आणखी दोन दिवस राहणार उकाडा
   दिनांक :24-Feb-2019
वातावरणातील बदलांमुळे गेल्या चार दिवसात राज्यातून थंडी गायब झाली असून, कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जाते आहे. पुण्यात गेल्या आठवडाभरात कमाल तापमानाचा पारा वर चढल्याने पुणेकरांना ऊन्हाळ्याची चाहुल लागली आहे. रात्रीचाही गारवा गायब झाला असून सूर्योदयापासूनच उकाडा जाणवतो आहे. शहरात सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
 

 
 
 छत्तीसगड ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे विदर्भात पावसाला पोषक हवामान असून, सोमवारी विदर्भामध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.पुणे शहरात शनिवारी दिवसभरात किमान १६.६ अंश सेल्सिअस आणि कमाल ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस हेच तापमान स्थिर राहणार असल्याने पुणेकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे
कोकण आणि गोवा वगळता राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. राज्यात शनिवारी उच्चांकी तापमान ३९.२ अंश सेल्सिअस मालेगावमध्ये नोंदविण्यात आले. बीड, अमरावती, सोलापूरमध्ये ३८ च्या पुढे, तर ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि सांगली कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे होते. सातारा, कोल्हापूर, नगरमध्ये पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. राज्यातील नीचांकी तापमान १५.२ अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नोंदविण्यात आले.