आरोग्य विमा
   दिनांक :25-Feb-2019
आरोग्य विमा ही काळाची गरज आहे. आपण विमा पॉलिसी घेतो. पॉलिसी घेतल्यानंतर आपण निश्चिंत राहतो. एखाद्या मोठ्या आजारावरचे औषधोपचार तसंच रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास पॉलिसीमुळे आपल्याला नुकसानभरपाई मिळू शकते पण तुमची आरोग्य विमा पॉलिसी एवढ्यापुरती मर्यादित नाही. तिचे इतरही अनेक लाभ आहेत पण आपल्यापैकी अनेकांना याबाबत माहिती नसते. म्हणूनच आरोग्य विम्याच्या लाभांपासून आपण वंचित राहतो. विमा पॉलिसीच्या या लाभांविषयी जाणून घेणं यासाठी गरजेचं ठरतं.

 
 
  • विमा पॉलिसीच्या काळात पॉलिसीधारकाचं आरोग्य उत्तम राहिलं तर गुड हेल्थ बोनस किंवा नो क्लेम बोनसच्या रूपात लाभ मिळतात. पॉलिसीच्या कालावधीत नुकसानभरपाईसाठी कोणताही दावा करण्यात आला नाही तर नो क्लेम बोनसचा लाभ मिळू शकतो. आरोग्य विम्याच्या रकमेत वाढ किंवा हप्त्यात सवलतीसारखे लाभ मिळू शकतात.
  • पॉलिसी घेतल्यानंतर काही काळ नुकसान भरपाईचा दावा केला गेला नाही तर मोफत किंवा सवलतीतल्या आरोग्य तपासणीचे लाभ दिले जातात. पॉलिसी घेतल्यानंतर दोन किंवा पाच वर्षांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
  • आरोग्य विमा संरक्षण  ॲल्योपॅथी औषधोपचारांपुरतं मर्यादित नसतं. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, नेचरोपॅथी, सिद्धा यांसारख्या पर्यायी औषधोपचारांसाठीही विमा संरक्षण दिलं जातं. भारत सरकारच्या आयुष उपक्रमाअंतर्गत शासकीय रूग्णालयांमधून उपचार घेतल्यास हे लाभ मिळू शकतात.
  • रूग्णालयातून घरी आल्यानंतर आजारातून पूर्णपणे बरं होण्यासाठी लागणार्‍या कालावधीसाठीही विमा संरक्षण दिलं जातं. रूग्णालयात दाखल झाल्याने झालेलं तुमच्या उत्पन्नाचं नुकसानही पॉलिसीमुळे भरून निघतं.
  • रूग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने किंवा रूग्णाच्या स्थितीमुळे घरच्या घरी उपचार करावे लागले तरी विमा संरक्षण मिळतं.
  • रूग्णालयात दाखल झाल्यानंतर औषधांसोबतच इतर खर्चही असतात. प्रवास, खाणं-पिणं, राहण्याची सोय यावरही बराच खर्च होत असतो. या खर्चाची नुकसानभरपाई मिळू शकते.