पाकसाठी ‘गोली’, काश्मीरसाठी ‘बोली’!
   दिनांक :25-Feb-2019
दिल्ली दिनांक 
 -रवींद्र दाणी  
 
चॅनेलच्या न्यूजरूम जेव्हा वॉररूम होतात तेव्हा काय होते हे सार्‍या देशासमोर आहे. पाकिस्तानवर हल्ला, पाकिस्तानचा सफाया, पाकिस्तानचा नायनाट असे सहजपणे बोलले जात असताना, भारताने पाकिस्तानात जाणार्‍या नद्यांचे अतिरिक्त पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकार वा भारतीय लष्कर, कुणीही युद्धाची भाषा उच्चारलेली नाही. एका परिपक्व देशाचे हे एक उदाहरण आहे. दुसरीकडे पाकिस्तानवर या घटनाक्रमांचा दबाव येत असल्याने त्यानेही काही दहशतवादी संघटनांशी संबंधित संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा केली. हा सारा घटनाक्रम कोणत्या दिशेने जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुलवामात झालेली घटना गंभीर आहे. 45 जवान या दहशतवादी घटनांमध्ये शहीद झाले. मात्र, यापेक्षा मोठी घटना 2010 मध्ये छत्तीसगढमध्ये घडली होती. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे 76 जवान शहीद झाले होते. त्या घटनेवर देशात संतापाची जी लाट उसळावयास हवी होती, ती उसळली नव्हती. या घटनेत पाकिस्तान असल्याने त्याची तीव्रता, दाहकता जास्त झाली आहे. आता या घटनेला कोणते व कसे उत्तर द्यायचे यावर उटलसुलट चर्चा केली जात आहे.
 
 
 
कारगिलचा इतिहास
पाकिस्तानला जबर तडाखा म्हणजेच युद्ध अशी एक स्वाभाविक भावना देशातील नागरिक नोंदवित आहेत. 20 वर्षांपूर्वी कारगिल मध्ये भारताने पाकिस्तानला मार दिला. मिराजपासून, मिग विमानापर्यंत सर्वांंचा वापर करण्यात आला. बोफोर्स तोफांनी आग ओकली. भारताने कारगिलचे युद्ध जिंकले. पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय सीमेतून बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला 60 दिवस लागले आणि यात जवळपास 600 जवान व अधिकारी शहीद झाले. पण, या विजयाचे वलय सहा महिनेही टिकले नाही. डिसेंबर 1999 मध्ये पाकिस्तानच्या आयएसआयने, भारतीय विमानाचे अपहरण करुन ते विमान कंधारला नेले . अपहरणकर्त्यांनी तिघा अतिरेक्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. प्रारंभी वाजपेयी सरकार, ही मागणी मान्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अपहरणकर्त्यांविरुध्द कारवाई करून, प्रवाशांना सोडविण्याचा प्रयत्न करावा असा विचार सरकारमध्ये सुरू होता. यात काही प्रवाशांचे जीव धोक्यात येतील हे सरकार जाणून होते. तरीही कठोर भूमिका घेण्याची सरकारची तयारी होती. मात्र, जे चॅनेलवाले आज युद्धाची भाषा बोलत आहेत त्यांनी त्यावेळी- विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांच्या मुलाखती, मागण्या प्रसिद्ध करून असे काही वातावरण तयार केले की, त्या दबावाखाली, सरकारने तिघा अतिरेक्यांची सुटका करीत, प्रवाशांचे प्राण तर वाचविले. पण, त्याबदल्यात ज्या मौलाना मसूद अझहरची सुटका करण्यात आली त्यानेच पुलवामात 45 जवानांचे प्राण घेतले.
 
राष्ट्रहिताची भूमिका
2001 मध्ये देशाच्या संसदेवर हल्ला झाला, काही वर्षांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला झाला. काश्मीरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. आता पुलवामा घडल्यानंतर पाकिस्तानवर आक्रमण, पाकिस्तानाचा सफाया असे वातावरण प्रसारमाध्यमे निर्माण करीत आहेत. सामान्य भारतीयाला पुलावामाच्या घटनेचा संताप येणे स्वाभाविक आहे. या भावनांना कोणत्या प्रकारे हाताळावयाचे याचा योग्य विचार सरकार करीत आहे. सरकारने जनभावनांचा आदर करावा असे मानले जाते. पण, काश्मीर-पाकिस्तान हे एवढे गुंतागुंतीचे मुद्दे आहेत की जनभावना व सरकार यांच्या भूमिकेत भिन्नता असणे स्वाभविक आहे. आणि अशा स्थितीत सरकार जी भूमिका घेत आहे ती अधिक राष्ट्रहिताची मानली पाहिजे.
 
युद्ध पर्याय?
पाकिस्तानवर अगदी उद्या हल्ला चढविला तरी त्यातून फार काही साध्य होणार नाही. चार-पाच दिवस युद्ध चालेल. नंतर अमेरिका-चीन यांची मध्यस्थी होईल. ती न झाल्यास युद्ध चुकीच्या दिशेने जाईल. भारत-पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. पंरपरागत युद्धात पाकिस्तान पराभूत होण्याची स्थिती निर्माण झाल्यास, तो अण्वस्त्रांचा वापर करील काय? समजा, भारताने पाकिस्तानला निर्णायक मात दिली तरी, पाकिस्तानातील अण्वस्त्रांचा साठा कुणाच्या हाती पडेल? ही अण्वस्त्रे इम्रानखानच्या हाती असणे सुरक्षित की मसूद अझहरच्या हाती पडणे सुरक्षित, हे सारे गंभीर प्रश्न आहेत. पाकिस्तानजवळ 130 ते 140 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे. ही अण्वस्त्रे अझहर मसूदच्या हाती पडणे म्हणजे, माकडाच्या हाती अण्वस्त्रे देण्यासारखे ठरणार आहे. या सार्‍या पैलूंची जाणीव सरकारला असल्यामुळेच, सरकारला फार विचारपूर्वक निर्णय करावा लागणार आहे. पाकिस्तानला मार बसला तरी सहा-आठ महिन्यात तो पुन्हा आयएसआयच्या माध्यमातून कारवाया सुरू करील. हे चक्र न संपणारे असेल. आणि म्हणून पाकिस्तान व काश्मीरबाबत एक नवे धोरण भारताला ठरवावे लागेल.
 
नवा मार्ग?
काश्मीरमध्ये जे काही होत आहे, त्याचे केंद्र इस्लामाबाद आहे. विदेशी दबाव आणून पाकिस्तानला वठणीवर आणता येईल या प्रयत्नात 70 वर्षे गेली. ते झाले नाही. आता, लष्करी कारवाईचा विचार होत आहे. याठिकाणी हे विसरता कामा नये की भारत-पाकिस्तान यांच्यात आजवर झालेल्या लष्करी कारवायांचा केंद्रबिंदू- काश्मीर राहिलेले आहे. 1948, 1965, 1971 व 1999 या तिन्ही युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. तरी पुलवामा झाले. म्हणजे कारगिल युद्धात एका दिवसात जेवढे भारतीय जवान शहीद झाले नाहीत, तेवढे जवान एका दिवसात पुलावामात शहीद झाले. आणि म्हणून, आता केवळ युद्ध ही उपाययोजना परिणामकारक राहणार नाही. त्यासाठी भारताला, पाकिस्तानातील दहशतवादी गट व आयएसआय यांना अक्षरश: टारगेट करावे लागेल. होय! आम्ही आयएसआयच्या प्रमुखाला, मौलाना मसूद अजहरला ठार केले हे जगाला सांगावे लागेल. त्यात कोणतीही लपवालपवी करून चालणार नाही. मात्र हे करीत असताना, काश्मिरी जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणावे लागेल. हे केल्याशिवाय काश्मीरमधील िंहसाचार आटोक्यात येणार नाही. काश्मीरमध्ये आता भारताचे किती सुरक्षा जवान आहेत याचा नेमका आकडा सांगता येणार नाही. मात्र, भारतीय लष्कराचे चिनार क्रॉप, राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ, सीमा सुरक्षा दल यांच्या अनेक बटालियन काश्मीर खोर्‍यात तैनात आहेत. तरीही खोर्‍यातील हिंसाचार थांबलेला नाही.
 
काश्मीर खोर्‍यात फार बळाचा वापर करणे योग्य ठरणार नाही, ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. पुलवामाचा आत्मघाती हल्लेखोर स्थानिक होता हे लक्षात ठेवले गेले पाहिजे. जोपर्यंत काश्मिरी जनतेला मुख्य प्रवाहात आणले जात नाही, पाकिस्तान हे करीत राहणार. काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तान आहे हे सार्‍या जगाला माहीत आहे. मात्र, काश्मीर खोर्‍यात असंतोष आहे हेही त्यांना माहीत आहे. पाकिस्तान या असंतोषाचा फायदा उठवित आहे आणि तो उठवित राहणार. काश्मीरचे हिरो
सुरक्षा दलांनी ठार केलेल्या अतिरेक्यांचे अंत्यविधी हे नवे अतिरेकी तयार होण्याचे एक मोठे कारण ठरत आहे असाही एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या अंत्यविधीसाठी 50 हजारावर लोक एकत्र होतात. यावर सुरक्षा दलांचे जवान काय कारवाई करणार? पुलवामाचा हल्ला ज्या युवकाने घडविला, त्याच्या घरी भेटणार्‍यांची रीघ लागली आहे. हे कसे थांबणार? काश्मीरमधील असंतोष ही पाकिस्तानची खरी ताकद आहे. या सर्व पैलूंचा विचार करण्याची वेळ आली आहे आणि हा विचार नोकरशाही नाहीतर राजकीय नेतृत्वाने केला पाहिजे.
 
आजही काश्मिरी जनतेचे हिरो-जनरल अयुबखान, झिया उल्‌ हक, परवेझ मुशर्रफ नाहीत तर जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी व जार्ज फर्नांडिस आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सार्‍या देशाला जेवढे दु:ख झाले, तेवढेच दु:ख काश्मीर खोर्‍यालाही झाले. आम्हाला समजणारा हाच तर एक नेता होता, तोही गेला-अशी काश्मिरींची भावना होती. या भावना समजण्याची वेळ आली आहे.