वॉरेन बफे यांच्या कंपनीला 1 लाख 70 हजार कोटींचे नुकसान
   दिनांक :25-Feb-2019
जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे समूहाला ऑक्टोबर -डिसेंबर 2018या तिमाहीत तब्बल 25 अब्ज डॉलरचे (1.77 लाख कोटी रुपये) नुकसान झाले आहे. शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे बर्कशायर हॅथवेच्या मालमत्तेत घट झाली आहे.
 
 



बर्कशायर हॅथवेची क्राफ्ट हेन्ज या फूड कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. क्राफ्ट हेन्जचे तब्बल 32.5 कोटी शेअर्स कंपनीकडे आहेत. मात्र मागील काही दिवसात कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात घसरल्याने त्याचा फटका बर्कशायर हॅथवेला बसला आहे. याशिवाय कंपनीने अ‍ॅपल, बँक ऑफ अमेरिका, कोका-कोला आणि क्राफ्ट हेन्ज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाचा फटका अ‍ॅपल सारख्या कंपनीला बसून कंपनीचा शेअर घसरला आहे. याचबरोबर विविध कारणास्तव डिसेंबर तिमाहीत शेअर बाजार घसरल्याने बर्कशायर हॅथवेच्या भांडवल मूल्यात घट झाली आहे.
 
 
डिसेंबर अखेर बर्कशायर हॅथवेचा गुंतवणूक पोर्टफोलिओ 173 अब्ज डॉलर ( 12.28 लाख किती रुपये) इतका आहे. यापैकी अ‍ॅपल मध्ये सर्वात जास्त म्हणजे 40.3 अब्ज डॉलरची (2.86 लाख कोटी रुपये) गुंतवणूक आहे.