टॉपअप कर्जावरील सवलत
   दिनांक :25-Feb-2019
गृहककर्जावर बर्‍याच करसवलती मिळतात. आयकर कायद्यातल्या कलम ८० सी अंतर्गत एका आर्थिक वर्षात केलेल्या मुद्दलीच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत सवलत मिळवता येते, तर कलम २४ अंतर्गत कर्जाच्या व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीची तरतूद आहे. या व्यतिरिक्तही गृहकर्जावर करात सवलत मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे. या कर्जावर तुम्ही टॉप अप म्हणजे अतिरिक्त सुविधा घेतली असेल तर करात सवलत मिळू शकते.
 
 
गृहकर्जाचा कालावधी १५ ते २० वर्षांचा असतो. या दरम्यान सुरू असलेल्या गृहकर्जावर टॉप अप घेऊन घराची दुरुस्ती किंवा  नूतनीकरणासाठी लागणारी आर्थिक गरज भागवता येते. विविध बँका गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांना ही सुविधा देतात. आर्थिक निकड भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, त्यावरचे प्रचंड व्याजदर पाहता टॉप अपचा पर्याय योग्य ठरतो. कारण याचे व्याजदर वैयक्तिक कर्जापेक्षा बरेच कमी असतात. मुलांची लग्नं, पर्यटन तसंच इतर काही कारणांसाठीही बँका टॉप अप कर्ज उपलब्ध करून देतात. हे कर्ज फक्त घरासाठीच वापरण्याची काहींची अट असते. टॉप अपवर करात सवलत मिळवण्यासाठी योग्य ती कागदपत्रं सादर करावी लागतात.
 
टॉप अप कर्जाचा वापर घरखरेदी, घराचं बांधकाम, दुरुस्ती किंवा  नूतनीकरणासाठी वापरल्याचे पुरावे दाखवल्यावरच सवलत मिळू शकते. घराची दुरुस्ती किंवा  बदल करण्यासाठी टॉप अप कर्ज घेतलं असेल तर त्यावरच्या व्याजावर करात ३० हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. पण, नियमित कर्जाच्या व्याजावर मिळणार्‍या दोन लाख रुपयांच्या सवलतीतून हे ३० हजार रुपये वजा केले जातात. त्यामुळे गृहकर्ज आणि टॉप अपचं व्याज मिळून एका आर्थिक वर्षात व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंतच सवलत मिळू शकते.