...तर पाकिस्तान भारतावर ५० अणुबॉम्ब टाकेल : परवेज मुशर्रफ
   दिनांक :24-Feb-2019
अबुधाबी,
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संतापाचे वातावरण असताना पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी भडकाऊ विधान केले आहे. पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला तर शेजारील देश २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नष्ट करेल. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकायला हवेत म्हणजे ते आमच्यावर २० बॉम्ब टाकू शकणार नाहीत, असे मुशर्रफ बरळले आहेत.

 
 
भारत-पाकिस्तानातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. ते आमच्यावर हल्ला करणार नाहीत. आम्ही त्यांच्यावर एक अणुबॉम्ब टाकला तर शेजारचे देश आमच्यावर २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नष्ट करतील. त्यामुळे यावर एकच उपाय आहे, अगोदर त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकायला हवेत, ज्यामुळे ते पाकिस्तानवर २० बॉम्ब टाकू शकणारच नाहीत. ५० अणुबॉम्ब त्यांच्यावर टाकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?, असे युएईमध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुशर्रफ म्हणाले.
मात्र, आता त्यांनी या वक्तव्यावरुन घुमजाव केला आहे. पाकिस्तान भारतावर कोणताही हल्ला करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या 'डॉन' वृत्तपत्राने दिले आहे.