मालिका वाचविण्याचे भारताचे लक्ष्य
   दिनांक :26-Feb-2019
बंगळुरू,
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका वाचविण्यासाठी बुधवारी दुसरा व अंतिम टी-२० सामन्यात विजयाच्या ध्येय उराशी ठेवून मैदानावर उतरणार आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टूकार फलंदाजीमुळे भारताला ३ गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. 
 
 
 
कर्णधार विराट कोहलीने आधीच सांगितले आहे की, आगामी मे-जुलै महिन्यात होणार्‍या विश्वचषकासाठी संघबांधणीची प्रक्रिया सुरु असून यातून कमी-अधिक खेळाडू निवडले जातील, परंतु दोन टी-२० व पाच वन-डे सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष दिले जाणार आहे. कर्णधाराच्या सध्याच्या विचारावरून तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बहुतांश सामन्यासाठी लोकेश राहुल व ऋषभ पंत यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 
 
 
 
मालिका वाचविण्यासाठी जर शिखर धवनला अंतिम अकरामध्ये संधी मिळाल्यास तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल, अन्यथा विशाखापट्टणममध्ये खेळलेली सलामी जोडी कायम राखेल. आम्ही राहुल व पंतला आपली क्षमता दाखविण्याची संधी देऊ इच्छितो, असे कोहली पहिल्या टी-२० सामन्यानंतर म्हणाला होता. पुनरागमनानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले, मात्र उमेश यादव आपल्या गोलंदाजीची छाप सोडू शकला नाही. त्यामुळे संघव्यवस्थापन उमेशच्या जागी सिद्धार्थ कौलला किंवा अष्टपैलू विजय शंकरला संधी देऊ शकतात. पदार्पण करणारा लेग स्पिनर मयंक मार्कंडेला एकही बळी टिपता आला नाही, परंतु त्याच्या गोलंदाजी शैलीवर कर्णधार खूश आहे.