परीक्षेच्या तणावातून तिघींनी खाल्ले उंदीर मारण्याचे औषध; दोघींचा मृत्यू
   दिनांक :24-Feb-2019
 
खामगाव : अभ्यासाच्या भीतीने आणि परीक्षेच्या तणावातून खामगाव येथील तिन विद्यार्थिनींनी शुक्रवारी २२ फेब्रुवारीला उंदिर मारण्याचे औषध खाल्ले. त्यातून विषबाधा होऊन दोघींचा उपचारादरम्यान अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात २४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तर तिसऱ्या विद्यार्थीनीवर खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 
 
नयना सदाशिव शिंदे रा.चिंतामणी नगर खामगाव, निकिता अनिल रोहणकार रा.किसन नगर व रुपाली किशोर उनवणे या  तिघी मैत्रिणी खामगावच्या नॅशनल शाळेत दहावीला आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीची परिक्षा सुरू होणार आहे. तिनही विद्यार्थिनींची २२ फेब्रुवारीला दहावीची प्रात्यक्षिक परिक्षा होती. ही परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर आल्या. ही परीक्षा चांगली न गेल्याने व समोर परिक्षा असल्याने आलेल्या तणावातून दुपारी सुमारे ३ वाजता तिघींनीही उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्यामुळे त्यांना उलट्या व मळमळ सुरू झाली. यातील नयना शिंदेला  २२ फेब्रुवारी रोजी अकोला येथे सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. निकिता रोहणकार हिच्यावर सुरूवातीला खामगावातील खासगी रूग्णालयात उपचार करून नंतर अकोला येथे सर्वोपचार रूग्णालयात भरती करण्यात आले. या दोघींचाही २४ फेब्रुवारी रोजी अकोला येथे मृत्यू झाला. रूपाली उनवणे या विद्यार्थिनीवरही खामगाव येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान, पाणीपुरी खाल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू झाला अशी चर्चा खामगाव शहरात सुरु होती, परंतु खामगाव येथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनीने पोलीसांना दिलेल्या बयाणावरून तिघींनीही उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याची बाब समोर आली आहे.