भारतीय पासपोर्टचे सशक्तीकरण
   दिनांक :26-Feb-2019
 तिसरा डोळा 
 - चारुदत्त कहू 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीविरुद्ध सातत्याने राळ उठविली जाते. निर्णयप्रक्रियेत ते कुणाला सोबत घेत नाहीत, हा आरोप करून विरोधकांनी त्यांच्यात आणि सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. विरोधकांचे हे प्रयत्न सपशेल अपशयी ठरले, ही बाब अलाहिदा. नोटबंदीच्या निर्णयाच्यावेळी देखील पंतप्रधानांवर त्यांनी कुणाला विश्वासात न घेता, विशेषतः सहकारी मंत्र्यांना आणि विरोधकांना अवगत न करता हा निर्णय घेतल्याचे आरोप केले. राफेल कराराबाबत तर विरोधकांनी यापेक्षाही भयानक आरोप करून पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याची खेळी केली. दस्तुरखुद्द तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना बाजूला सारून राफेलबाबत नवा करार केल्याच्या आरोपांचा धुराळा विरोधकांनी उडवून दिला. वास्तविक या आरोपात कुठलेच तथ्य नसल्याचे जाणकारांना ठावूक आहे.
 
पंतप्रधानांवर आणि त्यांच्या विदेश दौर्‍यांबाबतही असेच अनेक आक्षेप घेतले गेले. त्यांनी विदेश दौर्‍यांवर केलेला खर्चही माहिती अधिकारात मागण्यात आला आणि त्याची तुलना मनमोहनिंसग यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विदेश दौर्‍यांशी केली गेली. अखेर कुणाचे विदेश दौरे फलदायी ठरले हे सुजाण वाचकांना सांगण्याची गरज नाही. मोदी सरकारवर विदेशी मुद्दे योग्य प्रकारे हाताळत नसल्याचेही आरोप झाले. पण वास्तविकता ही आहे की गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र मंत्रालयाने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या विदेशातील भारतीयांच्या सुटकेचा प्रश्न असो की वैयक्तिक अडचणींमुळे भारतात परतणे अशक्य झाल्याची प्रकरणे असो, या सार्‍या बाबतीत परराष्ट्र मंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाची कामगिरी अतुलनीय राहिलेली आहे. गेल्या पाच वर्षात शेजारी देशांशीच नव्हे तर अनेक विकसित आणि विकसनशील देशांशीही भारताचे संबंध सुधारले आहेत. अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आदी देशांशी तर आपण संबंध दृढ केलेच शिवाय, विकसनशील राष्ट्रांच्या मनातही भारतच त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असा विश्वास निर्माण केला.
 
 
 
गेल्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढला आणि भारताची विदेशी गंगाजळी विक्रमी स्तरावर पोहोचली. आज परिस्थिती अशी आहे की, एकीकडे विरोधक पंतप्रधानांना विदेशी मुद्यांबाबत अपयशी ठरविण्याच्या प्रयत्नात असताना विदेशातील मोठमोठे नेते विदेशी मुद्यांबाबत भारताची भूमिका काय राहील, याबाबत मोदींचा सल्ला घेत आहेत. अनेक ठिकाणी तर त्यांची भूमिकाच महत्त्वाची गणली जात आहे. मोदी सरकारच्या काळात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना प्रस्थापित नियम डावलून मदत केल्याचे जगाने पाहिले आहे. भारतीय पासपोर्टची वाढलेली ताकद बघितली तर आपण विदेशी मुद्यांबाबत किती पावले टाकलेली आहेत हे ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही.
 
२०१९ चे पासपोर्ट इंडेक्स रँकिंग नुकतेच जाहीर झाले आहे. त्यात १० अंकांनी भारताचा क्रमांक वर आलेला आहे. एकूण १९९ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ६७ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या पासपोर्टची ताकद जगात वाढली आहे. कारण पूर्वी मोजक्याच देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय जाण्याची मुभा होती. आज भारतीय पासपोर्टधारकास २५ देशांमध्ये व्हिसाशिवाय सहज जाता येऊ शकते. हेच कमी की काय म्हणून एकूण ३९ देशांमध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
भारतीयांना आज विदेशातील १३४ देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज भासते. याउलट भारत १६६ देशांतील नागरिकांना बिना व्हिसा, इ-व्हिसा आणि त्या देशातील नागरिकांच्या आगमनानंतर व्हिसा काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विदेशी लोकांचे स्वागत करण्याच्या देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी पोहोचला आहे.
ज्या देशांमध्ये भारतीयांना व्हिसा लागत नाहीत त्या देशांमध्ये भूतान, फिजी बेटे, जेजू आयलॅण्ड, गयाना, इंडोनेशिया, मलावी, मायक्रोनेशिया, मॉंटसेरात, नेपाळ, पॅलेस्टाईन, सेंट विन्सेंट ॲण्ड द ग्रेनाडिन्स, सेनेगल, सर्बिया, स्वालबार्ड, त्रिनिनाद ॲण्ड टोबॅगो, टोगो, टर्कस्‌ ॲण्ड काईकॉस आयलॅण्ड, वनौतू आदी देशांचा समावेश होतो.
 
त्याचप्रमाणे ज्या देशांमध्ये भारतीयांना आगमनानंतर व्हिसा प्रदान केला जातो, त्या देशांमध्ये बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन आयलॅण्ड, कंबोडिया, केप वर्दे, कोमोरोस, कूक आयलॅण्ड, जिबोटी, डॉमिनिका, इक्वेडोर, अल साल्व्हाडोर, इथिओपिया, ग्रेनाडा, गिनिया बिसाऊ, हैती, जमेका, जॉर्जन, केनिया, किश आयलॅण्ड, लाओस, मादागास्कर, मालदीव, मलेशिया, माऊरिटानिया, मॉरिशस, मार्शल आयलॅण्ड, मोझाम्बिक, पलाऊ, कतार, रवांडा, सेंट किट्‌स ॲण्ड नेव्हिस, समोआ, सेशेल्स, सोमालिया, सुरिनाम, टांझानिया, थायलंड, टुवालू, टिमोर-लेस्ट, युगांडा, युक्रेन, व्हिएतनाम, झांबिया आदी देशांचा समावेश होतो.
भारतीयांना आमच्या देशात प्रवेश करताना व्हिसाची गरज नाही, असे नमूद करणारे देश भारतीयांना प्रामाणिकतेचे प्रशस्तीपत्र देतात, त्यांच्या वर्तणुकतीबद्दल आक्षेप घेत नाहीत, त्याचप्रमाणे भारतीयांना आगमनप्रसंगी तत्काळ व्हिसा प्रक्रिया सुरू करणे, हे कशाचे लक्षण म्हणावे? भारताने वर्षानुवर्षे आणि विशेषतः मोदी सरकारच्या कार्यकाळात बजावलेल्या कामगिरीवर उठविलेली ही मोहोरच म्हणावी लागेल.
 
भारताची प्रतिमा विदेशात उजळ होण्याची अनेक कारणे आहेत. मोदींनी सातत्याने लहान-लहान देशांचेच नव्हे, तर मोठमोठ्या बलाढ्य देशांचे केलेले दोरे, त्या-त्या देशांशी संबंध सुधारून गेले आणि त्या देशांशी आपला द्विपक्षीय व्यापार वाढण्यासही यामुळे मदत झाली. पण, ही प्रकिया काही आजचीच नाही. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राज्याच्या पर्यटनाला गती देण्यासाठी अनेक पावले उचलली. त्यासाठी त्यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची राज्याच्या पर्यटन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी नियुक्ती केली. निरनिराळ्या जाहिरातींच्या कॅम्पेनमार्फत त्यांनी देशातीलच नव्हे, विदेशातील पर्यटकांना आणि अनिवासी भारतीयांनाही आपल्या राज्यात खेचून आणले. ‘कुछ दिन तो गुजारो गुजरात में’, ही गुजरात सरकारची टॅग लाईन अतिशय लोकप्रिय ठरली होती. पंतप्रधान होताच त्यांनी गुजरातचे पर्यटन मॉडेल भारतासाठी लागू केले आणि स्वतः देशातील पर्यटनाच्या विकासासाठी योजना आखल्या. या सर्व योजनांचा ते सातत्याने आढावाही घेत राहिले. त्याच्याच परिणामी प्रवासी भारतीय दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला. कुंभ मेळाव्याला आलेले जागतिक रूप, गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा ही त्यांच्याच कल्पनेतून साकारलेली आणि विससित झालेली पर्यटन आणि धार्मिक स्थळे म्हणता येतील.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच प्रयत्नांमुळे आणि विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने जगातील ५० देशांमध्ये भारतीय पर्यटन महामंडळाची कार्यालये उघडली असून, त्यामार्फत पर्यटकांना आकर्षित करणार्‍या ऑफर्स दिल्या जात आहेत. देशात विमानप्रवास करणार्‍या लोकांच्या संख्येत जशी गेल्या पाच वर्षांत वाढ झाली आहे, त्याच धर्तीवर विदेशात पर्यटनाला जाणार्‍या भारतीयांच्या संख्येतही गेल्या पाच वर्षात विक्रमी वाढ झाली आहे.
 
गत काही वर्षात भारतीयांच्या क्रयशक्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदेशातील लोकांना हे कळून चुकले आहे की भारतीय त्यांच्या देशात आले तर ते मोठ्या प्रमाणात तेथील वस्तूंची खरेदी करून, त्यांना विदेशी गंगाजळी देऊन जातील. भारतीय कुठल्याही देशात गेले तर ते दुधात साखर मिसळावी तसे तेथील संस्कृतीशी एकरूप होतात, ही ख्याती असल्याने तसेच त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या कधीच उद्भवत नसल्याची खात्री असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर वाढलेला आहे. २०१४ मध्ये भारत ४६ देशांना ई-व्हिसा प्रदान करीत असे. आज २०१९ मध्ये तो १६६ देशांना अशा प्रकारची सुविधा प्रदान करीत आहे. एकंदरीत भारतीय पासपोर्टची वाढलेली ताकद इतरांना नजरअंदाज करता येण्यासारखी राहिलेली नाही, हे अधोरेखित व्हावे.