कर्णबधीरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज
   दिनांक :25-Feb-2019
 पुणे:  पुण्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यालय ते विधिमंडळा पर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रात जवळपास  १८ लाख कर्णबधीर आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे.

 
"मुळात आम्ही अपंग किंवा अंध नसून कर्णबधीर आहोत. आमची भाषा समजू शकणारे लोक खूप कमी आहेत. आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना, भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही." अशी तीव्र प्रतिक्रिया कर्णबधिर आंदोलकांनी दिली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान या मोर्चात पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विविध स्तरातून याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.