भारतीय महिलांनी जिंकली वन-डे मालिका
   दिनांक :25-Feb-2019
- इंग्लंडवर 7 गड्यांनी विजय
- स्मृती मंधानाचे अर्धशतक
- झूलन, शिखाचे प्रत्येकी 4 बळी
मुंबई, 
झूलन गोस्वामी, शिखा पांडेची भेदक गोलंदाजी आणि स्मृती मंधाना व कर्णधार मिताली राजच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा विश्वविजेत्या इंग्लंड संघाला ५३ चेंडू शिल्लक ठेवत ७ गड्यांनी पराभूत केले. झूलन सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
 
 
 
या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची वन-डे मालिका २-० ने खिशात घातली आहे. आता औपचारिक ठरलेला तिसरा व अंतिम सामना याच वानखेडे स्टेडियमवर २८ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.
इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने इंग्लंडच्या महिला संघाला ४३.३ षटकात १६१ धावात गुंडाळले आणि त्यानंतर ४१.१ षटकात ३ गडी गमावित विजयाचे लक्ष्य गाठले.
 
 
 
इंग्लंडच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. इंग्लंडने अवघ्या १४ धावात ३ फलंदाज गमावले. नतालिया स्कीवरशिवाय इतर कोणतेही फलंदाज झूलन गोस्वामी व शिखा पांडेच्या प्रभावी मार्‍यापुढे टिकाव धरू शकले नाही. नतालियाने १०९ चेंडूंचा सामना करत १२ चौकार व एका षटकारसह ८५ धावांची खेळी केली. नतालियाला झूलनने पायचित करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले. मध्यमगती वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी व शिखा पांडेने प्रत्येकी ४-४ बळी टिपत इंग्लंडचे कंबरडे मोडले.
 
 
 
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (०) लवकरच बाद झाल्यानंतर स्मृती मंधाना व पूनम राऊतने दणकेबाज फलंदाजी केली. या दोघींनी दुसर्‍या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. इल्विसच्या गोलंदाजीत राऊतला (३२) टेलरने यष्टिचित केले. ७ चौकार व एक षटकार खेचणार्‍या स्मृतीला श्राबसोलने पायचित केले. त्यानंतर मिताली राज व दीप्ती शर्माने नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने ६९ चेंडूत ८ चौकारांसह ४७ धावांची दिमाखदार खेळी केली, तर दीप्तीने नाबाद ६ धावा केल्या.