"आम्ही बेफिकर"चा ट्रेलर रिलीज
   दिनांक :25-Feb-2019
कॉलेज जीवनावर आधारित आम्ही बेफिकर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच जारी करण्यात आला.  मित्र-मैत्रिणी, धमाल मस्ती, राडे-भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळा माहौल या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर रंगविण्यात येत आहे. हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचे आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी "आम्ही बेफिकर" या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून रसिकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, "आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

 
चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातल्या पात्रांना खूप काही मिळविण्यासाठी बरेच काही गमवावे लागते आणि हीच कथा या चित्रपटाचा केंद्रबिंदू असल्याचे ट्रेलर वरून दिसून येत आहे.