‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट ऑस्कर चित्रपट
   दिनांक :25-Feb-2019

चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकनं होती त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं आपली मोहर उमटवली आहे. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

 

 
 

यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सर्वोत्तम चित्रपटाच्या शर्यतीत एकूण आठ चित्रपट होते. सुरूवातीपासूनच ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र बाजी ‘ग्रीन बुक’ मारली . ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ या चित्रपटानं प्रत्येकी चार ऑस्कर पटकावले आहे. तर ‘ब्लॅक पँथर’ नं तीन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

 

 
‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ चित्रपटात फ्रेडी मर्क्युरीच्या भूमिकेत असलेल्या रॅमी मॅलेकला सर्वोत्तम अभिनेत्याचा तर ‘फेव्हरेट’ चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ओलिविया कोलमनने सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ११ वर्षांनतर पहिल्यांदाच स्पायडरमॅन आणि ब्लॅकपँथर या सुपरहिरोंनी ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘स्पायडरमॅन’ला सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे.
 
 

यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडला आहे.