हरनप्रीत सिंग आशियातला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू
   दिनांक :24-Feb-2019
- लालरेमसियामी सर्वोत्तम उदयोन्मुख हॉकीपटू
नवी दिल्ली, 
आशियाई हॉकी महासंघातर्फे भारताचा डिफेंडर हरमनप्रीत सिंगला यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट हॉकीपटू पुरस्काराने, तर महिला संघाची स्ट्रायकर लालरेमसियामीला यावर्षीची सर्वोत्तम उदयोन्मुख हॉकीपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हरमनप्रीतने एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला व गतवर्षी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या भारतीय संघासुद्धा तो सदस्य राहिला होता.
 
 
 
 
१८ वर्षीय लालरेमसियामीने एक आक्रमक खेळाडू म्हणून भारतीय संघाकडून प्रभावी कामगिरी केली. २०१८ विश्वचषक, आशियाड क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्यपदक जिंकून देण्यात तिने मोलाचा हातभार लावला होता. लालरेमसियामी ही ब्यूनोस आयर्स येथे यूथ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या १८ वर्षांखालील भारतीय संघाचीसुद्धा सदस्य होती.
 
आशियाई हॉकी महासंघातर्फे भारतीय संघाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारा संघ म्हणून गौरविण्यात आले. भुवनेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात भारत हा अंतिम आठमध्ये स्थान मिळविणारा एकमेव आशियाई हॉकी संघ ठरला. ब्रेडा  येथे एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघाने २०१६ सालच्या कामगिरीची पुनरावृत्ती करताना ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले.