शेतकऱ्याच्या मुलाने नेमबाजीत जिंकले सुवर्णपदक
   दिनांक :24-Feb-2019
नवी दिल्ली :
भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने रविवारी आयएसएसएफ वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने १० मीटर एअर पिस्तुल पुरुष गटात २४५ गुणांच्या विश्व विक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना त्याने या अविश्वसनीय कामगिरीसह २०२० मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही जिंकले. २०१६ नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अंतिम फेरीत एकदाही पराभूत न होण्याचा सपाटा सौरभने लावला आहे.

 
 
सौरभने आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अवघ्या १६व्या वर्षी सौरभने भारताला सुवर्ण जिंकून दिले होते. प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सौरभने २४०.७ या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याच कामगिरीचे सातत्य राखताना त्याने वर्ल्ड कप स्पर्धेतही इतिहास घडवला. त्याने सर्बियाच्या डॅमिक माकेस ( २३९.३ ) आणि चीनच्या वेई पँग ( २१५.२ ) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले.