संतप्त नागरिकांचा वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला
   दिनांक :25-Feb-2019
चंद्रपूर,
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पळसगाव येथील वनविभागाच्या कार्यालयावर संतप्त पिपरडावासियांनी हल्ला चढवला. यावेळी जमावाने कार्यालय आणि वाहनांची तोडफोड केली. पिपरडा येथील महिलांना बांबू चोरी करताना वनकर्मचाऱ्यांनी पकडल्याने गावकरी संतप्त झाले होते. या महिलांना ताब्यातून सोडा, अशी मागणी घेऊन शे-दीडशे गावकरी पळसगाव वनविभाग कार्यालयावर चालून गेले होते. या प्रकरणी वनविभागाने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटकही केली.
 

 
 
गावकरी जंगलातून बाहेर येताना दिसले की, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले होते. हा संताप काल तोडफोडीच्या माध्यमातून व्यक्त झाला. ताब्यात घेतलेल्या महिलांना सोडण्यास वनाधिकाऱ्यांनी नकार दिल्याने, गावकऱ्यांनी तोडफोड सुरू केली. यात कार्यालयाबाहेर असलेली शासकीय वाहने फोडण्यात आली. याला अटकाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली असून यात ९ कर्मचारी जखमी झाले आहे.