहेत. विविध भाषिक अलंकारांचा सढळ वापर आणि नादमयता यात अनुभवता येते.
या लेखानुसार ऊर्जयत (गिरनार) पर्वतावर उगम पावून काठियावाड प्रदेशात उतरणार्‍या दोन नद्या पलाशिनी आणि सुवर्णसिकता. यापैकी पलाशिनी नदीचा उल्लेख महाभारत ग्रंथात येतो. तर त्यांच्या संगमावर गिरीनगरजवळ चंद्रगुप्त मौर्याच्या (इ.स.पूर्व 321-297) प्रांताधिकारी पुष्पगुप्ताच्या आज्ञेनुसार एक भरभक्कम बांध बांधला होता. त्याच्या जलाशयाचं नाव होतं-‘सुदर्शन तडाग!’ (सुंदर दिसणारं तलाव). सम्राट अशोकाच्या काळात यवनराजा तुषास्फानं त्या बांधाच्या पन्हाळी बांधून डागडुजी केली. शके 72 च्या मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेला झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या बांधाला भलेमोठे भगदाड (420 हात लांब, तितकेच हात रुंद आणि 75 हात खोल) पडलं त्यामुळे जलाशयातलं पाणी वाहून गेलं. ते जलाशय वाळवंटासारखं ‘दुर्दशन’ (दु: + दर्शन जे वाईट दिसते ते) झालं. हे वाक्य त्या शिलालेखात लिहिलेलं आहे.
त्या परिसरात राहणार्‍या प्रजेनं रुद्रदामन राजाकडे तो बांध दुरुस्त करण्याची विनंती केली. पण राजाच्या मंत्रीमंडळाने तो बांध बांधण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही. िंकबहुना त्यांनी या योजनेला कडाडून विरोधच केला. त्यामुळे जनता हाहाकार करू लागली. तेव्हा मंत्रीमंडळाच्या नकाराला दूर सारत रुद्रदामन राजानं आपल्या खाजगीतून खर्च करण्याचं ठरवलं. नगरवासी आणि ग्रामवासी प्रजाजनांना वेठबिगारी िंकवा सक्ती न करता राजानं आधी होता, त्याहून तिप्पट मोठा बांध बांधून देण्याचा निर्णय घेतला.
सुराष्ट्राचा प्रांताधिकारी म्हणून काम बघत असणार्‍या पह्लवकुळातील कुलैपचा मुलगा सुविशाखाची या कामावर नियुक्ती केली. त्यानं धार्मिक आणि व्यावहारिक बाबतीत चोखपणा ठेऊन जनतेची प्रीती वाढवली.
या शिलालेखातून अनेक तथ्य समोर येतात. जसं चंद्रगुप्ताचे प्रांताधिकारी वाहाते पाणी अडवण्याकरता बांध घालत. त्यातील पाण्याचा उपयोग सर्वसामान्य जनता पिण्यासाठी, रोजच्या वापरासाठी आणि िंसचनासाठी करत होती. बांधाची आणि पन्हाळीची डागडुजी करून त्याला व्यवस्थित करण्याची वेळ जवळपास 50 वर्षांनतर आली. हे काम करणारा तुषास्फ यवनराजा म्हणजे ग्रीक होता. तर चार शतकानंतर त्या बांधाला पडलेलं भगदाड दुरुस्त करण्याची वेळ आली, त्यावेळी राजानं ते दुरुस्त करू नये, हे सांगणारं मंत्रीमंडळ आणि त्यांच्या सल्ल्याविरुद्ध जात राजाने स्वत:च्या खाजगी खजिन्यातून खर्च करण्याचा घेतलेला निर्णय याचा स्पष्ट उल्लेख यात करण्यात आला आहे.
यावरून त्याकाळची राजव्यवस्था कशी काम करी ते समजतं. राजाला नाही म्हणणारे मंत्री होते, राज्याच्या धनकोषावर अतिरिक्त भार पडणार म्हणून ते नाही म्हणत आहेत, हे समजून घेत स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून लोकहिताची कामं करणारा राजा होता आणि राजाची लोकहिताची तळमळ समजून घेत एका पैशाचाही अपहार न करता, पूर्वी होतं त्याहून तिप्पट मोठं धरण बांधून काढणारा पह्लवकुळातील सुविशाखही होता. हे पह्लवकुळ म्हणजेच आजचे मध्य आशियाई पहलवी.
याच दगडावर गुप्तसम्राट स्कंधगुप्ताचाही शिलालेख आहे. स्कंगगुप्ताचा कार्यकाळ इसवीसन 455 ते 467 असा होता. लेखाची लिपी ब्राह्मी आणि भाषा संस्कृत आहे. स्कंधगुप्तानंही हा बांध कसा दुरुस्त केला, याचं मोजमापासहित यथास्थित वर्णन सदर शिलालेखात आलं आहे.
ढोबळमानाने विचार केला तर चंद्रगुप्त मौर्याच्या (इ.स.पूर्व 321-297) काळात बांधलेलं धरण, केवळ दोनदा दुरुस्ती करत स्कंधगुप्ताच्या काळापर्यंत म्हणजे इसवीसन 455 ते 467 पर्यंतजवळपास 700 वर्षे ठणठणीत होतं. स्कंधगुप्तानं केलेल्या दुरुस्तीनंतर आठव्या शतकापर्यंत हे धरण आणि तो सुदर्शन तडाग सुस्थितीत होते. म्हणजे या धरणाचं एकूण आयुष्य किमान 1 हजार वर्षांचं होतं. त्यानंतर तो सुदर्शन तडाग आटला आणि काही दशकांनंतर तो बांधही ढासळला.
जोवर रासायनिक सिमेंटचा शोध लागला नव्हता, तोवर संपूर्ण भारतात अशाच प्रकारचे बांध घालून िंसचनाच्या सोयी केल्या जात, असं इतिहासज्ञ आणि या बांधाच्या इतिहासाचे अभ्यासक आर. एन. मेहरा म्हणतात. कोणतीही अफरातफर न करता, 1 हजारवर्षांत केवळ तीनदा दुरुस्ती करावी लागली, असं धरण बांधणारे आपले पूर्वज होते. त्यापैकी एक दुरुस्ती करताना राजानं स्वत:च्या खाजगी खर्चाला कात्री लावली आणि मंत्रीमंडळाचा विरोध पत्करून जनहिताचं काम केलं, याचा लिखित पुरावा असलेलं आजचं अभिमान स्थळ- ‘जुनागढ!’
000000000
सम्राट अशोक, महाक्षत्रप रुद्रदामन प्रथम आणि गुप्तसम्राट स्कंधगुप्ताचेे ब्राह्मी लिपीतले शिलालेख असलेली हीच ती जुनागढची शिळा.