भारताचे ऑस्ट्रेलियासमोर १२७ धावांचे आव्हान
   दिनांक :24-Feb-2019
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विशाखापट्टनम येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून रोहित शर्मा ( ५) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेला कोहलीने या सामन्यात विक्रमासह कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये ५०० धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
 

 
 
कॉफी विथ करण ६ कार्यक्रमातील वक्तव्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या राहुलनेही भारतीय संघाकडून आज पुनरागमन केले. कोहलीला मोठी खेळी करता आली नाही आणि तो २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला ( ३) समन्वयाच्या अभावामुळे धावबाद होऊन माघारी परतावे लागले. महेंद्रसिंग धोनीने संयमी खेळ केला, परंतु राहुल मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. राहुलने ३६ चेंडूंत ५० धावा केल्या.
 
 
 
दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला २० षटकांत १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली.