अतिरेक्यांविरुद्ध ठळकपणे दिसेल अशी कारवाई करा - युरोपियन युनियनची पाकला तंबी
   दिनांक :25-Feb-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानने आता फक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीतील दहशतवादी गटांविरुद्धच नव्हे, तर पुलवामा हल्ल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या संघटनाविरोधातही जगाला ठळकपणे दिसेल, अशा प्रकारे कारवाई करायलाच हवी, अशी तंबी युरोपियन युनियनने दिली आहे.
 

 
 
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, तो दक्षिण आशियाच्या आणि जगाच्या स्थिरतेसाठी घातक आहे. पुलवामा हल्ला हा भारताच्या संयमाचा अंत पाहणारा होता. त्यामुळे हा तणाव दूर करण्याची जबाबदारी आता पाकिस्तानचीच आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली असल्याने, त्या गटाविरोधात पाकिस्तानने कठोर कारवाई करायलाच हवी. या कारवाईवर संपूर्ण जगाची नजर राहणार असल्याने, ठळकपणे दिसेल, अशीच कारवाई होईल, असे आम्हाला वाटते, असे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा विभागाच्या प्रतिनिधी फेडरिका मोघेरिनी यांनी स्पष्ट केले.
 
 
फेडरिका यांनी रविवारी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासोबत फोनवरून याच मुद्यावर चर्चा केली. युरोपियन युनियनमधील अन्य वरिष्ठ सदस्यांनी भारत सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून, दहशतवादविरोधी लढ्यात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले.
 
 
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीतील अतिरेकी गटांविरोधात कारवाई करणे, हे पाकिस्तानचे कर्तव्यच आहे, पण पुलवामासारख्या मोठ्या हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मद हा गटही पाकिस्तानच्याच भूमीत सक्रिय असल्याने, त्या गटाविरोधातही कारवाई आवश्यक आहे, असे फेडरिका यांनी सांगितले.