महिला सरपंच व उपसरपंच्यामध्ये हाणामारी
   दिनांक :25-Feb-2019
-घटनेनंतर वलगावमध्ये तणाव
-परतवाडा मार्गावर टायर जाळले चक्काजामचा प्रयत्न हाणून पाडला
टाकरखेडा संभु,
येथून जवळच असलेल्या वलगाव येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या निवडीवरून ग्रामपंचायत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोड व उपसरपंच महेश गुलाबराव उकटे यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. हा वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला. दरम्यान सरपंच समर्थकांनी परतवाडा मार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
 
 
 
प्राप्त माहीती वरून कृष्णराव तायडे हे ग्रामपंचायत येथे इलेक्टशियन पदावर कार्यरत होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने गावातील पथदिव्याचे काम रखडले होते. त्यामुळे सरपंच मोहिनी मोहोड यांनी तायडे यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्याचा निर्माण घेतला. उपसरपंच उकटे यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतल्याने सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ग्रामपंचायतमध्ये याच विषयावर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. शिवीगाळ आणि भांडणाने ग्रामपंचायत कार्यालय दणाणून गेले होते. या प्रकरणी सरपंच मोहोड यांनी तत्काळ वलगाव पोलिस ठाणे गाठले आणि उपसरपंच यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपसरपंच यांना त्वरीत अटक करण्याच्या मागणी करीत सरपंच समर्थकांनी वलगाव बस स्थानका समोर टायर जाळून चक्क जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळ गाठुन परिस्थिती आटोक्यात आणली.
 
ग्रामपंचायत येथे झालेल्या घटनेनंतर सरपंच यांच्या समर्थकांनी टायर जाळुन चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. अखेर वलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील दुकाने बंद केली. परतवाडा मार्गावर टायर जाळल्या प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर उपसरपंच यांनी देखील पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्यांनी तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.