किसान सन्मान निधी योजनेचा कारंजा येथे प्रतिनिधिक शुभारंभ
   दिनांक :24-Feb-2019
- आ. पाटणीसह लाभार्थी शेतकार्‍यांची उपस्थिती
 
कारंजा लाड,
कांरजा येथील पस कार्यालयातील सभागृहात आज सोमवारी सकाळी १० वाजता कारंजा तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने किसान सन्मान निधी योजनेचा प्रतिनिधिक शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी शेतकार्‍यांना सदर योजनेविषयी माहिती देवून त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.
 

 
 
देशातील अल्पभुधारक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावे या हेतूने सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत पती पत्नी, व अज्ञान मुले धरून एक कुटुंब व १८ वर्षावरील त्याच कुटुंबातील मुलाला या योजनेचा वेगळा लाभ मिळणार आहे. देशातील एकुण १२ कोटी शेतकार्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील शेतकरी मेळाव्यात आज करण्यात आला. यावेळी देशातील १२ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात एका क्लिकवर पहिला २ हजार रूपयाचा हप्ता जमा करण्यात आला. या योजनेअंतर्गत देशातील अल्पभुधारक शेतकार्‍यांना वर्षाकाठी ६ हजार रूपयाची मदत ३ टप्प्यात मिळणार आहे.
 
कारंजा तालुक्यात ३३ हजार १३ अल्पभुधारक शेतकरी असून, या योजनेसाठी २१ हजार ७४७ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यातील १९ हजार २५१ म्हणजेच ८८.५२ टक्के लाभार्थी शेतकार्‍यांचा डाटा अपलोड करण्यात आला असून, उर्वरित शेतकार्‍यांचा डाटा अपलोड करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. आज कारंजा तालुक्यातील काही लाभार्थी शेतकार्‍यांना सदर योजनेची पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झाल्याचे संदेश देखील प्राप्त झाले. ज्या शेतकार्‍यांनी आतापर्यंत आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची सत्यप्रत सदर योजनेसाठी जमा केली नसेल त्यांनी लवकरात लवकर संबंधित तलाठ्याकडे जमा करावे, असे आवाहन कांरजा तहसील कार्यायाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
यावेळी आ. राजेंद्र पाटणी, भाजपा कारंजा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, जि.प. सदस्य गजानन अमदाबादकर, तहसीलदार रणजीत भोसले, निवासी नायब तहसीलदार विनोद हरणे, गटविकास अधिकारी के. आर. तापी, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह लाभार्थी शेतकार्‍यांची उपस्थिती होती.