अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहून सिद्धांतच्या अभिनयाला दिली दाद
   दिनांक :24-Feb-2019
अभिनेता रणवीर सिंहच्या 'गली बॉय'ने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही मने जिंकली आहेत. चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीरबरोबरच त्याचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. साक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहून सिद्धांतच्या अभिनयाला दाद दिली आहे.
 
 
 
सिद्धांतनं स्वत: इन्स्टाग्रावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. अमिताभ यांनी सिद्धांतला पुष्पगुच्छ आणि शुभेच्छासंदेश पाठवला आहे. 'गली बॉय' पाहिला आणि राहावले नाही. त्यामुळे तुला हे पत्र पाठवतोय. कोणत्याही चित्रपटात कॅमेऱ्यासमोर सहजतेने  वावरणे अत्यंत कठीण असते. पण तू ते केलंस. तुझ्या अभिनय कारकिर्दीला शुभेच्छा' असा अमिताभ यांनी संदेशात म्हटल आहे.
अमिताभ यांच्या कौतुकाने भारावलेल्या सिद्धांतने ते पत्र आणि पुष्पगुच्छ हातात घेऊन एक फोटो शेअर केलाय. 'तुम्ही दिलेली भेट आणि आशीर्वाद माझ्यासाठी मौल्यवान आहे. हा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्यासाठी हा भाग्याचा आणि गौरवाचा क्षण आहे. प्रत्यक्ष भेटून आपला आशीर्वाद घेण्याची इच्छा आहे,' अशा शब्दांत सिद्धांतचे अमिताभ यांचे आभार मानले आहेत.